विनोदाचे मर्म आणि  गमक

3

>> क्षितिज झारापकर

‘व्हॅक्युम क्लीनर’ उत्तम संहिता, दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार यातून उत्तम साकारलेली नाटय़कृती

स्त्री अणि पुरुषांच्या स्वभावधर्मांमध्ये ते नर आणि मादी असल्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे वेगळा असतो. अगदी नवरा आणि बायको यांच्या वागण्यातही या गोष्टीची प्रचीती येते. संसाराच्या रामरगाडय़ात एखाद्या समस्येकडे पाहताना दृष्टिकोनात फरक आढळतो ते यामुळेच. पुरुष हे सर्वसाधारणपणे जबाबदारी स्वीकारून कुटुंबाच्या कल्याणाची धुरा वाहणारा असा प्राणी आहे तर स्त्री ही कुटुंबाचा मानसिक आणि मूल्यात्मक समतोल राखणारी आहे, असा ढोबळ फरक दिसून येतो. पण या पलीकडे या दोन दृष्टिकोनांमध्ये सूक्ष्म असे खूप फरक असतात. हे सूक्ष्म फरक एकंदरीत जगाचा समतोल राखण्यात यशस्वी होतात. समजा एकमेकांना हे विसंगत दृष्टिकोन समजले तर काय होईल? हा मुद्दा घेऊन उभं ठाकलंय ‘अष्टविनायक’ निर्मित आणि चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘व्हॅक्युम क्लीनर’. चिन्मय मांडलेकर हे एक संवेदनशील आणि हुशार रंगकर्मी आहेत हे त्यांनी सर्व माध्यमांमून सिद्ध केलेलं आहे. त्यांना नव्याने काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. असं असलं तरीही चिन्मयने या नाटकात जे कास्टिंग जमवलंय आणि ते त्यांनी ज्या पात्रांमध्ये गुंफलंय त्यातून मात्र ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांना आव्हान देऊन जातात. याही पलीकडे जाऊन लेखनातून आणि दिग्दर्शनातून ‘व्हॅक्युम क्लीनर’ सतत हलत राहील, काही ना काहीतरी घडत राहील याची मांडलेकरांनी चोख खबरदारी घेतलेली आहे.

नाटक एका उच्च मध्यमवर्गीय घरात घडतं. नवरा, बायको, कॉलेजात जाणारा एक मुलगा, लग्न झालेली एक मुलगी, तिचा नवरा म्हणजेच या घराचा जावई असा ‘व्हॅक्युम क्लीनर’चा घाट आहे. या व्यतिरिक्त आणखी एक पात्र आहे जे नवऱयाचं प्रकरण आहे. या सगळ्यांमध्ये समोरची माणसं आपलं समजूनच घेत नाहीयेत ही समान समस्या आहे. ही समस्या सध्याच्या समाजात खूप फोफावलेली असल्यामुळे ‘व्हॅक्युम क्लीनर’ हे नाटक एकदम आजचं होऊन जातं. आता इतकं सांगितल्यावर हे नाटक समस्याप्रधान, गांभीर्यपूर्ण असेल असं वाटेल कदाचित, पण तसं ते अजिबातच नाहीये. मुळात जाहिरातीतले चेहरे आणि जाहिरातीची जातकुळी पाहता ‘व्हॅक्युम क्लीनर’ ही एक धम्माल कॉमेडी आहे हे उघड होतं आणि तसंच ते आहे. विनोदी नाटकात मर्म न सांगता नाटकाचं स्ट्रक्चर सांगता येतं. कारण विनोदाचं कथानक सोपं असतं. विनोद करणं कठीण असतं. येथे मात्र मर्म सांगितलं तर ‘व्हॅक्युम क्लीनर’ची सारी गंमत निघून जाईल आणि म्हणून मी ती येथे सांगणं टाळतोय. पण हे केल्यामुळे या नाटकाच्या नटांवर या समीक्षेत खूप मोठा अन्याय होणार आहे. ‘व्हॅक्युम क्लीनर’ची गोम न सांगता यातील कोणत्याच कलाकाराच्या अभिनयाचं सामर्थ्य सांगता येणार नाहीये. पण या नाटकातील सर्व कलाकार हे मातब्बर आणि नामवंत असल्याने त्यांची भलामण करण्यापेक्षा नाटकाची गंमत कायम ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे हे ते मान्य करतील अशी अशा बाळगायला हरकत नाही.

