‘देवां’ची करणी, अजरामर गाणी!


>> अरुण मालेगावकर

प्रतिभावंत गीतकार आणि संगीतकार यशवंत देव हे आता नव्वद वर्षांची वयोमर्यादा ओलांडून शंभरीकडे वाटचाल करीत आहेत. नशीब घेऊन आलेल्या मोजक्या कलावंतांपैकी ते एक आहेत. जीवनाची सुरेल मैफल सजवणाऱया या देवांचे विस्तृत आणि रसाळ चरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.

सुमारे 70 वर्षे संगीताच्या विश्वात सेवा करून मान्यताप्राप्त करणारे, अनेक पुरस्कारांचे धनी देव हे प्रत्येक वाटेवर यशवंत कसे ठरले हे नवोदित कलाकारांनी आवर्जून वाचायला हवे असे महत्त्वपूर्ण आहे कारण हे केवळ चरित्र नाही, तर 70 वर्षांतील भावगीतांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांची पत्नी करुणा देव या एकेकाळी रेडिओस्टार होत्या. त्यांच्या सहजीवनाचा आलेख म्हणजे मैत्री, प्रेम आणि सफल संसाराचा आदर्श कसा आहे हे वाचणेसुद्धा फारच मार्गदर्शक आहे. देवांच्या आत्मिक उन्नतीमागे आध्यात्मिक बळ आहे, त्याच बळावर ते संन्यासी, पण संसारी जीवन उच्च वैचारिक पातळीवर कसे जगले अन् जगताहेत याबाबतची गुरुकृपा वाचकांची श्रद्धाभक्ती वाढवते.

देवांची विडंबनगीते, संगीत-कार्यशाळा, शब्दप्रधान गायकीचा घरंदाजपणा यांसह त्यांच्या कार्याचा ‘पट’ अखेरीस दिलेला आहे. प्रा. प्रवीण दवणे यांची प्रस्तावना सुरेल आहे.

यशवंत देव / चरित्र,
लेखक – अशोक चिटणीस,
प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठ – 312,मूल्य – 350 रु.