वेध एका आनंदमेघाचा

>> मल्हार कृष्णा गोखले

आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात एकप्रकारचे दुहेरीपण, दुटप्पीपण अस्तित्वात असते. लोकभाषेत आपला विषय बोलणारे, लिहिणारे लोक आणि इंग्रजीत बोलणारे, लिहिणारे लोक. लोकभाषेत आपला विषय मांडणारे लोक जनसामान्यांमध्ये प्रिय होतात, पण इंग्रजीत विषय मांडणारे लोक एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात. अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही हेच दिसते. गीतेवर उत्तम व्याख्याने, प्रवचने करणारे लोक प्रत्येक प्रांतात आहेत. ते लोकप्रियही आहेत. पण आपल्याकडचा ‘मेनस्ट्रीम मीडिया’ अशा लोकांना नाक मुरडूनच पाहतो, परंतु गीतेवर इंग्रजीत प्रवचने देणारा कुणी निघाला की हाच मीडिया त्याचा बराच बोलबाला करतो. लगेच शहरोशहरींचे लब्ध प्रतिष्ठत त्याच्या प्रवचनाला गर्दी करतात.

याचा अर्थ असा मात्र नव्हे की, इंग्रजी भाषेत अध्यात्मावर बोलणारे लोक ढोंगीच असतात, परंतु त्यांचे अध्यात्म हे ‘मासेस’साठी नसून ‘क्लासेस’साठी असते. अलीकडच्या काळातले असे एक आध्यात्मिक प्रवचनकार म्हणजे जे. कृष्णमूर्ती.

इंग्रजी राजवटीतील मद्रास इलाख्यातील मदनपल्ली गावच्या नारायणय्या आणि संजीवय्या या धर्मशील जोडप्याच्या पोटी कृष्णमूर्ती या मुलाचा जनम १८९५ सालच्या मे महिन्यात झाला. नारायणय्या हे तत्कालीन मद्रास शहरातील अडय़ार भागातील ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ या प्रख्यात संस्थेत नोकरीला होते. डॉ. अॅनी बेझंट, चार्ल्स लेडबीटर इत्यादी सोसायटीतली प्रमुख मंडळी आंतरराष्ट्रीय ख्यातीची होती.

चौदा वर्षांचा कृष्णमूर्ती अडय़ार नदीच्या काठावर फिरत असताना चार्ल्स लेडबीटर यांनी त्याला लांबून पाहिले आणि ते चकित झाले. ज्याचा ‘ऑरा’ म्हणजे स्थूल शरीराभोवतीचे सूक्ष्म तेजोवलय इतके स्वच्छ आहे, असा अन्य कुणीही माणूस त्यांनी आतापर्यंत पाहिला नव्हता.

यानंतर कृष्णमूर्ती या मुलाची पुढची आध्यात्मिक वाटचाल प्रथम लेडबीटर बेझंट यांच्या प्रभावाखाली नि नंतर स्वतंत्रपणे झाली. पुढच्या काळात कृष्णमूर्ती किंवा कृष्णजी हे एक उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी पावले.

परंतु त्यांचे तत्त्वज्ञान समजणे सोपे नाही. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका डॉ. मीरा केसकर या वेदांत, गीता, संतसाहित्य यांच्या साक्षेपी अभ्यासक आहेत. वयाच्या पंचविशीत आपण कृष्णमूर्तींचे साहित्य ‘डोक्यावरून जाते’ म्हणून बाजूला ठेवले होते असे सांगून त्या पुढे म्हणतात की, आज मात्र कृष्णजींना समजून घेतल्यावर गीता जास्त समजल्यासारखी वाटते.

कृष्णाजींचे तत्त्वज्ञान आक्रळून घेताना लेखिकेचा स्वतःशीच झालेला वाद-संवाद म्हणजेच प्रस्तुत पुस्तक ‘जे. कृष्णमूर्ती – एक आनंदमेघ’. आध्यात्मिक, वैचारिक पुस्तके ज्यांना आवडतात, जे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

जे. कृष्णमूर्ती – एक आनंदमेघ
लेखिका – डॉ. मीरा केसकर
प्रकाशक – प्राजक्त प्रकाशन, पुणे
पृष्ठ- २५६, मूल्य – २६० रुपये