हाऊसफुल्ल : निखळ आनंदाची साठवण

3

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

‘‘मराठीमध्ये आवडते लेखक कोण?’’ असा एक प्रश्न कोणीही विचारला की, बहुतेकांकडून येणारं पहिलं उत्तर असतं, ‘‘पु. ल. देशपांडे’’. विचारणाऱ्यालाही हेच अपेक्षित असतं. मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळंच नातं आहे. महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पुलंनी वाचकांना आनंद देणाऱ्या कलाकृतींचं भरभरून दान दिलं. वाचक आणि वाचन यामधला पूल जोडण्यात पुलंचा महत्त्वाचा वाटा आहे, तर पुलंच्या विपुल लिखाणावर आजवर अनेक नाटकं, सिनेमे, मालिका, ध्वनिमुद्रणं प्रदर्शित झाली. त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांसोबत आपलं अनेक वर्षांच्या आपुलकीचं नातंही जुळलं आहे. त्यामुळे हे सगळं घडवणाऱ्या पुलंच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही त्यांच्या समस्त जुन्या, नव्या चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच म्हणायला हरकत नाही. त्यांच्या आयुष्याचे टप्पे, त्यांचे वाचलेले, ऐकलेले किस्से, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यक्तिरेखा, त्यांच्या कलाकृती आणि त्या अजरामर कलाकृती घडण्याचे क्षण…अशा सगळ्याच गोष्टींनी सजलेला ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा म्हणजे चाहत्यांसाठी आनंदोत्सव आणि भाईंच्या शतकमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त दिली गेलेली सगळ्यात सुंदर आदरांजलीच आहे.

या सिनेमात अगदी शाळेपासूनच्या त्यांच्या आयुष्याच्या घटना उलगडायला सुरुवात होते. या विनोदी लेखकाच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी पडद्यावर पाहताना आपल्या चेहऱ्यावर कधी नकळत हसू उमटतं तर कधी टचकन डोळ्यांत पाणी येतं. हा सिनेमा म्हणजे पुलंचा जीवनपट आहे. त्यामुळे इतर सिनेमांप्रमाणे त्याचं कथानक सांगण्यापेक्षा तो अनुभव प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन घेणंच जास्त आनंददायी ठरेल. खरं म्हणजे, पुलंच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना जवळ जवळ सगळं ठाऊक आहे. त्यांचं प्रत्येक लिखाण, नाटकं, सिनेमे, त्यांची पत्रं, त्यांची अनेक प्रसिद्ध वाक्यं, त्यांनी केलेल्या कोट्या… म्हणजे अगदी गप्पा मारतानाही आपण अनेकदा पुलंच्या वाक्यांचे संदर्भ घेतो. मग ज्याच्याबद्दल इतकं जास्त लिहिलं, बोललं, वाचलं गेलंय, त्यांच्यावरच्या सिनेमात आणखी वेगळं काय बघायला मिळणार, हादेखील एक प्रश्नच होता आणि म्हणूनच असे सिनेमे बनवणं हे सगळ्यात कठीण काम असतं. त्यांच्या विपुल कलाकृतीतल्या नेमक्या गोष्टी निवडता आल्या पाहिजेत, विनोदी लेखकावरचा सिनेमा आहे म्हणून उगाच सिनेमात विनोदाचा भडीमार होता कामा नये, त्यातली तरलता जपता आली पाहिजे किंवा जीवनपट आहे म्हणून त्यातल्या गांभीर्याचं वळणही फार टोकदार होऊ नये. अशा अनेक महत्त्वाच्या बाबी होत्या. लाडक्या भाईंचा सिनेमा म्हणून चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं होतं ते वेगळंच, पण सिनेमाच्या अगदी पहिल्या दृष्यापासून हा प्रश्न बाजूला पडलाय. या सिनेमात आपण वाचलेले किस्से नक्कीच आहेत, पण ते गुंफताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यांच्या आयुष्यातले हळवे क्षण इतक्या शिताफीने गुंफले आहेत की, सिनेमा पाहताना आपण त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात अगदी अलवारपणे गुंतत जातो.

