साधं सोपं टवटवीत नाटक ‘खळी’

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी नाट्यक्षेत्रात वेगवेगळे घटक निर्माते म्हणून उभे ठाकत आहेत. व्यवसायाच्या वाढत्या खर्चावर उपाय म्हणून एकाहून अधिक निर्माते एका नाटकाच्या मागे उभे राहताना दिसत आहेत. ‘नाट्यमंदार’सारखी एक जुनी नाट्यसंस्थासुद्धा ‘विप्रा क्रिएशन्स’सारख्या नव्या संस्थेबरोबर हातमिळवणी करून नाट्यनिर्मिती करू लागली आहे. ही मराठी नाट्य व्यवसायात येणाऱ्या बदलाची नांदी आहे. खरं तर या संयुक्त निर्मिती पद्धतीची सुरुवात ‘नांदी’ या नाटकाने काही वर्षांपूर्वी केली होती. तब्बल चार निर्मिती संस्था एकत्र येऊन हे नाटक साकार झालं होतं. राजाराम शिंदे हे मराठी नाट्यसृष्टीतील एक जुनं आदरणीय नाव. आपल्या मुलाच्या, मंदारच्या नावाने त्यांनी ‘नाट्यमंदार’ ही संस्था उभी केली. त्यांच्या पश्चात मंदार शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने वेगवेगळ्या घाटणीची नाटकं सादर करून ‘नाट्यमंदार’ सुरू ठेवली. चांगल्या निर्मिती मूल्यांनी नटलेली नाटकं सादर करणं हे ‘नाट्यमंदार’चं यूएसपी म्हणावं लागेल. ‘विप्रा’ ही संस्था खरं तर नाट्यप्रेक्षकांची. संध्या रोठे व त्यांच्या कन्या प्रांजली मते यांनी प्रेक्षकांची संघटना सुरू केली. संचालन चांगलं असल्याने संघटना अल्पावधीत मोठी झाली. सभासदांच्या मतांवरून लक्षात आलं की, आपल्या सभासदांच्या अभिरुचीला साजेशी नाटकं कमी येतात आणि म्हणून मग ‘विप्रा क्रिएशन्स’ नाट्यनिर्मितीकडे वळलं. तीन-चार नाटकं निर्मित केल्यावर आता ‘विप्रा’ने ‘नाट्यमंदार’सोबत ‘खळी’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे.

‘खळी’ हे एक फिल गुड फॅक्टर असलेलं नाटक आहे. लेखक-दिग्दर्शक शिरीष लाटकर यांनी ‘खळी’ घडवलंय. मराठी दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात शिरीष लाटकर हे नाव सर्वश्रुत आहे. असंख्य मालिकांच्या अद्वितीय टीआरपीचं श्रेय शिरीष लाटकरांच्या खात्यात जमा आहे. आता जरी ही त्यांची प्रमुख ओळख असली तरी एक उत्तम लेखक म्हणून शिरीष लाटकर यांची सुरुवात ही मराठी रंगभूमीवरच्या एकांकिका वर्तुळातूनच नव्वदीच्या दशकात झालेली आहे. ‘खळी’ हे एक पावलोपावली अत्यंत सोप्या शब्दांत फिलॉसॉफी सांगणारं नाटक आहे. हे सोप्या शब्दांत तत्त्वज्ञानाचा बोध देणं सोपं नाही. शिरीष लाटकर यांनी हे कसब ‘खळी’मध्ये सहजपणे अवगत केलं आहे. एखाद्या प्रसंगात सुंदर आणि अनपेक्षित वाक्य आलं की ते आपल्याला सुखावतं आणि लक्षात राहतं. एखाद्या शिक्षकाने ‘खळी’ पाहिलं तर वर्षभर वर्गात फळ्यावर लिहायला सुविचार त्यांना एक-दोन तासांच्या प्रयोगातून मिळतील. लाटकरांनी ‘खळी’मध्ये एका सामान्य नोकरदार मराठी माणसाची गोष्ट मांडली आहे. खरं तर गोष्ट त्या मानवाच्या बेतास बेत दिसणाऱ्या बहिणीची आहे. तिच्या अतिसामान्य दिसण्याने न जमणाऱ्या लग्नामुळे त्रासलेला हा मानव एका ब्युटीशियनकडे धाव घेतो आणि मग नक्की कुणाकुणाच्या गालावर ‘खळी’ पडते ते हे नाटक.

