तरुण रंगभूमीवरील तरुण नाटक

282

>> क्षितिज झारापकर

‘दादा एक गूड न्यूज आहे!’ मराठी रंगभूमी समृद्धता, परिपक्वता याचबरोबर तरुणाईची स्पंदनेही ओळखते हे या नाटकातून दिसते.

मराठी कलाक्षेत्रात जी नवीन मंडळी आली आहेत ती विषयांचा ताजेपणा आणत आहेत हे पाहून अतिशय आनंद होतो. आजवर नवीन काहीही करण्याची इंडस्ट्री मान्य जागा ही प्रायोगिक अणि हौशी रंगभूमी होती. सगळे नावीन्यपूर्ण अविष्कार तिथे सुरू करायचे अणि मग ते रुजले, रुचले की त्यांना व्यावसयिक रंगभूमीवर आत्मसात करायचं असा पायंडा होता. आता मात्र ही परंपरा बदलताना दिसतेय. अगदी मुरलेले मातब्बर व्यावसयिक नाट्यनिर्माते देखील आता नवीन विषय घेऊन निर्मिती करू लागलेत. केवळ विषयचं नवीन नाहीत तर नवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार ह्या सर्वांनाच प्रोत्साहन देणं हे प्रस्थापित निर्मात्यांनी सुरू केलेलं आहे. व्हाय सो गंभीर, देवबाभळी, तिला काही सांगायचंय, अनन्या, ओवी, श्यामची आई यासारखी अनेक चांगली नाटकं मोठ्या निर्मिती संस्थांनी अगदी कोणताही भेदभाव न करता गेल्या वर्षभरात सादर केली अणि ही सर्व नाटकं उत्तम धंदा साधून अजून कार्यरत आहेत. ही सगळी नाटकं मराठी नाट्यक्षेत्रातल्या नवीन रंगकर्मींचा मोठा सहभाग असलेली आहेत. या यादीत आता नवीन निर्मातेही येत आहेत. नवीन निर्माते धंद्यात आपला जम बसावा म्हणून जुनेपुराणे ठोकताळे न अवलंबता नवीन विषयांचे नाटक करायचं धाडस करताहेत यातचं आपली रंगभूमी आजही सशक्त अणि सुदृढ आहे हे दिसतं. मराठी रंगभूमीच्या आरोग्याचं हे निदान पटवण्यासाठी सध्या नाट्यगृहांत भरघोस बुकिंग घेउन एका नवीन लेखिकेचं पहिलंच नाटक छान गाजतय. हे नाटक आहे प्रिया बापट सादर करीत असलेलं आणि सोनला प्रॉडक्शनस् निर्मित नाटक ‘दादा एक गुड न्यज आहे’.

‘दादा एक गुड न्यज आहे’ हे नाटक कल्याणी पाठारे ह्या लेखिकेचं  पहिलंच नाटक आहे. पण पहिलंच नाटक असूनही ‘दादा एक गुड न्यज आहे’मध्ये त्यांच्या लिखाणाची प्रगल्भता थक्क करणारी आहे. मुळात नाटकाचा विषयच खूप आजचा, आजच्या पिढीच्या अत्यंत जवळचा अणि म्हणूनचं पारंपरिक मराठी व्यावसायिक नाटकांकरिता नवीन असा आहे. एका विखुरलेल्या घरात वाढणारी वीस वर्षांची मुलगी आपल्या वेगळ्या राहात असलेल्या भावाला आपल्या आयुष्यातली एक गोष्ट सांगते आणि पुढे काय होतं हे कथानक म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’. नाटकाच्या लिखाणात काही गोष्टी पाळाव्या लागतात. पहिलं म्हणजे नाटक शब्दांतून नाही तर संवादातून घडतं. आपले विचार शब्दांपेक्षा संवादातून पोहोवण्याचं नाटककाराच्या अंगी गरजेचं असणारं कसब आपल्याकडे आहे हे कल्याणी पाठारे यांनी दाखवून दिलंय. दुसरं म्हणजे नाटकाची पात्ररचना. इथे ‘दादा एक गुड न्यूज आहे’  खूपचं प्रभावी ठरतं. लेखिकेने  आपलं नाटक अधिक फुलवण्यासाठी योजलेली पात्ररचना खूपच मस्त आहे. पहिल्याचं नाटकात कल्याणी पाठारे यांनी हे भान ठेवून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ पेश केलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. कल्याणी पाठारे यांनी डेब्यूलाचं सिक्सर मारली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन!

