एकाच नाण्याच्या दोन बाजू

37

>> क्षितिज झारापकर

‘जरा समजून घ्या’ आणि ‘यदा कदाचित रिटर्न्स’ एक अत्यंत प्रायोगिक आणि दुसरे पक्के व्यावसायिक नाटक. दोघांचा बाज वेगवेगळा असला तरी दोघांच्या विषयांचे गांभीर्य सारखेच आहे. ही दोन्ही नाटकं महत्त्वाची यासाठी होतात की आजचे दोन टोकांचे महत्त्वाचे विषय मांडण्याचा ही नाटकं मनोरंजकरीत्या यशस्वी प्रयत्न करतात.

 ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे संतोष पवार लिखित अणि दिग्दर्शित नाटक. संतोष पवार यांचा स्ट्राँग पॉइंट म्हणजे नवीन चेहरे घेऊन आपलं नाटक सादर करायचं. कालांतराने ती मंडळी नावारूपाला येतात कारण पॉलीश न झालेले मनस्वी कलाकार ओळखणं ही संतोषची यूएसपी आहे. ‘यदा कदाचित रिटर्न्स हे हाचं यूएसपी घेउन आलेलं नाटक आहे. सुरुवातीच्या नांदी नंतरच आपल्याला संगितलं जातं की आम्ही एक विलक्षण गोष्ट सांगणार आहोत पण ती नाचत, गात अणि हसत खेळत सांगणार आहोत. आणि खरोखर यदा कदचित रिटर्न्स हे नाचत, गात, खूपसं हसत अणि दुसऱ्या अंकात चक्क क्रिकेट खेळत पुढे सरकतं. संतोष पवार सहज बोलताना संवादात आजूबाजूच्या वर्तमानातले मुद्दे आणण्याची किमया घडवणारे रंगकर्मी आहेत. ती किमया इथेही दिसते. त्यांच्या नाटकात कमालीची ऊर्जा असते. ती ही इथे दिसते. सर्व कलाकार – आणि संतोषच्या नाटकांमध्ये कलाकार ही एक सांघिक संज्ञा असते – कमालीच्या एनर्जीने ‘यदा कदाचित रिटर्न्स’ सादर करतात. इथे बाहुबली सिनेमाचा बॅकड्रॉप घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला गेलाय.

‘यदा कदाचित रिटर्न्स्’मध्ये तब्बल सोळा कलाकार आहेत. सर्वच आपापली भूमिका मन लावून आणि उत्तम सादर करतात. सांघिक ऊर्जेने नाटक जबरदस्त मनोरंजन तर करतंच पण त्याच बरोबर ते सामजिक प्रश्नही परिणामकारकपणे मांडतं. निर्मात्यांनी कुठेही प्रॉडक्शन व्हॅल्यूमध्ये कसूर केलेली नाही. दत्ता घोसाळकर यांच्या दत्त विजय प्रॉडक्शन्सने ‘यदा कदाचित’ची निर्मिती केली होती. त्यांनीच आता रंगसंयोग अणि सुनील पुजारी यांना बरोबर घेऊन हे नवीन नाटक केलं आहे. सर्व थरातील प्रेक्षकांना रुचतील अशा असंख्य गाण्यांनी अणि त्यावरील नृत्यांनी यदा कदाचित रिटर्न्स नटलेलं आहे. सबकुछ संतोष पवार हा ठसा कायम ठेवत हे नाटक आपल्या समोर येतं. मनोरंजन करत असतानाच शेतकरी आत्महत्येसारखा ज्वलंत प्रश्न आपल्या समोर ठेवतं आणि एक प्रचंड ऊर्जा देऊन जातं.

 • नाटक        यदा कदाचित रिटर्न्स
 • निर्मिती    श्री दत्त विजय प्रोडक्शन, रंग संयोग
 • निर्माते     दत्ता घोसाळकर
 • नेपथ्य       अजय पुजारे
 • संगीत, गायक      प्रणय दरेकर
 • प्रकाश       चेतन पडवळ
 • लेखक, दिग्दर्शक   संतोष पवार
 • गीतकार
 • कलाकार    स्नेहल महाडिक, वर्षा कदम, हर्षद शेट्टे,
  प्रसाद रावराणे
 • दर्जा         ***

