छंद प्रितीचा, तमाशाच तमाशा

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

तंबू ठोकायचा आणि त्यात सिनेमा लावायचा हा उद्देश असेल तर ‘छंद प्रीतीचा’ या सिनेमाला लई टाळय़ा आणि शिटय़ा मिळतील. काय तो मेलोड्रामा… दहा संवादांमागे एक लावणी, शिटय़ा पडाव्यात अशी प्रणयाची दृष्यं, (दिसायला) रजनीकांतचा अगदी गोरागोमटा, गुळगुळीत अवतार वाटावा असा फिल्मी हीरो आणि सोबत चक्क स्टारांचा स्टार सुबोध भावे! काय म्हणजे नादच नाही, पण हे सगळं पन्नास वर्षांपूर्वी येणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये शोभलं असतं आणि आताच्या काळात गावच्या जत्रेतील तंबूतच खपू शकेल, पण सध्याच्या काळात अनेक दर्जेदार सिनेमांच्या यादीत जर या सिनेमाची गणती करायची असली तर या सिनेमाने जपलेलं गांभीर्य किंवा त्याची मेलोड्रामॅटिक मांडणी केवळ हास्यास्पद वाटते.

लहानपणीच एका गावात लहानाची मोठी झालेली मुलं. पाटलांचा श्रीमंत मुलगा भलताच दिलदार स्वभावाचा असतो. त्याला शायरी करायला आवडत असते. कोणावर अन्याय होऊ नये म्हणून तो पुढाकार घेत असतो. त्याच गावात तमासगिरणीची एक देखणी मुलगी आश्रित म्हणून राहत असते. तिला नाचाची आवड असते. तर ही मुलं गावातच मोठी होतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात. तो शाहीर, ती नर्तकी… तो देखणा, ती सुंदर…तो आणि ती यांचं सगळं परफेक्ट असतं आणि ते दोघे मिळून तमाशा काढायचं ठरवतात. सगळं कसं ठरवल्यासारखं छापील, देखणं सुरू असतं. प्रेमही फुलत असतं. मग अचानक या प्रेमाला तिसरा कोन येतो आणि मग शृंगारासोबत राग, प्रेम, फसवणूक, त्याग, अहंकार असे सगळे रस अगदी फसफसून वाहायला लागतात… असा हा सिनेमा.

ही कथा फ्लॅशबॅकने सुरू केलीय. कथा मांडायची ही पद्धत प्रचंड गुळगुळीत आहे. तरीही एकवेळ खपून जाते, पण नंतर घडणाऱया घटना एवढय़ा छापील आहेत की, ‘अति झालं आणि हसू आलं’ अशी अवस्था होते. कथेत नावालाही वेगळेपण नाही. किंबहुना काळाच्या प्रचंड मागे असणारी ही कथा घडायच्या आधीच काय घडणार हे स्वतŠच सांगते आणि त्यामुळे जराही रंगत नाही. त्यात मेलोड्रामा नावाचं रसायन तर इतकं खच्चून भरलंय की, शेवटी तो खटाटोप केवळ हास्यास्पदच होतो.

या सिनेमामध्ये जर बघावं असं काही असेल तर तो फक्त लावणीचा बाज आहे. खरं तर यात असंख्य लावण्या आहेत, पण कदाचित सिनेमाला तेवढाच काय तो आधार आहे. त्यामुळे त्या असंख्य लावण्या खपून जातात. लावणीचे सेट, गाण्यांचा ठेका, त्यावरची शिटय़ा घेणारी नृत्यं या गोष्टी जमून आल्या आहेत. लावणीमधला सवाल जवाब हा प्रकारही पाहायला मिळतो आणि त्यातलं सारखं सारखं येणारं ‘‘ऐका…’’ हे सोडल्यास त्या जुगलबंदीतून बऱ्यापैकी करमणूक होते. नृत्याचे सेटही छान आहेत, पण हे एवढं सोडलं तर बाकी सिनेमा म्हणजे फुकाचा खटाटोपच आहे.

अतिशय पसरट पटकथा. हिरॉईनला एक वाईट माणूस त्रास देतो, तिला हीरो वाचवतो किंवा लहानपणी तो डफ वाजवतो आणि त्यावर ती भारावल्यासारखी नाचते. लहानपणी ज्याला डॉक्टर बनायला पैसे दिले नेमका तोच मोठेपणी डॉक्टर बनून वाटय़ाला येतो वगैरे वगैरे. या सगळय़ा गोष्टी इतक्या बाळबोध आहेत की, ‘‘अरे देवा!’’ असे उद्गार आपोआपच निघतात. या सगळय़ावर प्रचंड फिल्मी संवादांचं आवरण, सुबोध भावे वगळून बाकीच्या नवख्या कलाकारांची ओव्हर ऍक्टिंग (यात अगदी लहान मुलंही धरायला हवीत). ऍक्टिंगचा चान्स मिळालाय म्हणून चान्सवर डान्स केलाच पाहिजे असं काहीसं वाटून सगळय़ा कलाकारांनी अभिनय केलाय. अभिनेत्रीची फिगर आणि नृत्य झकास आहे, पण त्यापलीकडे तिच्यात काहीच दम नाही. हीरोचा दयाळूपणा दयनीय वाटतो. सुबोध भावेच्या वाटय़ाला फार काम नाही आणि जाता जाता उगाच एक सिनेमा स्वीकारल्यासारखा त्याचा या सिनेमातला वावर आहे.

या सिनेमातल्या गोष्टी दिग्दर्शक स्वत:ला हव्या तशा घडवून आणतो. म्हणजे लावणीचा फड उभा करण्यातली धडपड, येणाऱ्या अडचणी इत्यादी गोष्टी दाखवल्याच नाहीत. सगळं कसं ठरवल्यासारखं घडतं. नंतर भेटणारा डॉक्टर, डोळय़ांचं ऑपरेशन इत्यादी गोष्टीही ठरवून घडवल्यासारख्याच. ना कुठला संघर्ष, ना कुठलं वेगळेपण. त्यामुळे सिनेमा कमालीचा साचेबद्ध होतो आणि त्याला मर्यादा येतात.

प्रेमभंग झाल्यावर चंद्रावर प्रेयसीचा चेहरा दिसणं किंवा डफलीवाल्याचा शोध आणि डफलीवाल्याचा संदर्भ शेवटी वापरणं ही तर अतिशयोक्तीची परिसीमाच. असो, तर अशाच्या छंदाच्या फंदात पडायचं असेल तर फक्त वेळ फुकट जात असेल तरच पडा किंवा लावण्या बघायची हौस असेल तर या वाटय़ाला जा. अन्यथा एवढा बाळबोध सिनेमा पाहण्यापेक्षा एखादा लहान मुलांचा सिनेमा पाहणं जास्त करमणुकीचं ठरेल

दर्जा : २ स्टार
सिनेमा : छंद प्रीतीचा
निर्माता : चंद्रकांत जाधव
दिग्दर्शन/लेखन : एन. रेळेकर
छायांकन : जितू आचरेकर
संगीत : प्रवीण कुंवर
कला : संतोष फुटाणे
कलाकार : सुबोध भावे, हर्ष कुलकर्णी, सुवर्णा काळे, शरद पोंक्षे, विकास समुद्रे.