नव्वदोत्तरी साहित्यसंपदा

253

>> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे

महिला कला महाविद्यालय उमरेड, जि. नागपूरचे प्राचार्य डॉ. सत्यवान शंकरराव मेश्राम यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती निमित्ताने ‘नव्वदोत्तर मराठी साहित्य’ हा गौरव ग्रंथ प्रकाशित केला आहे. संपादक मंडळाने या गौरव ग्रंथात सुमारे 16 वाङ्मयीन लेख समाविष्ट केले आहेत. नाटक, कविता, आत्मकथने, कादंबरी, ग्रामीण कथा – आंबेडकरी कथा, वन साहित्य, विनोद, रंगभूमी इत्यादी परिक्षेत्रासंबंधी इतिहासमुखी, परिचयपर हे सर्वच लेख आहेत. समकालीन वाचन व्यवहार, ग्रंथ व्यवहार, मराठी भाषा यासंबंधी दखलपात्र लेख असले तरीही मराठी साहित्य-विचारासंबंधी काहीएक हाती लागत नाही. ग्रंथाच्या गौरव पुरवणीत डॉ. मेश्रामांसंबंधी माहिती असून त्यात लेखक-संपादकांचा परिचय आवर्जून आहे. या सर्व लेखांमागे जागतिकीकरणाचा संदर्भ आहे. तथापि हे संकलन ‘नव्वदोत्तर’ का याचा तपशील ‘संपादकीय’मध्ये आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ात या साहित्य प्रकारांचीच वैशिष्टय़े काहीशी धूसर झालेली दिसतात. सामान्य माणसाची जीवनशैली बदलली. त्याच्या वैचारिक निष्ठा प्रखर आणि प्रभावी राहिल्या नाहीत. व्यक्तिगत सुखाला महत्त्व आले. त्याच्या निष्ठा आणि विचारधारांना धक्के पोहोचले. त्यावर गंज चढल्यासारखे वाटू लागले आहे. जागतिकीकरणाच्या कचाटय़ात सापडलेले, स्वप्नरंजनात्मक, वैचारिकदृष्टय़ा अधिक मुक्त, कधी आक्रंदलेले, आक्रस्ताळे झाले. आज खा-उ-जांच्या प्रचंड प्रभावाच्या गर्तेत जीवनाची- साहित्याची क्षेत्रे सापडली आहेत. अर्थक्रांती ते शेतकरी आत्महत्यापर्यंतचे पडसाद आजच्या मराठी साहित्यात दिसतात. वैचारिक गोंधळ सुरू असताना जागतिक वैचारिक प्रदूषणाला अटकाव करण्याचाही प्रयत्न दिसतो.

