ऐतिहासिक मूल्यमापन

हिंदुस्थानची फाळणी आणि महात्मा गांधीजींची हत्या हा एक करुण अध्याय आहे. लाखो लोकांची कत्तल, बलात्कार, धर्मांतरे या दुर्दैवी घटनांनी 1940 ते 1948 हा कालखंड भरून गेलेला आहे. फाळणीची कारणमीमांसा गेली 70 वर्षे लोटली तरी हिंदुस्थानात अजूनही चालू असल्याचे कारण म्हणजे तो घाव हिंदुस्थानींच्या जिव्हारी बसलेला आहे. “इतिहास ही माणसाची प्रेरणा असते. ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन, त्यांचे कार्य, त्यांची चिकित्सा तटस्थपणे करणे’’ या एकाच भावनेतून प्रसिद्ध कादंबरीकार अनंत शंकर ओगले यांनी हा विषय हाताळलेला आहे.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्माजींचे युग सुरू झाले तेथून प्रारंभ करून विभाजनपूर्व आक्रोश, फाळणी, त्याचबरोबर महात्माजींच्या समाजकारण, धर्मकारण, राजकारणाचा आढावा ओगले यांनी अत्यंत संयमित भाषेत घेतलेला आहे.

त्यांच्याविरुद्ध झालेल्या या वाटातल्या कटवाल्यांची इतरत्र फारशी समोर न आलेली माहिती अभ्यासपूर्वकरीत्या येथे मांडण्यात आलेली आहे. गांधीजींची हत्या, त्यांचा खटला, आरोपींना झालेली शिक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना या खटल्यात संशयावरून गोवण्याचा अयशस्वी प्रयत्न या साऱया नाटय़मय गोष्टींची नोंद येथे घेतली गेली आहे. या विषयावर कर्नल मनोहर माळगावकर यांनी ‘द मॅन हू किल्ड गांधी’ म्हणून पुस्तक लिहिले होते. त्याच्या पुढचा भाग वाटेल असे अभ्यासपूर्ण लेखन अनंत शंकर ओगले यांनी केले आहे.

शैलीदार, भावस्पर्शी भाषा हा एक खास भाग म्हणावा लागेल. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार सतीश भावसार यांनी अतिशय कल्पक सुंदर असे केलेले आहे. इतिहासात रमणारा वाचक हे पुस्तक पूर्ण वाचूनच खाली ठेवेल इतके अप्रतिम झालेले आहे.

अस्त गांधी युगाचा आणि नंतर
लेखक – अनंत शंकर ओगले
प्रकाशक – नावीन्य प्रकाशन
मूल्य- रुपये 200/-