वैदर्भीय लोककला : झाडीपट्टी

>> क्षितिज झारापकर

‘गंगाजमुनां’ झाडीपट्टी ही वैदर्भीय रंगभूमीवरील वैशिष्टय़पूर्ण कला आपल्या भेटीला आली आहे.

मनोरंजन  ही मानवी गरजांमधली सर्वात कमी लेखलेली, पण सर्वात महत्त्वाची गरज आहे. तहान, भूक, वगैरे अन्य गरजांच्या तुलनेत ही मनोरंजनाची गरज तितकीशी लक्षात येत नाही, पण माणसाच्या मनाचं मनोरंजन झालं नाही तर होणारे परिणाम भीषण संभवतात. ही गरज एकंदर मानवजातीची असल्याने ती सार्वभौमिक आहे. तिथे मग शहरी, ग्रामीण किंवा पाश्चात्त्य, पूर्वेकडील असे प्रकार नाहीत. ही मनोरंजनाची गरज नाटक या प्रकारातून सहजपणे भागवली जाते आणि म्हणूनच नाटक हा कला प्रकार सर्व प्रदर्शक कलांमधील श्रेष्ठ प्रकार मानला जातो. इसवी सनापूर्वी सहाशे वर्षे अगोदर ग्रीसमध्ये नाटय़ प्रयोगांचा उल्लेख सापडतो. भरतमुनींनी नाटय़शास्त्र इसवी सनापूर्वी चारशे वर्षे अगोदर लिहिलेले आहे. मनोरंजनाची गरज ओळखून ती वागवण्याची मनुष्याची धडपड ही इतकी प्राचीन आहे. हे सगळं आज सांगण्याचं कारण असं की, आज मराठी नाटक हे प्रामुख्याने शहरी झालेलं आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा मराठी नाटक, सिनेमाच्या कक्षेबाहेर राहिलेला आहे. तरीही गेल्या वर्षीच्या नाटय़ संमेलनापासून एका वेगळ्या स्वतंत्र मराठी नाटय़ प्रकाराला शहरातल्या नाटय़गृहापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न नाटय़ परिषदेने सुरू केला अणि नुकतेच अशा प्रकारच्या नाटकाचे प्रयोग मुंबईत झाले. हा प्रकार आहे नागपूरच्याही पलीकडे चंद्रपूरच्या आसपास रंगणाऱ्या झाडीपट्टीमधील मराठी नाटकांचा. मुंबई मराठी साहित्य संघाने ‘गंगाजमुना’ या नाटकाचा विनामूल्य प्रयोग संघात केला.

‘गंगाजमुना’ हे सदानंद बोरकर लिखित आणि दिग्दर्शित अस्सल झाडीपट्टीतील नाटक. या नाटय़ प्रकाराविषयी थोडं इथं सांगणं क्रमप्राप्त आहे. झाडीपट्टीतील नाटकांची कथानकं ही खूप सोपी आणि माहितीची असतात. ‘गंगाजमुना’ या नावावरूनच या नाटकाची कल्पना येते. मुंबई-पुण्याच्या प्रेक्षकांना नाही कदाचित. कारण त्यांना ‘गंगाजमुनां’ म्हणजे फ्रूट ज्यूसचा प्रकार माहीत आहे, पण नागपूर अणि पुढे चंद्रपूरच्या भागातल्या प्रेक्षकांना ‘गंगाजमुना’ ही नागपुरातली वेश्यावस्ती आहे हे माहीत असते आणि म्हणूनच नावावरून कथानकाची कल्पना येते. एखाद्या हिंदी किंवा तेलुगू चित्रपटाच्या मांडणीसारखी झाडीपट्टीतील नाटकांची मांडणी भेदक असते. सदानंद बोरकरांनी  ‘गंगाजमुनां’च्या लिखाणात कथानकातला हा भेदकपणा सांभाळला आहे. नाटकातल्या प्रत्येक प्रवेशाला एक सुरुवात, मध्य आणि क्लायमॅक्स बोरकरांनी योजलेला आहे. ‘गंगाजमुना’ आपल्याला पल्लेदार वाक्यांमध्ये, घटनांच्या चढत्या आलेखात आणि ‘प्लेइंग टू द गॅलरी’ ढंगाच्या अभिनयात अडकवते. कलाकार बिनधास्तपणे चौथी भिंत तोडून प्रेक्षकाभिमुख होऊन काही संवाद फेकतात. हे या प्रकारच्या नाटकाला गरजेचं आहे कारण झाडीपट्टी खुल्या पटांगणातून रंगते. तिथे हुंकार आणि उसासे टिपणारी अद्ययावत ध्वनियंत्रणा नसते, तिथे आपलं म्हणणं थेट प्रेक्षकांकडे पोहोचवावं लागतं. ‘गंगाजमुनां’मध्ये हे साध्य केलं जातं. दिग्दर्शनात बोरकरांनी नीट पात्र योजना आणि हालचाली नेमून ‘गंगाजमुनां’  खूप वेगवान ठेवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. विशेषतः दुसऱ्या अंकात पासिंगचा खूप परिणामकारक उपयोग दिसतो. झाडीपट्टीत नाटकं ही पाच-साडेपाच तास चालतात. रात्रीच्या खेळाला जमलेले प्रेक्षक पंचक्रोशीतून आलेले असतात. त्यांना परतीसाठी यातायात यंत्रणा मिळायला  जास्त यातायात होऊ नये म्हणून असं असतं. ‘गंगाजमुनां’ इथेही कथानकाचा पसारा व्यवस्थित पेलून उभं राहतं.