दिग्दर्शनात लाटकरांनी ‘खळी’ सोपं ठेवलंय. तीन बेसिक स्थळांवर नाटक घडतं. मानवच्या घरातली त्याची बेडरूम, रस्ता-अंधेरी स्टेशन आणि ब्युटी पार्लर हवं तेव्हा, हवं तिथे प्रकाश टाकून ही तीन स्थळं दर्शविली गेली आहेत. पात्रांचा वावर हा अत्यंत सहज ठेवून दिग्दर्शक ‘खळी’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. आता या सगळ्या प्रवासात केवळ आवाजाचा वापर करून पावसाचा केलेला उपयोग परिणामकारक वाटतो. हल्ली कधीही पडण्याची पावसाची सवयदेखील ‘खळी’मध्ये वापरली गेली आहे. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य देदीप्यमान या सदरातच मोडतं. नाटकातला ब्युटी पार्लर इतका वास्तवादी झाला आहे की, कलाकार प्रयोगाअगोदर मेकअप ग्रीनरूम ऐवजी सेट लागल्यावर तिथेच करत असतील अशी शंका यावी. ‘खळी’मध्ये केतन पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं, बीना सातोसकर यांनी लिहिलेलं आणि स्वरांगी मराठी आणि केतनने गायलेलं एक सुरेख गीत आहे. या गीतावर एक साधं सोपं नृत्यदेखील आहे. केतन पटवर्धन हे नव्या दमाचे उत्तम संगीतकार आहेत. मी शून्य या कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या पुष्कळ रचना ऐकल्यानंतर त्यांच्या प्रतिभेची कल्पना आली होती.

‘खळी’मधला मानव संदेश जाधव याने खूप छान उभा केलाय. आजवर नाट्यस्पर्धा आणि काही समांतर नाट्यप्रयोगांमधून झळकणारा संदेश ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकातून खऱ्या अर्थाने नजरेत आला. संदेशने मानवची भाऊ म्हणून विवशता, माणूस म्हणून प्रगल्भता आणि स्वतःची आकांक्षा या तिन्ही गोष्टी उत्कटतेने दाखवल्या आहेत. ‘खळी’ जरी मानवच्या बहिणीच्या लग्न जमण्याचं नाटक असलं तरी ते आहे मानवचं नाटक. हे हुशारीने हेरून संदेशने मानव मनस्वीपणे साकारलाय. महानगरपालिकेत नोकरीला असलेली नेहा अष्टपुत्रे हिने चिंगी भावूकतेने भरलेली सादर केलीये. नेहाने ‘खळी’ नाटकाच्या प्रवासादरम्यान वाढत गेलेला आत्मविश्वास अत्यंत प्रभावीपणे दाखवला आहे. उपासना झालेल्या पल्लवी सुभाष आपल्या दिसण्यातूनच भूमिका उभी करतात. त्यांच्या दिसण्यातून आणि वावरातून ब्युटीशियनचा ग्लॅमर मिळतो. या सगळ्यामुळे ‘खळी’ हे पात्र रचनेत उजवं ठरतं आणि ठसतं. मंदार शिंदे आणि संध्या रोठे व प्रांजली मते यांनी वर्षाखेरीस हे असं प्रसन्न करणारं नाटक योजलं याचं कौतुक. मराठी नाटक पाहणारे प्रेक्षक वेगवेगळ्या पातळ्यावर नाटक पाहतात. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नाट्यरसिकांच्या मनावर शिरीष लाटकरांचं हे नाटक नक्कीच ‘खळी’ पाडेल. एकंदरीत नाटकाचा पोत पाहता निर्मात्यांच्या खिशाला ही ‘खळी’ खळगा करणार नाही असंही वाटतं. एक मस्त, काहीसं कुरकुरीत आणि खूपसं छान वाटायला लावणारं नाटक म्हणजे ‘खळी’.
क्षितिज झारापकर
[email protected]

 • नाटक     खळी
 • निर्माती नाट्यमंदार आणि विप्रा क्रिएशन्स
 • निर्माते     मंदार शिंदे, संध्या रोठे,
 • प्रांजली मते
 • नेपथ्य     संदेश बेंद्रे
 • प्रकाश    शीतल तळपदे
 • पार्श्वसंगीत महेश नाईक
 • संगीत     केतन पटवर्धन
 • गीत       बीना सातोस्कर
 • गायक    स्वरांगी मराठे
 • वेशभूषा   मिताली शिंदे
 • रंगभूषा    दत्ता भाटकर
 • लेखक, दिग्दर्शक शिरीष लाटकर
  कलाकार पल्लवी सुभाष, नेहा अष्टपुत्रे,
  संदेश जाधव.
 • दर्जा      अडीच स्टार