चांगल्या संहितेला उत्तम दिग्दर्शन मिळावं हे भाग्य असतं. अद्वैत दादरकर हे दिग्दर्शकीय नाव आता तसं प्रचलित झालेलं आहे. अद्वैतची शैली ही थोडी प्लेयिंग टू द गॅलरी पद्धतीची, म्हणजेचं तद्दन व्यावसयिक पठडीची आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’मध्ये अद्वैतने आपली पठडी न बदलता ती थोडी टोनडाउन करून खूप गंमत केली आहे. नाटकाची जातकुळी ओळखून त्याने हे नाटक खूप तरल अणि एका वेगळ्या भावनिक पातळीवर हातळलेलं आहे. त्यामुळे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक थेट प्रेक्षकांना भिडतं. त्यात नाटकातली पात्रं ज्या एका विलक्षण सिच्युएशनमध्ये अडकली आहेत त्यात विनोदाला प्रचंड स्कोप आहे जो अद्वैतचा स्ट्रांग पॉईन्ट आहे. एकूणच  अद्वैत आपल्याला ‘दादा एक गुड न्यज आहे’मध्ये गुंतवून ठेवण्यात शंभर टक्के यशस्वी झालेला आहे.

नाटकातले कलाकार ही नाटकाची सर्वात महत्त्वाची बाजू; कारण लोकभिमुख कला असल्याने कलाकार हे नाटक प्रेक्षकांकडे पोहोचवण्याचं मीडियम आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’मध्ये दादा झालेला उमेश कामत फँटस्टिक आहे. या नाटकाचा तो प्रमुख कलाकार आहे. पण ह्या हीरोला हीरॉईन मात्र नाही; कारण नाटक भावाबहिणीच्या नात्यावर आहे. दादाच्या प्रेयसीचं पात्र आहे जे आरती मोरे हिने अत्यंत संयमीपणे साकारलं. उमेशने नाटकात अनेक छटा दाखवल्या आहेत. आनंद, राग, उद्विग्नता हे सगळं उमेश आपल्याला देत असताना आरतीने त्याला उत्तम सपोर्ट दिलेला आहे. ‘दादा एक गुड न्यज आहे’ मध्ये गुड न्यूजचा कर्ता ह्या भूमिकेत  ऋषी मनोहर खूपच निरागस, भाबडा अणि गोंडस आहे. त्याने दादा एक गुड न्यज आहेला एक भन्नाट पोत देण्याचं काम केलेलं आहे. ह्या नाटकाचा यूएसपी आहे ती ऋता दुर्गुळे. तिचं देखिल हे पहिलं व्यावसायिक नाटक. पण ह्या पात्राला खूप काही ह्या नाटकात करायचय. आपली परिस्थिती आपल्या मोठ्या भावाला सांगायची, पटवून द्यायची आहे, निर्णयावर ठाम राहायचय अणि हे सगळं करत असताना एक इंडीपेन्डट स्त्री म्हणूनही उभं राहायचय. ऋता दुर्गूळे ह्या सगळ्यात अव्वल ठरते. चारही कलाकार आपापलं काम खूप मनापासून करतात ही ‘दादा एक गुड न्यूज आहे’ची सर्वात जमेची बाजू आहे.

निर्माता नंदू कदम यांनी तांत्रिक बाबतीत अजिबात हात आखडता घेतलेला नाही. नेपथ्य, संगीत ह्या सगळ्या बाबी उत्तमचं आहेत. हे नाटक तरुण प्रेक्षकांच्या जवळचं आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ च्या निमित्ताने मराठी नाटकाला नवीन वयातला प्रेक्षक लाभो ही प्रार्थना!

  • नाटक     दादा, एक गूड न्यूज आहे
  • निर्मिती   सोनल प्रॉडक्शन
  • निर्माते    नंदू कदम
  • सादरकर्ती   प्रिया बापट
  • लेखक     कल्याणी पाठारे
  • सूत्रधार   गोट्या सावंत
  • दिग्दर्शक  अद्वैत दादरकर
  • कलाकार ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर, उमेश कदम
  • दर्जा ***

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या