लोभसवाणी ‘ही’


>> क्षितिज झारापकर

मराठी नाटय़ व्यवसायात नाटकांची पठडी ठरवण्याकडे खूप कल असतो. कुणीही नवीन नाटक करतोय म्हटलं की पहिला प्रश्न असतो काय आहे? कॉमेडी? थ्रिलर? कौटुंबिक? कलाकृतीची वर्गवारी करणं ही या धंद्याची जुनी सवय. त्यात पुन्हा ती कलाकृती जन्माला घालणाऱया रंगकर्मींच्या रुचीप्रमाणे पठडीचा कयास बांधण्याची जुनी खोड आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला नामू परीट म्हणतो ना ‘श्टोरी काय आहे… कॉम्डी की रडारड… आता पी. एल. साहेब लिवणार म्हणजे कॉम्डीच असणार की…’ं तसं. पण सध्याच्या काळात हा पठडींचा फरक मिटत चाललाय. एकंदरीतच समाजाचा वैयक्तिक सेन्स ऑफ ह्युमर वाढल्यामुळे की काय पण कोणत्याही विवेचनात, निरुपणात, सादरीकरणात हल्ली हास्यरस दिसतो. त्यामुळे आपला विषय मांडायला एखादी विशिष्ट पठडी हवी ही गरज आता उरली नाही. करमणूक ही पठडीमुळे होत नसून आशय, विषय आणि भावनेला हात घातल्याने होते हा समज नाहीसा झालेला आढळतो. राग, लोभ, मत्सर, द्वेश, करुणा, ममता, प्रेम, वियोग या सगळ्यांतून विविध प्रकारची करमणूक होऊ शकते.

वरील सर्व भावनांचा एक अनोखा मेळ असलेलं नाटक चंद्रकांत लोकरे यांनी एकदंत क्रिएश्नस् या संस्थेतर्फे आणि दिलीप जाधव यांच्या अष्टविनायकच्या सहयोगाने नुकतंच रंगभूमीवर आणलं आहे. नाटक आहे ‘आमच्या हिचं प्रकरण’. आता नावाच्या विश्लेषणातच बघा आम्ही आहोत, ज्यांच्या ठायी करुणा संभवते, आमची ही आहे, जिच्या वाटय़ाला ममता आणि प्रेम आहे. एक प्रकरण आहे ज्यातून प्रेम, मत्सर, द्वेष हे सारं येतं आणि मग प्रकरणाचं कारण आहे जिथे लोभ, वियोग आणि राग येतो. लेखक सचिन मोटे यांनी हे नाटक या सगळ्या भावनांचा खेळ करत अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे. मुळात त्यांनी ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे कोणत्याही एका पठडीत बसवण्याचा प्रयत्न केलेला नाही. लेखकानेच पठडी ठरवली की मग नाटकातल्या पात्रांच्या रचनेत मर्यादा येतात. पात्र एका पद्धतीची होत जातात. ‘आमच्या हिचं प्रकरण’मध्ये हे होत नाही. मोटेंनी प्रत्येक पात्राच्या बॅकग्राऊंडचा विचार करून इथे पात्रं योजली आहेत. त्यामुळे ‘आमच्या हिचं प्रकरण’मधली सगळी पात्रं ही खरी वाटतात. दोन पात्रं ही अतिरंजीत असली तरी ती भावतात. कारण त्यांच्या तसं असण्याला या नाटकाच्या फॉर्ममध्ये एक लॉजिक आहे. म्हणूनच ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे एक प्रामाणिक आणि चांगलं नाटक दिल्याबद्दल सचिन मोटे यांचं अभिनंदन.

सचिन गोस्वामी यांनी हीच री पुढे ओढत ‘आमच्या हिचं प्रकरण’ उभं केलंय. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात या नाटकात घडणाऱया घटना घडल्या तर तो सामान्य माणूस कसा रिऍक्ट होईल हे गोस्वामींनी हेरून बांधलंय आणि म्हणून ‘आमच्या हिचं प्रकरण’ प्रेक्षकांना जवळचं वाटतं. दिग्दर्शनात ही गोष्ट साधून सचिन गोस्वामींनी ‘आमच्या हिचं..’ यशस्वी केलंय. उगीचच कॉमेडीचा ऊहापोह त्यांनी जाणून टाळलाय. मुळात नाटकाच्या लिखाणातच घटनांची पेरणी अशी काही केलेली आहे की, हा ऊहापोह करण्याची गोस्वामींना गरजच भासली नसेल.

