‘एअर इंडिया’चा प्रवास

>> अरविंद दोडे

श्रीमंत लोकांचा प्रवास विमानातून होतो. विमान आकाशातून निघून जाताना गरीब माणूस मान वर करून पाहतो. विमानाची घरघर कानात वाजत राहते. सामान्य जनांचा एवढाच संबंध, ‘दुरून डोंगर साजरे’! विमानतळावर नोकरी मिळणे किंवा विमानात नोकरदार म्हणून सतत जगभर प्रवास करणे हे खरोखरच परमभाग्य! नितीन तेंडुलकर हे सुमारे ३० वर्षे ‘एअर इंडिया’त नोकरी करून निवृत्त झाले आणि त्यांनी तेथील आठवणी लिहून काढल्या. अशा स्मृतिशलाका वाचकांना प्रकाश देतात, मार्गदर्शन करतात आणि एका शाही जीवनाचे दर्शन घडवतात, म्हणून असे पुस्तक इतर पुस्तकांच्या गोतावळय़ात अधिक उठून दिसते. वाचावेसे वाटते.

लेखक एक कवी म्हणून प्रसिद्ध आहेच. ‘पावसाळा’, ‘झाडं’ आणि ‘देव’ हे तीन काव्यसंग्रह रसिकप्रिय झालेत. ‘उडता उडता’ हे प्रवासानुभवांचे पुस्तकही जाणकारांनी वाखाणले आहे.

‘प्रवास महाराजासोबतचा’ या पुस्तकाचा बाज वेगळा आहे. जगभर नोकरीनिमित्त फिरताना प्रत्येक देश, त्याची संस्कृती (खाद्यांसह) वेगळी. जगात कितीही, कुठेही फिरला तर माणूस अखेर आपल्या घरातच स्वर्गीय सुख अनुभवतो याची प्रचीती या प्रवासातून येते. याचा आरंभ शेवटापासून झाल्याने गुलजारजींच्या चित्रपटाप्रमाणे एक दर्जेदार कलाकृतीचा अनुभव येतो. पहिल्या प्रकरणात निवृत्तीची कथा आहे. मागे वळून पाहताना बेकारीच्या झळा कशा बसल्या याची कल्पना येते. एक कवी जागतिक कीर्तीच्या भल्यामोठय़ा विमानतळावर नोकरीस लागतो. इथूनच वाचक यात नकळतपणे मनाने गुंतत जातो. ११ ऑगस्ट ८४ रोजी लेखक सहार विमानतळावर रुजू झाला. तीन पाळय़ांतील कर्तव्य बजावताना नमुनेदार माणसे भेटतात. तसेच रात्री, पहाटेच्या मिट्ट काळोखात चोरांपेक्षा कुत्र्यांची भीती कशी वाटायची. ‘वरकमाई’चे तत्त्वज्ञान कसे विचित्र असते हे लक्षात येते. वेगवेगळय़ा विभागात करताना ‘अतिश्रेष्ठाr’ कसे हरामखोर आणि बिनडोक भेटतात, तर किशोरकुमारसारखा कलाकार श्रेष्ठ असूनही रांगेत उभा राहतो, अशा छोटय़ामोठय़ा प्रसंगांनी वाचक खूप काही शिकत ‘मोठा’ होत जातो.

प्रेमळ परिवारात पत्नी, मुले आणि लेखकाचे वडील हे कवी, प्राध्यापक रमेश तेंडुलकर, आई रजनी, भाऊ सचिन तेंडुलकर आणि अजित… असा नामवंत गोतावळा. घरातल्या प्रसन्न साहित्यग्रंथांच्या गणगोतात वाढलेला लेखक जमीन आणि अस्मानाचे अनुभव नोंदवतो, तेव्हा हा साहित्य प्रकार आत्मकथनात्मकाबरोबरच जगप्रवासाचा अभिनव वर्णनात्मक नोंदीचा अविस्मरणीय अनुभव ठरतो. अरब देशातील कडक कायदे, झटपट निकाल लावणारे, देशोदेशी बघितलेली स्वच्छता हे सारेच चक्रावून टाकणारे. ‘एअर इंडिया’चा ‘महाराजा’ एकेकाळी प्रतीक म्हणून सर्वांना ठाऊक होता, पण काही दीडशहाण्या विद्वानांनी ही राजेशाहीची शान घालवली आणि हा देश लोकशाहीवादी असल्याचे दाखवून दिले. राजकारण्यांची हुकूमशाही त्या विद्वानांनी निमूटपणे स्वीकारल्याचे दिसून आले. असो. या पुस्तकावर मोठी समीक्षा व्हायला हवी. हा केवळ परिचय आहे. यातील उपशीर्षकांमुळे प्रत्येक मुद्दा ठळकपणे लक्षात येतो. विमानात बॉम्ब, आतंकवादी, मृत्यू अशा अनेक गोष्टी एखाद्या डायरीत रसाळपणे लिहाव्यात, तशा दिलखुलास आहेत.

प्रवास ‘महाराजा’सोबतचा / आठवणी
लेखक – नितीन तेंडुलकर
प्रकाशन – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ- २६३
मूल्य – ३०० रुपये