भले बुद्धीचे सागर एम.व्ही, ऐसे क्वचितचि होणार।।


>> मल्हार गोखले

एम. व्ही. म्हणजे मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांचा जन्म 1861 सालचा आणि मृत्यू 1962 सालचा. 101 वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. अजाणत्या बालपणातील काही वर्षे सोडता या प्रदीर्घ आयुष्यातील क्षण न् क्षण त्यांनी सार्थकी लावला. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ ही पदवी दिली, तर स्वतंत्र हिंदुस्थान सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी दिली. मात्र समाजात सर्वत्र त्यांना ‘एम.व्ही.’ या आद्याक्षरांनीच संबोधले जात असे. त्यांना स्वतःलाही तेच आवडत असे.

होते तरी कोण हे एम.व्ही.? ते कोण होते, असे विचारण्यापेक्षा ते कोण नव्हते, असे विचारायला हवे. ते ब्रिटिश काळातले आणि स्वातंत्र्योत्तर काळातले देशातले सर्वोत्कृष्ट इंजिनीयर – अभियंता होते. ते अर्थतज्ञ होते. ते शिक्षणतज्ञ होते. ते उत्तम प्रशासक होते. ते द्रष्टे उद्योजक होते. ते लेखक होते. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे आपला हा हिंदुस्थान देश वैभवसंपन्न झाला पाहिजे आणि ते वैभव देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे या भावनेने ते अखंड कार्यरत होते. अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोर शिस्तीने अविरत कार्यमग्न राहणे हा त्यांचा महान गुण होता. ते स्वतः अखंड काम करीत आणि इतरांकडून करवून घेत.

त्यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम. परंतु त्यांचे पूर्वज कर्नाटकमध्ये आले. सन 1884 मध्ये एम. व्ही. पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून पदवी मिळवून बाहेर पडताना तत्कालीन मुंबई राज्यात पहिले आले.

आता इतक्या हुशार विद्यार्थ्याला ब्रिटिश सरकार पी.डब्ल्यू.डी. म्हणजेच सार्वजनिक बांधकाम खात्यात घेणार हे उघडच होते. त्यानुसार त्यांना मुंबई प्रांतांतर्गत खान्देश विभागाचे असिस्टंट इंजिनीयर म्हणून धुळे येथे नेमणूक मिळाली. यशस्वी इंजिनीयर व्हायचे असेल तर स्थानिक लोकांमध्ये मिसळा. त्यांच्या भाषेत बोला. त्यांच्या समस्या जाणून घ्या, या आपल्या गुरूंच्या सल्ल्यानुसार एम. व्ही. पुण्यात साक्षात महर्षी कर्व्यांकडून मराठी शिकले.

1884 सालच्या पावसाळय़ात धुळे जिह्यातील दातर्ती येथील पाटबंधारा उभा करणे हे आपल्या कारकिर्दीतले पहिले अत्यंत आव्हानात्मक काम त्यांनी विलक्षण बुद्धिमत्तेने प्रत्यक्षात आणले. त्यासाठी त्यांनी वक्रनलिका किंवा सायफन पद्धतीचा उपयोग केला. या पद्धतीचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी आणि शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी करणारे एम.व्ही. हे पहिलेच.

यानंतर त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असंख्य नवनवे विक्रम आणि नवनवे मानदंड स्थापित केले. वक्रनलिकेचा उपयोग करणारे पहिलेच, धरणाच्या स्वयंचलित दरवाजाचा वापर करणारे पहिलेच, कावेरी नदीवर कृष्णराजसागर हे संपूर्ण दगडी धरण बांधणारे पहिलेच, अरबस्तानातील ब्रिटिशांचे फार महत्त्वाचे सैनिकी केंद्र एडन बंदर येथे जॅकवेल आणि परकोलेशन पद्धत वापरून तिथला पाणी प्रश्न सोडवणारे पहिलेच, ब्रिटिशांव्यतिरिक्त ‘म्हैसूर विद्यापीठ’ या नावाने स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करणारे पहिलेच.

राष्ट्रातील कर्तबगार व्यक्तींची चरित्रे म्हणजेच राष्ट्राचा इतिहास, अशीदेखील इतिहासाची व्याख्या केली जाते. धुळे शहराचे रहिवासी आणि उत्तम लेखक असणारे मुकुंद धाराशिवकर यांनी प्रस्तुत ‘सर विश्वेश्वरय्या’ या छोटय़ाशा चरित्रातून एका महान व्यक्तीचा परिचय करून दिला आहे. लेखक स्वतः विज्ञान, पर्यावरण आणि जल व्यवस्थापन या क्षेत्रांमधले जाणकार अभ्यासक असल्यामुळे देशातल्या सर्वोच्च इंजिनीयरबद्दलचे त्यांचे हे लिखाण तशाच जाणकारीने आणि भारदस्तपणे शब्दांकित झाले आहे. हे छोटे चरित्र वाचल्यावर एम.व्हीं.चे समग्र, मोठे चरित्र वाचलेच पाहिजे अशी ओढ वाचकाला लागते, हेच लेखकाचे यश.

संतुक गोलेगावकर यांचे देखणे मुखपृष्ठ आणि साकेत प्रकाशनाची एकंदर निर्मिती सुबक.

सर विश्वेश्वरय्या
लेखक – मुकुंद धाराशीवकर
प्रकाशक – साकेत प्रकाशन
पृष्ठ- 135
मूल्य – 150 रुपये.