काही नाटकं महत्त्वाची असतात. त्यांचं महत्त्व विविध गोष्टींमुळे असतं, पण ही नाटकं  रंगभूमीला समृद्ध करणारी ठरतात. मराठी नाटकं हे नेहमीच समाजमनाला आरसा दाखवून मराठी माणसाला विचारमग्न व्हायला लावणारी असतात. काही तुरळक अपवाद वगळता मराठी नाटकाने आपली ही ओळख कायम ठेवली आहे. मराठी प्रेक्षकही नाटकांकडून हे प्रबोधनात्मक कार्य अपेक्षित करतात अणि स्वीकारतातही. मराठी नाटकांचं महत्त्व त्याचमुळे टिकलं आहे. हिंदुस्थानच्या नाटय़वर्तुळात मराठी रंगभूमीला अग्रगण्य स्थान आहे ते याचमुळे. मराठी नाटकांचा आशय अणि विषय हा नेहमीचं वाखाणला गेला आहे. आजही समाजप्रधान विषयांवर अनेक नाटकं येतात अणि प्रेक्षक पसंतीची पावती मिरवत जोमाने कार्यरत असतात. आज आपण अशा दोन नाटकांकडे पाहणार आहोत. या दोन नाटकांची जातकुळी संपूर्णपणे परस्परविरोधी डायामेट्रिकली ऑपोझिट म्हणतात तशी आहे. ही दोन नाटकं आहेत ‘जरा समजून घ्या’ आणि ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या दोन्ही नाटकांचे विषय महाराष्ट्राच्या तमाम जनतेला भिडणारे विषय आहेत. सर्वसामान्य मराठी माणसाला भेडसावणाऱ्या दोन महत्त्वाच्या विषयांवर ही दोन नाटक़ं् बेतलेली आहेत. दोन्ही नाटकांचे बाज वेगवेगळे आहेत. जिथे ‘जरा समजून घ्या’ हे नाटक पूर्णपणे प्रायोगिक आहे तिथेच ‘यदा कदचित रिटर्न्स’ तद्दन व्यावसयिक पठडीतलं आहे. तरीही दोन्ही नाटंक दोन अत्यंत महत्त्वाचे विषय मांडू पाहतात.

‘जरा समजून घ्या’ हे नाटक पुण्यातील प्रयोगशील अणि आशयघन नाटय़निर्मितीसाठी नावाजलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे या नाटय़ संस्थेचं नाटक आहे. लेखक डॉ. विवेक बेळे यांनी हे नाटक लिहिलं आहे. स्वतः डॉक्टर असल्याने डॉक्टरी पेशातले सर्वच मुद्दे त्यांना माहीत असणं स्वाभाविक आहे. बेळे हे अत्यंत उत्तम नाटकार आहेत हे केव्हाच सिद्ध झालेलं आहे, पण डॉक्टर स्वतःवर किंवा आप्तस्वकीयांवर शस्त्रक्रिया करीत नाहीत तर मग डॉक्टरकीच्या विषयावर बेळे काय अणि कसं लिहितात हे अप्रूप होतंच. त्यात त्यांची लेखनशैली कमालीची मार्मिक आहे. ‘जरा समजून घ्या’मध्ये डॉक्टरांवर सध्या होत असलेल्या हल्ल्यापासून ते गुगल वाचून त्यांनाच वैद्यकीय सल्ला देण्याच्या पेशंटस्च्या वाढत्या प्रवृत्तीपर्यंत सर्व प्रश्न बेळेंनी मस्तपैकी मांडलेत. हे करत आसताना ते प्रसारमाध्यमांवरही भाष्य करतात. लिखाणात ‘जरा समजून घ्या’ पक्क जमलंय. अभय गोडसे यांनी नाटक कॉम्पॅक्ट मोडमध्ये रचलंय, पण त्यामुळे नाटकाची परिणामकारकता वाढते. मुंबईतल्या साठे कॉलेज किंवा पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर प्रभावीपणे ‘जरा समजून घ्या’ सादर करण्याच्या दृष्टीने अभयने हे नाटक चोख उभं केलय. अभयच्या दिग्दर्शनाचं सोनं होतं ते त्याच्या कलाकारांकडून.

डॉ. मोहन आगाशे अणि मंजुषा गोडसे हे दोघे निष्णात कलाकार ‘जरा समजून घ्या’ ची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलतात. डॉ. भागवतांच्या भूमिकांतून आगाशे बेळेंच्या लिखाणातला मिश्किलपणा नेमका बाहेर काढतात. आगाशे ‘जरा समजून घ्या’ हे हलकंफुलकं ठेवण्यात कमालीचे यशस्वी होतात, पण त्याच बरोबर ते विषयाचं गांभीर्य तितक्याच प्रभावीपणे पोहोचवतात. मंजुषा गोडसे आपल्या टीव्ही अँकरच्या भूमिकेत एकाचवेळी खोचक, भोचक अणि तरीही अभ्यासू अणि प्रामणिक आहे. विषयाच्या सर्व बाजू मांडण्याचं बेळेंचं कसब ती लीलया आत्मसात करून सदर करते. यामुळे ‘जरा समजून घ्या’ हे नाटक एकाच वेळी आशयघन अणि मनोरंजक असं दोही पातळीवर यशस्वी होतं.

 • नाटक   जरा समजून घ्या!
 • निर्मिती     महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे
 • लेखक   डॉ. विवेक बेळे
 • प्रकाश शिवाजी बर्वे, ओंकार हजारे
 • नेपथ्य   अनंत घारे
 • सूत्रधार शुभांगी दामले
 • दिग्दर्शक     अभय गोडसे
 • कलाकार     मंजुषा गोडसे, डॉ. मोहन आगाशे
 • दर्जा    ****
आपली प्रतिक्रिया द्या