आठवणींची रम्य सफर

1

>> देवेंद्र जाधव

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती असतात. त्यांच्याकडून कळत, नकळतपणे आपण बरंच काही शिकत असतो. त्यांच्याकडून शिकलेल्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टीच आपल्याला संपूर्ण आयुष्यात कुठेना कुठेतरी उपयोगी पडत असतात. अशा काही खास व्यक्तींना आपल्या हृदयाच्या कोपऱयात हक्काची जागा असते. काळ कितीही पुढे जात असला तरी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अशा व्यक्तींची हटकून आठवण येत असते. आयुष्यातल्या अशाच खास व्यक्तींच्या आठवणींना विजय पाडळकर यांनी ‘जिवलग’ या ललित लेख संग्रहातून शब्दरूप दिलं आहे.

विजय पाडळकर हे नाव मराठी साहित्यक्षेत्राला नवं नाही. पाडळकरांच्या ‘देखिला अक्षरांचा मेळावा’ या पहिल्याच पुस्तकाची मराठी साहित्यक्षेत्रात दखल घेतली गेली. त्यानंतर त्यांच्या अनेक पुस्तकांनी मराठी साहित्यक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. गुलजारजींच्या प्रभावाने प्रेरित झालेले पाडळकर यांनी ‘रावीपार’, ‘एक स्वप्न पुनः पुन्हा’ इ.च्या माध्यमातून गुलजारजींच्या साहित्याचे मराठीत अनुवाद केले. विजय पाडळकरांना आजवर अनेक माणसांचा सहवास मिळाला. या माणसांच्या सहवासात ते एक व्यक्ती म्हणून समृद्ध होत गेले. ‘जिवलग’मधून पाडळकर यांनी अशाच माणसांच्या आठवणी जागवल्या आहेत.

‘ताई’ हा जिवलगमधील पहिला ललित लेख. लेखक आईला ताई म्हणायचे. सहज जुनी ट्रंक उघडल्यावर लेखकांना आईचं एक पत्रं सापडतं. त्या पत्रात आईने तिच्या माहेरच्या घराभोवतीच्या परिसराचं वर्णन केलं असतं. एरवी घरात मितभाषी असणाऱया आईचं हे पत्रं सापडल्यावर लेखक आईच्या आठवणीत कसा हरवून जातो हे यात वाचायला मिळतं.

‘बापू’ या लेखात सोलापूर येथे बँकेत कामाला असताना लेखकांना मराठीतला अग्रगण्य लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा समृद्ध सहवास मिळाला, याची माहिती मिळते. त्यांचं व्यक्तिमत्त्व मोजक्या शब्दांत आपल्यासमोर उभं केलं आहे. गुलजारजींच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश तसेच माणूस आणि कलावंत म्हणून गुलजारजींचा घेतलेला शोध ‘खुबसूरत’मधून आपल्या प्रत्ययास येतो. ‘धर्मापुरीकर अँण्ड सन्स’ या काहीशा दीर्घ लेखात कंधारला वास्तव्यास असताना ज्या धर्मापुरीकर कुटुंबाचा लेखकाशी संबंध आला त्या संपूर्ण कुटुंबाची ओळख नर्मविनोदी शैलीत लेखकांनी आपल्याला करून दिली आहे. खूप साऱया व्यक्तिरेखांबद्दल सांगत असूनही प्रत्येक माणसाच्या स्वभावामधला वेगळा पैलू लेखकांनी अचूक टिपला आहे. त्याचबरोबर ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या लेखात लेखकांनी स्वतःच्या मुलीचा जिद्दी आणि वेगळा प्रवास शब्दबद्ध केला आहे.

विजय पाडळकरांची भाषेवरची हुकूमत आणि शब्दांचा अनोखा खजिना याचा प्रत्यय हे लेख वाचून येतो. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती, तत्कालीन सामाजिक आणि कौटुंबिक जीवनशैलीचे चित्रण यात केलं आहे. ‘अस्तित्वाच्या खुणा दीर्घकाळ टिकून राहाव्या यासाठी माणसाची केविलवाणी धडपड असते (ताई).’ तसेच ‘खोटा असतो तो विश्वास. आपले माणूस सतत जवळ राहील याचा भ्रम (समानधर्मा).’ यांसारखी वाक्यं आपल्या मनात रेंगाळत राहतात.

‘जिवलग’ वाचताना ज्या माणसांचे लेखकांशी संबंध आले ते संबंध जिव्हाळ्याचे, निःस्वार्थी मैत्रीचे आणि निस्सीम प्रेमाचे असे होते. त्यामुळे नोकरीमधल्या बदलीमुळे जेव्हा लेखकांना त्या माणसांपासून दूर जावे लागले तेव्हा ‘जिवलगांना’ दुःख झाल्याचे दिसून येते. यावरूनच विजय पाडळकरांच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या स्वभावाची प्रचीती होते. राहून राहून एकच वाटतं की, ज्यांचा उल्लेख पाडळकरांनी ‘जिवलग’मध्ये केला आहे त्यांचे छायाचित्र लेखांसोबत समाविष्ट करायला हवे होते. जेणेकरून वाचक म्हणून आपल्याला या माणसांचा अधिक जवळून वेध घेता आला असता. ही ‘जिवलग’ माणसं वाचून वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण नक्कीच समृद्ध होतो.

जिवलग
लेखक – विजय पाडळकर
प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन
पृष्ठसंख्या – १६५
मूल्य – रु. २००