विस्कटलेले जीवितधागे

>> देवानंद भुवड

पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्राr-पुरुष समान हवेत.’’ हे जीवनसूत्र आहे कालौघात लुप्त झालेल्या एका प्रखर बुद्धिमान असणाऱया विदुषीचं. तिचं नाव आहे हिराबाई पेडणेकर. वेगळं काही करू पाहण्याच्या प्रयत्नात असणाऱया हिराबाईंच्या वाटय़ाला आलेली उपेक्षा, हालअपेष्टा, प्रेमभंग अशा अनेकविध संकटांना सामोरे जात असताना करावी लागणारी केविलवाणी धडपड, त्यातून पुढे सरकणारा जीवनपट याचा संक्षिप्त धांडोळा म्हणजे ‘आद्य नाटककार ः हिराबाई पेडणेकर’ हा शिल्पा सुर्वे लिखित चरित्रग्रंथ.

दुःख, व्यथा, दगदगी आणि कटकटी यांच्या फेऱयांपासून माणूस कधीच स्वतंत्र झालेला नाही. आद्य महिला नाटककार असणाऱया हिराबाई केवळ नाटय़लेखनावरच थांबल्या नाहीत. पहिल्या महिला संगीतकार म्हणूनही त्यांच्या कारकीर्दीचा बहुमान करावा लागेल. तत्कालीन कर्मठ समाजव्यवस्थेतून नाटककार, संगीतकार, गायिका म्हणून एका स्त्राrने मान वर काढणे आणि प्रतिष्ठा प्राप्त करणे ही वाखाणण्याजोगी बाब आहे. अशा या प्रतिभासंपन्न, गुणवंत स्त्राrचा एकंदरीत आयुष्यपट मात्र ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ या सूत्रानेच पुढे कसा सरकत जातो याचे यथार्थ आणि नेमके वर्णन लेखिका शिल्पा सुर्वे यांनी या पुस्तकातून केल्याचे समोर येते.

हिराबाई ही गोमंतक कन्या, देवदासी परंपरेची नाळ आयुष्याशी जोडलेली. वडिलांचे छत्र नाही. आई बालवयातच गेलेली. मावशीने कोडकौतुकाने पालनपोषण केले. देवदासी-नायकिणी परंपरेने बालवयातच गायनाचा प्रवास सुरू झालेला. मावशीच्या कृपाछत्राने शिक्षण सुरू झाले. तरुणपणी ज्येष्ठ नाटककारांचा घरात असणारा वावर यामुळे हिराची नाटय़लेखनाची जिज्ञासा वाढीस लागली. यातून 1904 साली ‘जयद्रथ विडंबन’ हे हिराबाईंचे नाटक पुस्तक रूपाने वाचकांसमोर आले. अनंत अडचणींवर मात करीत 1912 साली ‘संगीत दामिनी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. प्रस्थापित लेखनपद्धतीला छेद देऊन समाजातील भोळय़ाभाबडय़ा स्त्रियांच्या वाटय़ाला येणारा अंधकार, फसवणूक यावर हे नाटक बेतलेले. देवदासी म्हणून पदरी उपेक्षा असलेल्या या क्रांतिकारी विचारसरणीच्या महिलेने गायन कलेतही प्रावीण्य मिळवलेले होते. कलेचा इतका काही वरदहस्त लाभूनही तिच्या आयुष्याची परवड मात्र थांबलेली नाही. आयुष्याच्या एका वळणावर तिने नाटय़, संगीत, गायन यांवर तुळशीपत्र ठेवले. नंतर तिचे विस्कटलेले जीवितधागे पुन्हा कधीच सांधले गेले नाहीत. तिची दखल वर्तमानाने घेतली नाहीच, पण भूतकाळानेही तिचा विचार केला नाही. गिरगावातील कांदेवाडी ते गुहागरमधील पालशेत यामध्येच ती अदृश्य झाली. हिराबाईंचे चरित्र म्हणजे एक रहस्यच. ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न तर लेखिकेने केलेला आहेच, शिवाय नाटय़ अभ्यासकांसाठी एक संदर्भग्रंथ ठरावा इतके मूल्य या ग्रंथास लेखिकेने प्राप्त करून दिलेले आहे.

या ग्रंथामध्ये नुसतेच हिराबाईंचे चरित्र अधोरेखित केलेले नसून तत्कालीन नाटय़व्यवस्थेच्या समग्र कालखंडाचे समर्पक चित्रणही समाविष्ट आहे. भाऊसाहेब कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, बालगंधर्व, गणपतराव बोडस यांच्यासारख्या नटश्रेष्ठांनी आणि नाटय़ाचार्य गो. ब. देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, काकासाहेब खाडिलकर, केळकर यांसारख्या नाटककारांनी हिराबाई पेडणेकर या गायिकेकडून चाली घेऊन आपली नाटके यशोशिखरावर पोहोचवली. अशी कर्तृत्वसिद्ध स्त्राr समाजव्यवस्थेच्या, रूढी-परंपरेच्या चौकटीतच बंदिस्त केली जाते. तिच्या न्याय्य हक्कांची कशा प्रकारे पायमल्ली होते हे पुस्तक वाचताना उलगडत जाते. शिल्पा सुर्वे यांनी अत्यंत चिकाटीने, अतिव परिश्रमाने वाचकांपुढे हा चरित्रगंथ ठेवलेला आहे. मराठी वाङ्मयात, नाटय़ अभ्यासकांसाठी तो तौलनिक ग्रंथ ठरेल यात तीळमात्रही संशय नाही. लेखिकेचे परिश्रम सार्थकी ठरण्याजोगे आहेत. डिंपल पब्लिकेशन प्रकाशित केलेल्या ग्रंथाला सरदार जाधव यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साजेसे आहे.

आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (चरित्रग्रंथ)
लेखिका- शिल्पा सुर्वे
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ- 120, मूल्य – रु. 130/-