स्वानुभवातली काव्यप्रेरणा

63

>> नमिता वारणकर

काही वेळा बाह्यप्रेरणेपेक्षा अंतःप्रेरणा व्यक्तीला नवं काहीतरी व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. या प्रेरणेतूनच कवी शशिकांत लोखंडे यांना त्यांच्या रोजच्या अनुभवांतून जे भावलं ते ‘इलेक्ट्रा’ या आपल्या काव्यसंग्रहाद्वारे व्यक्त केलं आहे.

कविता हे प्रचार-प्रसाराचं साधन नाही, ती फक्त एक संवेदनशील अनुभूती असून व्यक्तिनिरपेक्ष आहे. शब्दांत गुंफलेली असूनही ती शब्दांपलीकडील, अव्यक्त अनुभवाला सामोरी जाणारी आहे. म्हणूनच कशाचेही साधन नसताना ती जिवंत, सजीव शिल्प असल्यासारखी वाटते. हे शिल्प घडवताना कवीची जी दमछाक होते ती आनंददायी आहे. त्यामुळे या कलात्म अनुभूतीचा ‘आनंद’ देणं हेच ‘इलेक्ट्रा’मधील कवितांचं ध्येय, अशा शब्दांत कवी शशिकांत लोखंडे आपल्या काव्यसंग्रहाविषयीच्या भावना व्यक्त करतात.

या पुस्तकातील कविता शब्दांसोबतच चित्रदृश्यातूनही साकार होतात. त्यामुळे कवीचे भाषावैभव, शब्दरस, शब्दगंध काव्यभावनेशी निगडित असले तरीही त्यातील चित्रसंवेदना मनाला स्पर्शून जाते. यामुळे संवेदनशील कविमनाची स्पंदने चित्रांचा रचनाबंध घेऊन येतात हेही जाणवते. यातूनच रेखाटनामध्ये वैविध्य येते. महत्त्वाचे म्हणजे, कवीच्या कविता भावार्थाच्या अवकाशात घडल्या असून त्यातून अनोखे सौंदर्य प्रकटते.

सूर्याला हाक मारली
तू गुडघ्यापर्यंत भिज पाण्यात
नि जमवून दे मला कोरे शिंपले
माझ्या प्रेयसीसारखी
ज्यात वाळूची फुले नि वाळूची हिरवळ
पियानोवरील फुलपाखरू

अशाप्रकारे प्रत्येक कविता वाचकाशी हितगुज करतेय असं वाटतं. सूक्ष्म निरीक्षण आणि जिज्ञासा असलेला कवी त्याच्या कवितेतून, चित्रांतून उमटला आहे असे कविता वाचताना वाटत राहते.

आपण वाऱयासारखं भटकू
लाटांसारखं बोलू समुद्रावर
तिथं बनव वाळूची बाग तू

‘इलेक्ट्रा’मधील कवितेतील संवेदना, ताल, लय, आकृतिबंध, रेषा चित्रात दिसू लागतात. कवितेच्या प्रत्येक ओळीतील, अर्थातील संगीत लय, शब्दगंध चित्रांद्वारे तरलपणे जिवंत होतात हेच यातील कवितांचे आकर्षण.

या काव्यसंग्रहातील कवितांचे चार भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ‘झाडानेच पक्ष्यांना नाकारल्यावर, जखमांची अलगुजे, वीस वर्षांनंतर, तू दूर दूर, एक हवाबंद बलून, मी एकाकी नाही, भरदिवसा गुलमोहरावर, चंद्र मुठीतून सांडताना, आय विल डाय बिफोर बर्थ, आरसा चक्क, माझी सर्व नखे गळून, मुक्या रात्री किंचाळणे, आत्म्याच्या तळाशी’ अशा रोजच्या जगण्यातील वैविध्य कवितेच्या माध्यमातून वाचायला मिळते.

कविता लिहिणं हा कवीचा अलौकिक आनंद आहे. दैनंदिन जीवनात ते जे जगले, जे त्यांना भावलं, त्यांनी अनुभवलं त्याचं ‘कविते’त रूपांतर झालं. कवितेशी असलेला हा त्यांच्या जीवनाचा प्रवास आजतागायत सुरू आहे. त्यामुळे कवितेचं विश्व हेच त्यांचं जगणं आहे, श्वास आहे, सातत्याची साधना आहे. त्यामुळे यातून उमलणाऱया प्रत्येक कवितेचा आनंद अनुभवणं हेच ‘इलेक्ट्रा’ या काव्यसंग्रहाचं ध्येय आहे असं वाटतं.

इलेक्ट्रा
लेखक – शशिकांत लोखंडे
पृष्ठs -140

आपली प्रतिक्रिया द्या