अशोक सराफ या नटाची मी समीक्षा करणं म्हणजे जरा अतीच होईल. अशोकमामांनी ‘व्हॅक्युम क्लीनर’मध्ये नवऱयाचं पात्र रंगवलेलं आहे. हे विधान खूप समर्पक आहे. अशोकमामांचे समकालीन नट हे कदाचित वयोमानापरत्वे नाटकांमधून वावरताना दिसतात. पात्र रंगवत नाहीत. ‘व्हॅक्युम क्लीनर’मध्ये आपल्याला अशोक सराफ दिसत नाहीत तर त्यांचं रंजन हे पात्र दिसतं. निर्मिती सावंत या मराठी नाटकातल्या कायरॉन पोलार्ड आहेत. आलेल्या प्रत्येक चेंडूला सीमापार करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. ‘व्हॅक्युम क्लीनर’मध्ये मात्र निर्मिती सावंत आपल्याला राहुल द्रविडसारखी एक जिम्मेदारी की पारी खेळताना दिसतात. सुरुवातीला जेव्हा अशोकमामा स्टान्स घेऊन बॅटिंग करतात तेव्हा निर्मिती समोरची बाजू लावून धरते आणि मग स्लॉग ओव्हर्समध्ये दे दणादण सुटते. तन्वी पालव हिने मुलीचं काम खूपच लोभसवाणं साकारलं आहे. तन्वी मुळात कथ्थक शिकलेली आहे आणि म्हणून तिच्यात एक मूळचा ऱिहदम आहे. हा तिला आपलं पात्र उभं करण्यात मदत करतो. सागर खेडेकर हा बरीच वर्षे रंगभूमीवर कार्यरत असलेला एक गुणी कलाकार आहे. त्याने जावयाचं पात्र जमवलंय. सागर समोरच्या दिग्ग्जांनी दबून न जाता आपला ठसा व्यवस्थित उमटवतो. यातच तो किती कर्तबगार नट आहे हे कळतं. प्रथमेश चेऊलकर हा कॉलेजकुमार शोभतो. घरी वडील आपल्याला समजून घेत नाहीत आणि सतत उपेक्षा करतात हे शल्य त्याने छान दाखवलं आहे. मोसमी तोंडवळकर हिने ‘प्रकरण’ प्रकरणात्मक उभं केलंय. मुळात हे पात्र लहान आहे. पण ‘व्हॅक्युम क्लीनर’च्या मोठय़ा घाटात छोटं, पण महत्त्वाचं पात्र साकारण्याच्या हेतूने मोसमीने हे नाटक केलेलं आहे.

प्रदीप मुळ्ये, राहुल रानडे, रवी-रसिक यांचे प्रकाशाचे आविष्कार, फुलवा खामकर यांची नृत्यरचना या सगळ्या गोष्टी या नाटकाची निर्मितीमूल्य कैकपटीने वाढवतात. कॉर्पोरेट मराठी नाटकांशी स्पर्धा करताना आता निर्मात्यांना हे भानही ठेवावं लागतं. एक सुंदर कॉमेडी आपल्याला दिली आहे- ‘व्हॅक्युम क्लीनर’.

  •  नाटक : व्हॅक्यूम क्लीनर
  • निर्मिती : अष्टविनायक
  • निर्माते : निवेदिता सराफ, संज्योत वैद्य, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव
  • नेपथ्य : प्रदिप मुळ्ये
  • संगीत : राहुल रानडे
  • प्रकाश : रवी-रसिक
  • लेखक, दिग्दर्शक : चिन्मय मांडलेकर
  • कलाकार : निर्मिती सावंत, मौसमी तांडवळकर, तन्वी पालव, सागर खेडेकर, प्रथमेश चेऊलकर, अशोक सराफ
  • दर्जा  : ***