‘गंगाजमुनां’ हे मुंबई-पुण्याच्या नाटकांपेक्षा वेगळं ठरतं ते कलाकारांच्या ताफ्यामुळे. हल्लीची नाटकं ही मर्यादित कलाकारांच्या संचात साकारली जातात, पण ‘गंगाजमुनां’मध्ये ही मर्यादा नाही. काही कलाकार दोन भूमिका करतात, पण ते संच कमी करण्यासाठी नसून कलाकार ताकदीचे आहेत म्हणून. इथे विशेष उल्लेख करायला हवा तो मंजुशा जोशी यांचा. या  अभिनेत्रीने पहिल्या अंकात एक भावुक आई आणि दुसऱ्या अंकात वेश्यावस्तीतली निर्ढावलेली मावशी कमालीच्या सहजतेने निभावून नेली आहे. मंजुशाजींचा शाब्दिक अणि आंगिक अभिनय दोन्ही भूमिकांमध्ये केवळ लाजवाब आहे. हेच म्हणता येईल सदानंद बारकर, ज्यांनी जावयाची भूमिका केली आहे आणि राजाभाऊ झालेल्या विजय मुळे यांच्याबाबत. या सगळ्यांनी व्यवस्थित ढंगदार अभिनय करून ‘गंगाजमुनां’ बहारदार केलंय. देवयानी जोशीची रेणू खूपच ठाशीव झाली आहे. एका मंदबुद्धी मुलीची भूमिका देवयानीने योग्य त्या परिणामकारकतेने वठवली आहे. विश्वनाथ पर्वते, शिल्पा मांडले, हितेश ठिकरे, शरद ठिकरे, अंगराज बोरकर, चंद्रसेन लेंझे, अभिजित संगेल, रेखा चंद्रगिरीवर या सर्वांनी उत्तम साथ दिली आहे. मुख्य म्हणजे सगळी कलाकार मंडळी झोकून देऊन काम करतात आणि नाटक स्वतः एन्जॉय करतात हे दिसतं. नाटक करणाऱयांनी ते एन्जॉय केलं की, आपसुकच प्रेक्षक ते एन्जॉय करू लागतात  कारण आऊटपुट शंभर टक्के असते.

‘गंगाजमुनां’चं नेपथ्य सदानंद बोरकर यांनी रचलं आहे. काही ठिकाणी ते सूचक आहे, पण दुसरा अंक हा ‘गंगाजमुनां’ वस्तीबाहेर रस्त्यावर घडवून  अधिक मजा आणली आहे. पार्श्वसंगीत लक्ष्मीकांत लेंझे यांचं आहे. झाडीपट्टी नाटकं बटबटीत असतात असं ऐकीवात होतं, पण ‘गंगाजमुनां’च्या पार्श्वसंगीतातदेखील हे कुठेही जाणवत नाही. विषय भेदक असूनही हे साध्य केलं  आहे हे कौतुकास्पद आहे. प्रकाश योजना दिवाकर बोरकर यांची असून रंगभूषा अणि वेशभूषा सुधाकर कोकाटे यांनी सांभाळलेली आहे.

श्री बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठान, नवरगाव यांनी निर्मिलेलं  अणि श्री व्यंकटेश नाटय़ मंडळ, नवरगाव यांनी सादर केलेलं ‘गंगाजमुनां’ हे नाटक नाटय़ व्यवसायासाठी एक उद्बोधक निर्मिती आहे. आपला प्रेक्षकवर्ग कोणता, त्याच्या आवडीनिवडी काय अणि त्या ओळखून त्याला रुचेल, पटेल आणि तरीही काहीतरी शिकवेल अशी कलाकृती तयार करण्याचा हा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न जाणवतो. कुठेही, कोणताही आव आणलेला नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे. मुंबईत आलेल्या या सगळ्या पाहुण्या कलाकारांना माझा आणि ‘सामना’चा सलाम.

 नाटक : गंगाजमुनां

सादरकर्ते : व्यंकटेश नाटय़ मंडळ, नवरगाव

निर्मिती : बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठान

संगीत : लक्ष्मीकांत लेंझे

प्रकाश : दिवाकर बोरकर

रंगभूषा, वेषभूषा : सुधाकर कोकाटे

लेखक, दिग्दर्शक :  सदानंद बोरकर

कलाकार : मंजुषा जोशी, देवयानी जोशी, शिल्पा माडले, रेखा चंद्रगिरीवार,विजय मुळे, विश्वनाथ पर्वते,हितेश ठिकरे, अंगराज बोरकर, शरद ठिकरे, चंद्रसेन लेंझे, अभिजीत संगेल, सदानंद बोरकर

दर्जा : ***