कथा लिहिणं म्हणजे शोध घेणं

>> प्रणव सखदेव

तरुण व प्रयोगशील लेखक प्रणव सखदेव यांचा ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हा कथासंग्रह रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यात एकूण आठ कथा असून त्यातल्या ‘ऍबॉर्शन’ या कथेच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलचा हा लेख.

नातेसंबंधांमधलं राजकारण, अपराधभाव आणि सोशल मीडियामुळे नातेसंबंधात झालेले बदल हे ‘ऍबॉर्शन’ या कथेचं मुख्य कथानक आहे. हे कथानक मला वैयक्तिक अनुभवातून आणि आजूबाजूच्या लग्न झालेल्या जोडप्यांच्या निरीक्षणातून सुचलं. एक लेखक म्हणून मला हा विषय कायमच आकर्षित करीत आलेला आहे. याआधी मी तशा कथाही लिहिलेल्या आहेत, पण या कथेचा विचार करताना मी मुख्य कथानकाला काही उपकथानकंही जोडली. कारण त्यामुळे कथेचा आवाका वाढेल असं मला वाटलं. ही उपकथानकं अशी – जगण्यात आलेला तोचतोचपणा, वैवाहिक जीवनावरचे बाह्य व अंतर्गत दबाव, मुक्त लैंगिकता आणि कर्मठ वृत्ती यातले अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारा गोंधळ, निवडीच्या असंख्य पर्यायांमुळे आलेला फटिग, मोठय़ा शहरात स्थलांतरित झालेल्यांचं आयुष्य इ.

कथेत स्थलांतरितांचे स्तर घ्यावेत ही कल्पना मला मी केलेल्या अनुवादाच्या कामामुळे सुचली. मला २०१५-१६ सालासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळाली होती. त्याअंतर्गत मी इझाबेल विल्करसन लिखित ‘वॉर्म्थ ऑफ अदर सन्स’ या पुस्तकाचा अनुवाद केला होता. हे अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णीयांच्या स्थलांतराविषयी आहे. ते वाचताना माझ्या असं लक्षात आलं की, आपल्याकडेही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झालं आहे आणि अजूनही होत आहे. त्यामुळे जर आपण असं काहीतरी उपकथानक कथेत आणू शकलो, तर त्याला वेगळा पैलू प्राप्त होऊ शकतो. म्हणून मग या कथेत मी तीन स्थलांतरं दाखवली – १) मोठय़ा शहरात आलेलं कथेतलं मुख्य जोडपं, ज्यांच्यावर टिकून राहण्यासाठीचा एक दबाव आहे. २) छोटय़ा शहरातून थेट परदेशात गेलेली तरुणी, जिला तिथे अचानक मोकळीक मिळाली आहे. ३) उत्तर प्रदेशातून आलेला वॉचमन, जो सामाजिक-आर्थिक उतरंडीत खालच्या स्तरावर आहे.

ही सगळी सामग्री गोळा झाल्यानंतर मी कथेच्या घाटाच्या शोधात होतो. तेव्हा टीव्ही मालिका हे आजच्या काळातलं सर्वात प्रभावी दृश्य माध्यम असल्याचं मला समजलं. म्हणून या कथेसाठी मी एपिसोडिक फॉरमॅटचा वापर करायचा हे ठरवलं.

हे सगळं ठरल्यानंतर कथेचा पहिला खर्डा, मग दुसरा खर्डा केला. बऱयाचदा दुसऱया खडर्य़ानंतर मी कथा बाजूला ठेवून देतो आणि काही काळाने पुन्हा पाहतो. दुसऱया खडर्य़ानंतर मला कथेत काहीतरी ‘ट्विस्ट’ हवा असं वाटलं, खासकरून शेवटी. एकदा ‘मॉडर्न फॅमिली’ ही अमेरिकन टीव्ही मालिका पाहताना मला कल्पना सुचली. त्या मालिकेत प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला एक छोटासा प्रसंग असतो, जो कधी त्या एपिसोडचा विषय काय असेल हे सुचवतो तर कधी रंगत वाढवणारा असतो आणि त्यातून कल्पना सुचली की, कथेची सुरुवात व्हायच्या आधीच रविवारी मध्यरात्री कथेत आर्यनने व्हॉट्स ऍपवर एक मेसेज वाचल्याचं आणि त्याने तो सुन्न झाल्याचं दाखवायचं, पण मेसेज काय होता हे कथेच्या शेवटी सांगायचं.

कथा जेव्हा प्रत्यक्षात लिहिली जाते तेव्हा ती खऱया अर्थाने घडते. मी बऱयाचदा पात्रं कशी असतील, त्यांच्या आयुष्यात काय होईल, त्यांची पार्श्वभूमी इ. गोष्टींचे आराखडे तयार करतो. पण जेव्हा कथा रचण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा या आराखडय़ांबाहेरच्या गोष्टी कथेत येण्यास सुरुवात होते. इथे नेणीव हे बल कार्यरत होतं. या बांधकामातल्या नेणिवेच्या विटा अद्भुत आणि अचंबित करणाऱया असतात. जसं की, या कथेतला वॉचमन माझ्या आराखडय़ापेक्षा खूपच वेगळा उभा राहिला. आता त्याकडे पाहताना मला असं वाटतं की, हा वॉचमन मी लहानपणी कधीतरी पाहिलेला असावा. तो जसाच्या तसा अर्थातच गोष्टीत आलेला नाही. कारण मी तो घडवलेला आहे, पण त्याचं बोलणं मी कधीतरी ऐकलं असावं. मला लहानपणापासून ऑफिस बॉय, वॉचमन, रस्त्यावरचे भिकारी-वेडे किंवा एटीएममधले सिक्युरिटी गार्ड यांच्याबद्दल एक सुप्त आकर्षण आणि आत्मीयता वाटत आलेली आहे. अशी अनेक माणसं, अनुभव आपण आपल्या मनात साठवून ठेवलेली असतात. ती लिहिताना बाहेर येतात.

अशा प्रकारे नेणीव ‘पर्फेक्ट’ वाटणारं लेखन ‘इम्पर्फेक्ट’ करायचं काम करते. कारण माणसं ‘पर्फेक्ट’ नसतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणारी कथा-कादंबरीही पर्फेक्ट नसते. नेणीव लेखनाला सैलता, मुक्तपणा आणि तरलता देण्याचं काम करते.

एका अर्थी लेखन करणं हे आपल्या मनाच्या अंधाऱया कोपऱयांमध्ये जाण्याचं, कधीतरी आपण टिपून ठेवलेल्या गोष्टींकडे पुन्हा वळून पाहण्याचं आणि या अज्ञात जगाचं खनन करण्याचं काम असतं. या खननातून काय बाहेर पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एक भीतीही वाटते आणि या भीतीच्या सुप्त आकर्षणामुळे मी लिहितो. नेणिवेतल्या अचंबित करणाऱया या अनिश्चितपणामुळे कथालेखन मला सारखं खेचत राहतं, मला लिहितं करत राहतं. लेखन हा एक शोध असतो. एखादं कोडं आपल्या पद्धतीने वेगळय़ा कोडय़ात रूपांतरित करण्याचं ते काम असतं असं मला वाटतं.

नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
प्रकाशन = रोहन प्रकाशन
पृष्ठ- १७२
मूल्य – २०० रुपये
मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी