एक दर्जेदार कलाकृती

चल, तुझी सीट पक्की! रंगभूमीवरील नवंकोरं नाटक. गुणी कलावंतांच्या अभिनयाने सजलेली सुंदर कलाकृती

रंगभूमीचं  एक साधं गणित आहे. आधी नाटक चांगलं हवं. मग ते दिग्दर्शनातून, नेपथ्यातून, अभिनयातून, संगीतातून किंवा अन्य कोणत्याही क्लृप्त्यांच्या मदतीने फुलवता येतं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करता येतं. नाट्यवर्तुळात मूळात नाटककारांना मान आहे तो यामुळेच. परिपक्व नाट्य लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी परिपक्व विचार करण्याची क्षमता लागते. मध्यंतरीच्या काळात कॉमेडीचं भूत मराठी रंगभूमीच्या मानगुटीवर बसलं आणि सगळीच परिपक्वता हरवली. कॉमेडी हा प्रकार अजिबात वाईट नाही. किंबहुना मनोरंजनासाठी तो अत्यंत पूरक आणि महत्त्वाचा आहे. पण केवळ हंशा पिकवण्याकरता केले जातात ते चाळे, कॉमेडी नव्हे. मराठी रंगभूमीवर फुटलेल्या कॉमेडी म्हणवणाऱ्या नाटकांमध्ये दिसत राहिले ते चाळे. अलीकडे आलेले रंगकर्मी मात्र वेगवेगळे विषय चोखाळताहेत आणि प्रस्थापित निर्माते जुन्या सकस लेखनाकडे वळताना दिसताहेत. अशात एखादं नवीन नाटक एक विलक्षण प्लॉट घेऊन उभं राहिलं की खूप बरं वाटतं. असंच नाटक आहे नाटकमंडळी निर्मित, नितीन दीक्षित लिखित आणि दिग्दर्शित ‘चल, तुझी सीट पक्की’.

‘चल, तुझी सीट पक्की’ याच्या क्राफ्टिंगमध्येच गंमत आहे. नाटक सुरू होतं एखाद्या थरार नाटय़ासारखं. पण पहिल्याचं प्रवेशादरम्यान कळतं की ही एक फॅण्टॅसी आहे. एक भ्रष्ट माणूस भयभीत होऊन आपल्या घरी येतो की त्याच्या मागे सीबीआय किंवा तत्सम यंत्रणेचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्याचं छानछोकीत बुडालेलं कुटुंब याला फार महत्त्व देत नाही. पाठलाग करणारी ती व्यक्ती तो माणूस एकटा असताना त्याला भेटते आणि ती व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर सुरू होतो एक विचित्र गोंधळ. ‘चल, तुझी सीट पक्की’ हे नाटक मुळात कथाबीजापासून तगडं आहे. नितीन दीक्षितने ते उत्तम पद्धतीने लिखाणातून फुलवलेलं आहे. त्याची पात्ररचनाच ‘चल, तुझी सीट पक्की’ला एक विनोदाचा अँगल देते. एक पूर्णपणे भ्रष्ट असलेला माणूस, सोसायटीमध्ये (समाज नव्हे) सतत मिरवू पाहणारी त्याची पत्नी, त्याचा धूर्त आणि कावेबाज मुलगा आणि वयाने सर्वात लहान असणारी अत्यंत बालीश मुलगी हे कुटुंब नाटक एण्टरटेनिंग करायला पूरक आहे. पण नितीनने यात आणखी एक पात्र योजलंय ते या कुटुंबावर येणाऱ्या संकटाचं. या पात्रामुळे ‘चल, तुझी सीट पक्की’च्या मनोरंजनाच्या कोशंटमध्ये प्रचंड भर पडते.

‘चल, तुझी सीट पक्की’ नाटक दोन यूएसपी घेऊन उभं राहतं. पहिला यूएसपी म्हणजे शरद पोंक्षे. हा एक बहारदार नट आहे. सिनेमा, मालिका आणि त्याच्या व्याख्यानांमुळे शरदची एक खूप गंभीर प्रतिमा तयार झाली. पण ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकात शरदने एक खूपच वेगळं कॅरेक्टर उभं केलंय. ते काय आहे हे इथं सांगणं म्हणजे नाटकाची मजा घालवणं होईल. इतकंच की, ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकातला सगळा विनोद शरद पोंक्षेंमुळे संभवतो. शरदने हे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि चोख बजावलेलं आहे. इतकं की, सावरकरांवर आवेशाने व्याख्यानं देणारे शरद पोंक्षे हे इतक्या सहजते करू शकतात हे पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. ‘चल, तुझी सीट पक्की’चा दुसरा यूएसपी आहे लीना भागवत यांनी रंगवलेलं मराठी लोकांच्या कॉकटेल सर्किटमधलं पत्नीचं पात्र. लीनाला याआधी अशा भूमिकेत रसिकांना क्वचितच पाहायला मिळालेलं आहे. लीनाने ‘चल, तुझी सीट पक्की’मधलं हे छदमी छटेचं कॅरेक्टर उत्तम साकारलेलं आहे.

ओंकार राऊत याने मुलाचं आणि अनीशा सबनीस हिने मुलीचं काम मस्त केलेलं आहे. या दोघांच्याही वावरण्यात पैशामुळे आलेली बेफिकीरी पावलोपावली झळकते, तरी कुठेही उद्धटपणा किंवा उर्मटपणा जाणवत नाही हे या दोघांचं कौशल्य आहे. नितीन दीक्षितने हे कटाक्षाने पाळलेलं आहे. म्हणून त्याचंही दिग्दर्शक म्हणून इथे कौतुक आहे. विवेक जोशी यांनी अण्णा खूप मिश्किलपणे साकारलेत. छदमी सुनेशी समंजसपणे वागणारा सासरा विवेक यांनी खूप छान रंगवलाय. या सगळ्यात काहीही जास्त न करता भाव खातात ते आपले मराठी रंगभूमीचे लाडके तालीम मास्तर मंगेश कदम. स्वतः उत्तम दिग्दर्शक असून नितीन दीक्षितच्या दिग्दर्शनात मंगेशने त्याचा अजिबात पिंड नसलेलं एका भ्रष्ट माणसाचं पात्र सहजतेने पेश केलंय.

विजय गवंडे यांचं संगीत नाटकाला समर्पक आहे. विजय हा एक प्रतिभावंत संगीतकार आहे. इथे त्याने संगीताला फारसा वाव नसूनही काही ठिकाणी आपली छाप सोडली आहे. प्रदीप मुळ्ये हे केवळ वाडे आणि राजवाडेच नव्हेत तर मराठी नाटकातल्या दिवाणखान्यांचेही अनभिषिक्त सम्राट आहेत हे ते ‘चल, तुझी सीट पक्की’मध्ये पुन्हा एकदा सिद्ध करतात. त्यांचे दिवाणखाने पाहून चक्क महारेरा अंतर्गत सरळ स्क्वेयर फुटाच्या भावात विकत घ्यावेत असं वाटावं इतके हे दिवाणखाने दिमाखदार आणि वास्तववादी असतात. अमिता खोपकर यांनी नाटकाची वेशभूषा अत्यंत मोहक केली आहे. ‘चल, तुझी सीट पक्की’चं दृष्यात्मक यश या दोन तंत्रज्ञांमुळे आहे. भूषण देसाईने त्या मानाने सोपी प्रकाशयोजना उत्तम सांभाळलेली आहे.

एकंदरीत, ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की चांगलं नाटक असण्याकरिता मुळात ‘कडक’ संहिता हवी. नंतर बाकीचे सोपस्कार करून ती हवी तेवढी फुलवता येते. खूप गुणी कलावंत एकत्र येऊन एक सुंदर कलाकृतीचा आनंद प्रक्षकांना देतात हा अनुभव ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकातून मिळतो. या सगळ्या गुणी लोकांना एकत्र आणण्याची मोट बांधणाऱ्या निर्मात्या रचना पेंढारकर सामंत यांचं कौतुक करायलाच हवं.

  • नाटक :  चल, तुझी सीटी पक्की!
  • निर्मिती : नाटकमंडळी
  • सादरकर्ती : रचना सामंत
  • लेखक/ दिग्दर्शक  : नितीन दीक्षित
  • नेपथ्य  : प्रदीप मुळ्ये
  • प्रकाश  : शीतल तळपदे
  • सूत्रधार : दिगंबर प्रभू
  • कलाकार : लीना भागवत, शरद पोंक्षे, मंगेश कदम.
  • दर्जा :  ***