तेजस्वी राष्ट्रपुरुष जगन्नाथ शंकरशेट

>> मल्लिका अमरशेख

‘गीत जगन्नाथायन’ हे पुस्तक वाचनात आले आणि थक्क, चकित झाले. लहानपणी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती असायची एवढंच माहीत होतं, पण लेखक, आचार्य डॉ. माधवराव पोतदार यांनी या दुर्लक्षित, पण झुंझार, तेजस्वी राष्ट्रपुरुषाची वीरगाथा लिहिल्यामुळे महाराष्ट्रात, या भूमीत जी अनेक आकाशाइतकी उंच न् सूर्यासम तेज असणारी व्यक्तिमत्त्वं निर्माण झाली, ज्यांनी ही महाराष्ट्र भूमीच नाही तर संपूर्ण देशाला ललामभूत असे कार्य केले त्यातील अत्युच्य स्थानावरच्या जगन्नाथ शंकरशेट या एका अमोघ, आदर्श व समाजाप्रति अतीव बांधिलकी असणाऱया व्यक्तिमत्त्वाची ओळख डॉ. माधवरावांनी करून दिली याबद्दल स्वागतच केले पाहिजे. त्यांच्या कार्याची ओळखच नाही तर त्या कार्यावर, प्रत्येक जीवनातल्या महत्त्वाच्या वळणांसाठी त्यांनी वेगळे गीत लिहिले आहे. एका दृष्टीने हे पुस्तक म्हणजे वीरगाथाच आहे.

नानांनी (जगन्नाथ शंकरशेट) खऱया अर्थाने मुंबई घडवली, इतकेच नाही तर स्वतःच्याच वाडय़ात मुंबईमध्ये स्त्र्ायांसाठी पहिली शाळा सुरू केली.

इंग्रजांनी शालेय पुस्तकातून स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली.

तीक्र बुद्धीच्या, कट्टर देशाभिमानी व संस्कृतीरक्षक नानांनी इंग्रजांचा कावा लगेच ओळखला व त्यांनी ‘ताबडतोब पुस्तके रद्द करा नाहीतर ती आमचा घात करतील’ हे इंग्रजांना बजावले. नानांचे समाजातील वजन व लोकमान्यता सत्ताधाऱयांना माहीत होती. त्यामुळे नानांच्या जरबेनं सर्व धर्मप्रचार करणारी ‘बुके’ रद्द झाली.

मुंबापुरीतला गिरगाव भाग नानांकडे आला व त्यांनी तिथल्या विकासासाठी सर्व प्रयत्न केले. त्या काळात सतीची प्रथा बंद व्हावी म्हणूनही नानांनी प्रयत्न केले. १९ जून १८२३ रोजी इंग्लंडला पार्लमेंटकडे जो अर्ज गेला त्या अर्जावर त्यांचीच सही होती.

हिंदुस्थानी माणसाला जे. पी. होण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी निकराने इंग्रजांना नमवले.

शिक्षणाचे महत्त्व या दूरदृष्टीच्या धोरणी राष्ट्रपुरुषाने ओळखले. इंग्रजांची खरी ताकद त्यांच्या ज्ञानात आहे हे नानांनी ओळखले आणि एल्फिन्स्टनबरोबर त्यांनीही ‘ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज’ काढण्यास सुरुवात केली व ते प्रत्यक्षातही आणले. नानांनी या मराठी माणसांसाठी काय नाही केले? मुंबईच्या फोर्ट भागात राहणाऱया काहींनी नाटय़प्रेम जोपासले. मराठी माणसाचे पहिले प्रेम नाटय़प्रेम. तर नाना कलाप्रेमी! नानांनी नाटय़ समिती स्थापन केली व ग्रॅण्ट रोडला बादशाही थिएटर उभारले.

लंडनला शहरात गॅसचे दिवे लागल्याचे कळताच त्यांच्याही मनाने मुंबापुरीला उजळून टाकायचा ध्यास घेतला आणि नानांच्या ध्यासाने मुंबापुरीही तेजाने झळकू लागली.

