सहजसुंदर आविष्कार

2

>> नमिता श्रीकांत दामले

‘झिपरी’ या कादंबरीचे लेखक परिवर्तनवादी विचारसरणीचे असून विलास राजे यांची निबंध, कथा, लेख, काव्य अशी सक्रिय संपदा आहे. एका उत्तम वक्त्याची ‘झिपरी’ ही सहजसुंदर अभिव्यक्ती आहे.

सखू ही या कथानकाची नायिका आहे. झिपरी हे तिचे लाडके नाव. सखूचे नशीब आणि सखूचा स्वभाव या दोन बिंदूंमध्ये या कथानकातील नाटय़ सामावलेले आहे. झिपरीचे भवताल आणि झिपरीचे शिक्षण यांचा विचार केला तर झिपरीच्या विचारांची झेप आपल्याला थक्क करून सोडते.

कादंबरीच्या सुरुवातीला कुंभारवाडय़ाचे आणि गावातील वातावरणाचे वर्णन हुबेहूब दृश्य डोळय़ांसमोर उभे करते. महादू-पारूच्या संसारवेलीवर सात-आठ वर्षांनी सखूचे फूल आले, पण ती लहान असतानाच पारू हे जग सोडून गेली. सातवीच्या परीक्षेनंतर झिपरीची शाळा संपली आणि मग झिपरी महादूबरोबर गुरे राखणीसाठी जाऊ लागली. या निसर्गाने, नदीने, डोंगरदऱयांनी आणि गुराढोरांनी झिपरीला जीवनातले महत्त्वाचे धडे आणि भरभरून आनंद दिला.

झिपरीच्या जीवनात घडणाऱया घटना अत्यंत वेगवान आहेत. झिपरी-गजाची ताटातूट झाल्यानंतरही धीराने घेणाऱया झिपरीच्या वाटय़ाला पुढेही दुःखाचे ताट वाढून ठेवलेले असते. परिस्थिती कशीही असली तरी खंबीरपणे उभी राहणारी झिपरी वाचकांच्या मनात घर करते आणि तिच्यापुढे तिच्या मैत्रिणी, गजा ही सारी पात्रे अत्यंत फिकी ठरतात. सुष्ट-दुष्ट स्वभावाची माणसे झिपरीच्या आयुष्यात येतात. परिस्थितीच्या भोवऱयात सापडले तरी गरगर फिरत न राहता इतरांना आधार देणारी झिपरी आणि तिची कथा बाळबोध आणि निरागस आहे. उच्च साहित्यिक मूल्य, अलंकारिक भाषासौंदर्य, मनोव्यापारांची गुंतागुंत असे काहीच नसले तरी झिपरीचा साधेपणा मात्र मनाला भावून जातो.

झिपरी
लेखक – विलास राजे,
प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे-33.
पृष्ठ – 108, -रु. 160/