समाज आणि जीवनातील बदल, ढासळलेली कुटुंबव्यवस्था, नवतंत्रज्ञानाचा अतिरेक, स्वातंत्र्याचा गैरवापर, लैंगिकतेचे उग्र प्रश्न हेच आजचे वास्तव विद्यमान लेखक चित्रित करीत आहेत. सामाजिक समस्याचा जीवघेणा उद्रेक, व्यक्तिकेंद्रित आधुनिकतावाद प्रकर्षाने दिसतात. कोणताही वैचारिक इझम आज अग्रकेंद्री नाही.
या ग्रंथात समकालीन वाङ्मय प्रकारांवर आणि प्रवाहांवर लेख आहेत. उत्तर आधुनिकता ते झाडीपट्टी रंगभूमीपर्यंतचे लेख आहेत. उत्तर आधुनिकता आणि नव्वदोत्तर दलित कविता (डॉ. देवानंद सोनटक्के) नव्वदोत्तर मराठी लघु कादंबरी (डॉ. मदन कुलकर्णी) हे लेख उल्लेखनीय आहेत. नव्वदोत्तर स्त्र्ााr-आत्मकथने, मराठी कादंबरी हे लेख जागतिकीकरणाने स्त्र्ााr जाणिवेत आणि आस्थनेत झालेल्या परिवर्तनाचे दर्शन घडवतात. प्रज्ञा आपटे यांनी 1990 नंतरच्या कवितेतील वास्तव या लेखात मराठी कवितेचा आढावा घेतला आहे. मिलिंद चोपकर यांनी ‘समकालीन वनविषयक मराठी साहित्य’मधून वनविषयक साहित्याचा परिचय करून दिला आहे. त्यात पर्यावरणाचे महत्त्वही कथन केले आहे. ‘जागतिकीकरण आणि ग्रंथव्यवहार’ या लेखात अरुण जाखडे यांनी जागतिकीकरणात समाज विचारशून्य करायचा आहे का? हा गंभीर प्रश्न उपस्थित करून ‘माणसाकडे केवळ उपभोक्ता म्हणून पाहिले जाते’ ही खंत व्यक्त केली आहे. दलित-आंबेडकरवादी कथा हा लेख दखलपात्र आहे. ‘दशकभरातले प्रायोगिक नाटक’ (माधव वझे), विनोदी वाङ्मय (सुधीर रायपूरकर), वाचन संस्कृतीवर क्ष-किरण (राजेंद्र नाईकवाडे), मराठी भाषेपुढील आव्हाने (अजय कुलकर्णी), कादंबरीतील सामाजिकता (राखी जाधव), झाडीपट्टी रंगभूमी (संजय निंबेकर), कवयित्रीची कविता (पद्मरेखा धनकर), कादंबरीतील स्त्र्ााr जीवन (विनिता हिंगे) हे लेख नव्या पिढीच्या अभ्यासकांना, समीक्षकांना संदर्भासाठी उपयुक्त होतील असेच आहेत. अजय कुळकर्णी यांनी डॉ. सत्यवान मेश्राम यांची मुलाखत घेऊन डॉ. मेश्रामांचा परिचय घडवला आहे.

वैयक्तिक म्हणून दुर्लक्षित झालेल्या अनेक समस्या गेल्या 25 वर्षांत सामाजिक समस्या म्हणून अक्राळविक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच साहित्यातून त्याची प्रतिक्रिया उमटताना दिसते. संस्कार, नैतिकता यांच्या आधारानेच देशाची एकात्मताही टिकणार आहे आणि अस्तित्वही. एकीकडे अत्यंत व्यक्तिकेंद्रित आणि भान हरवलेल्या उत्तर आधुनिकतावादाने व्यक्तीला अधिक संकुचित करण्याचा चंग बांधलेला असताना आपली भारतीयत्वकेंद्री राजनीती वैश्विक भान जपत समाजक्रेंद्रिततेला अधिक व्यापक रूप देताना दिसते. भारतीयत्वाच्या विचारांची अधिक प्रकर्षाने गरज भासत असताना अनेक वाद म्हणजे इझमला आता चांगले दिवस राहिले नाहीत. मार्क्सवाद असो की स्त्र्ााrवाद की आणखी कुठलाही वाद. त्यांची वैचारिक फरपट होताना दिसत आहे.

आज जे काही शिल्लक आहे ते केवळ कागदावर. या जागतिकीकरणात आपण अधिक व्यक्तिकेंद्री होत चाललो आहोत. पुन्हा आपल्याला समाजाकडे वळावे लागणार आहे. त्यासाठी केवळ आणि केवळ अस्सल भारतीयत्वचा विचारच आपल्याला तारू शकतो, ही वैचारिक भूमिका ‘नव्वदोत्तर मराठी साहित्य’च्या संपादनामागे, संकलनामागे आहे.

महाराष्ट्रातील काही प्राध्यापकांनी, विचारवंतांनी लिहिलेल्या लेखांनी ‘नव्वदोत्तर मराठी साहित्य’ हा ग्रंथ नव्या अभ्यासकांना आणि चाणाक्ष वाचकांना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा नाकारता येत नाही.

नव्वदोत्तर मराठी साहित्य – गौरव ग्रंथ
संपादक मंडळ
प्रकाशन – विजय प्रकाशन
पृष्ठs – 252 किंमत – 350 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या