१२ एप्रिल १८३४ रोजी इंग्रजांनी कोणाही हिंदुस्थानीला न दिलेले पद नाना शंकरशेटना दिले. पिटीसेशन्सच्या बेंचवर पहिले मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांची नेमणूक झाली.

आपल्या देशातला कच्चा माल इंग्रज लुटून नेतात. हे शोषण थांबले पाहिजे हे ओळखून नानांनी मुंबईत पहिली गिरणी सुरू केली!

मुंबईला खऱया अर्थाने सर्व प्रकारे स्वावलंबी करण्याचा वसा नानांनी घेतला होता. शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि रोजगार या सर्व ठिकाणी नानांनी मराठी माणसांना मानाने उभे केले.

सार्वजनिक विहिरी खणल्या मोफत दवाखाने सुरू केले. पाणीपुरवठय़ासाठी ‘विहार लेक’ निर्माण केला. जे. जे. हॉस्पिटलची उभारणी नानांनीच केली. हे सारे करताना जातिभेद, पंक्तिप्रपंच यांना बिलकूल थारा दिला नाही.

मराठी भाषा हा आमच्या संस्कृतीचा आधार आहे आणि संस्कृतमधले तत्त्वज्ञान ही आम्ही जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे असे ते म्हणत.

मुंबईत १६ एप्रिल १८५३ रोजी या भव्य महानगरीची लाइफलाइन ट्रेन सुरू झाली.

त्याचे सर्व श्रेय नाना शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई!

आचार्य अत्रे यांनी नानांचे उत्तुंग कर्तृत्व पाहून ‘‘बुद्धी, विद्वत्ता, कर्तृत्व यांचा महासागर म्हणजे नाना शंकरशेट! परकीय राज्यकर्ते आणि स्वकीय जनता यांचा दुवा साधण्याचे अद्भुत सामर्थ्य नानांमध्ये होते. सरकारचा व जनतेचा संपूर्ण विश्वास संपादन करणारा एवढा मोठा राष्ट्रपुरुष त्या काळात व नंतरही झालेला दिसत नाही!’’ या शब्दांत त्यांचा गौरव केला.

वेळावेळी पडणाऱया दुष्काळामुळे शेतकरी त्रासलेला नानांनी पाहिला आणि त्यांनी त्वरित कालवे योजना हाती घेतली (नाना या काळात हवे होते! शासन आपलेच असले तरी त्यांच्यात नानांइतके संवेदनाक्षम मन असते तर आज इतक्या शेतकऱयांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या!). त्यांच्या कार्याच्या ज्या नोंदी या पुस्तकात दिल्यात त्याने या माणसाने केवढे महान, बेजोड कार्य केले की, ज्याने पूर्ण मुंबईचाच नाही तर हिंदुस्थानचा चेहराच बदलला आणि हिंदुस्थानी समाजाला पूर्ण समर्थ, सुसज्ज व आधुनिक आणि स्वावलंबी बनवलं हे लक्षात येतं.

आता थोडे लेखकाबद्दल. आचार्य डॉ. माधवराव पोतदार यांची साहित्यनिर्मिती ही जवळजवळ ११५ पुस्तकांच्या घरात आहे. ते उपेक्षितांचे भाष्यकार आहेत.

दीर्घकाव्य ही अनवट अवघड वाट, पण या पुस्तकात आलेली सर्व गीते म्हणजे नानांची जीवनगाथाच आहे. अशा तऱहेने जीवनघटनांवर आधारित गीते लिहिणे म्हणजे शिवधनुष्य व ते त्यांनी लीलया पेलले आहे. ‘राष्ट्रभक्तीची ज्वाला’ हा ५७ गीतांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील संग्रह विशेष गाजला तर शाहीर अमरशेखांवर 25हून जास्त पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. वयाच्या ८०व्या वर्षीही तरुणाला लाजवील इतक्या तडफेने ते काम करतात. दुर्लक्षित पण कर्तबगार अशा नररत्नांना पुन्हा त्यांच्या शब्दांतून झळाळी आणून समाजासमोर ठेवतात. हे कार्यही अभूतपूर्व, अजोड असेच.