अशा पद्धतीचं नाटक उभं करण्याकरिता ताकदीचे आणि वाहून न जाणारे कलाकार लागतात. इथे ‘आमच्या हिचं प्रकरण’ने बाजीच मारलीये. इथे ‘आमच्या’च्या भूमिकेत आहे निखिल रत्नपारखी. हा अत्यंत गुणवंत अभिनेता. निखिलने इथे समंजस नवऱयाची भूमिका इतकी सहज वठवलीये की तो नाटक करतोय असं वाटतच नाही. घडणाऱया प्रकारामुळे त्याची झालेली कुचंबणा ही अत्यंत स्वाभाविक वाटते. प्रकरणात अडकलेली ‘ही’ भार्गवी चिरमुले समतोल राखून साकारते. ‘हि’च्यातला अवखळपणा आता मध्यम वयात आल्यावर भार्गवीने केवळ व्हॉटस्ऍप वाचतानाच्या मुद्रभिनयातून दाखवलाय. ‘प्रकरण’ झालेला आनंद काळे हा आपल्या पहिल्यावहिल्या मोठय़ा व्यावसायिक नाटकात अगदी हवा तसा राजबिंडा ‘राजपरुष’ दिसलाय. ही त्या पात्ररचनेची गरज आहे. आनंदने आपलं पात्र अत्यंत चोख केलंय. ‘आमच्या हिचं प्रकरण’मध्ये लक्षात राहाते ती प्रकरणाची बायको झालेली जॉगर्स पार्कमधली आंटी नंदिता पाटकर. आविष्कारच्या समांतर नाटकांमधून आतापर्यंत कार्यरत असलेली ही अभिनेत्री या तद्दन व्यावसायिक नाटकात चमकून जाते. भाबडय़ा गृहिणीचं नंदिताने पकडलेलं बेअरिंग कमाल आहे. याव्यतिरिक्त आमची मुलगी म्हणून प्राजक्ता किशोर खूपच सहज सुंदर अभिनय करून जाते आणि प्रकरणाचा मुलगा मयूरेश खोले आईच्या वळणावर जात नंदिता सारखाच बेअरिंग पकडून उत्तम भूमिका करून जातो.

प्रदीप मुळे यांनी उच्चभ्रू मराठी माणसाच्या घराचा हेवा वाटणारा देखावा उभा केलाय. मिथिलेश पाटणकरने ‘आमच्या हिचं प्रकरण’ याच्या मूडला धरून संगीत दिलेलं आहे. शीतल तळपदे पुन्हा ब्रॅण्डेड लायटिंग देऊन जातात. निर्मितीमूल्यांमध्ये कुठेही ‘आमच्या हिचं प्रकरण’ कमी पडत नाही. हुशार तंत्रज्ञ, गुणवंत कलाकार, प्रतिभावान दिग्दर्शक, प्रामाणिक लेखक आणि रवीनाना बागूलसारख्या सहनिर्मात्यांनी एकदंत आणि अष्टविनायकसारख्या मातब्बर संस्थांसोबत जमवलेली ‘ही’ एक लोभसवाणी भट्टी आहे.

-नाटक – आमच्या ‘ही’चं प्रकरण
-निर्मिती – अष्टविनायक आणि एकदंत क्रिएशन
-निर्माते- दिलीप जाधव,चंद्रकांत लोहोरे
– सहनिर्माते – रवीनाना बागुल
– लेखक – सचिन मोटे
– नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
– प्रकाशयोजना- शीतल तळपदे
– सूत्रधार – मंगेश कांबळी
– संगीत -मिथिलेश पाटणकर
– दिग्दर्शक – सचिन गोस्वामी
– कलाकार- भार्गवी चिरमुले, प्रसिद्धी किशोर, नंदिता पाटकर, आनंद काळे, निखील रत्नपारखी
– दर्जा – ***