सिनेमा सुरू होतानाच ते जेव्हा शेवटच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये होते तो प्रसंग उभा केलाय आणि तिथून अगदी अलगद पुलंच्या भूतकाळाच्या आठवणींचा पट उलगडत जातो. याची पटकथा लिहिताना लेखकाने प्रसंगांचा खूप बारकाई अभ्यास केलाय. त्यामुळे होतं असं की, ते प्रसंग आपल्याला ठाऊक असतात, पण त्या प्रसंगाच्या मागचा हळुवार भाव मात्र सिनेमा पाहताना उलगडतो. ‘भाई’मधून आपण त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण अनुभवतो तसंच निखळ आनंदाचं दान देणाऱ्या या माणसाच्या आयुष्यातल्या कडवट आठवणीही आपल्या समोर उभ्या रहातात. काही दृष्यांमध्ये तर त्यांचा हा असा स्वभाव का होता अशी हळहळही दाटून येते आणि तरीही त्यांच्या निरागस भावाने मन भरूनही येतं. त्यातल्या संवादांचा विशेष उल्लेख करायला हवा. पुलंचे प्रसिद्ध संवाद आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाला अनुसरून केलेली संवादांची गुंफण अप्रतिम. त्यांच्या आयुष्यातल्या असंख्य प्रसंगांतून नेमके प्रसंग निवडणं, त्यांची खुशखुशीत मांडणी करणं आणि त्याला तितक्याच नेमकेपणाने संवादांची जोड देणं आणि त्यातली टवटवी नव्याने समोर आणत दिग्दर्शन करणं हे खरं तर प्रचंड कठीण काम होतं, पण माहिती असलेल्या गोष्टी आणि त्यांच्या आयुष्याचे ठाऊक नसणारे काही पैलू यांची इतकी चपखल निवड आणि मांडणी केलीय की, त्यामुळे या सिनेमाचा प्रत्येक क्षण बहारदार होतो. सिनेमा पाहताना कुठेही ‘‘हे तर आपण पाहिलंय, परत काय पाहायचं’’ अशी भावना जराही येत नाही. उलट त्यांच्या अधूनमधून पेरलेल्या व्यक्तिरेखा, त्यांनी रंगवलेले किस्से त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात येताना बघणं हा प्रत्येकाने घ्यावा असाच अनुभव आहे.

सागर देशमुख या अभिनेत्याने उभी केलेली भाईंची व्यक्तिरेखा अतिशय सहजसुंदर. पुलंची व्यक्तिरेखा आजवर अनेक कलाकारांनी साकारली आहे, पण आजवरच्या कुठल्याही भूमिकेचा प्रभाव पडू न देता त्याने या व्यक्तिरेखेशी समरस होत उभी केलेली पुलंची व्यक्तिरेखा लगेच आवडून जाते. इरावती हर्षेनी साकारलेली सुनीताबाईदेखील छान! सुनीताबाईंचा स्वभाव खूप कडक होता असं म्हटलं जातं, पण त्याची कारणमीमांसा या सिनेमातून समोर येते. त्यांना दिवस गेल्याची बातमी आणि त्यावर भाईंची प्रतिक्रिया हा प्रसंग पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाच अस्वस्थ व्हायला लागतं. नाजूक प्रसंग सिनेमा अतिगंभीर न करतानाही त्याचं प्रासंगिक गांभीर्य योग्य पद्धतीने जपत उभे केले आहेत. तसंच पुलंच्या प्रेमात पडण्याचा आणि त्यानंतर कोकणातल्या लग्नाचा प्रसंग. त्यांच्या आयुष्यातला हा खास टप्पा पाहताना खरंच खूप मजा येते. वसंतराव, कुमार गंधर्व, भीमसेन जोशींसारख्या बडय़ांच्या घरगुती आठवणी, त्यांची आई, वडील, बायको, भाऊ इत्यादींसोबत असणारं नातं…. हे सगळं पाहताना हा सिनेमा मनात हळुवारपणे साठत जातो. छोट्या छोट्या भूमिकांमधून येणारे अनेक कलाकार आणि त्यांनी उभ्या केलेल्या प्रसिद्ध व्यक्तिरेखाही मस्त जमून आल्या आहेत.

या सिनेमाचं संगीत हा तर या सिनेमाचा एक खास जपून ठेवावा असा पैलू आहे. प्रत्येक गाणं, अगदी ‘नाच रे मोरा’ची निर्मिती असो वा ‘कानडा राजा पंढरीचा’ ही रंगलेली दिग्गजांची मैफल असो, सगळंच भारावून टाकणारं आहे. वर्षाची सुरेख सुरुवात करणारा हा सिनेमा खरोखर गरजेचा होता. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन, गणेश मतकरीची पटकथा, रत्नाकर मतकरींचे संवाद, अजित परब यांचं संगीत, सगळ्या कलाकारांचा अभिनय या गोष्टी तर आहेतच, पण तो काळ उभा राहतानाची प्रकाश योजना असो, सिनेमा संपताना दाखवले गेलेले काही प्रसंग असोत किंवा अगदी सिनेमा सुरू होताना येणाऱ्या नामावलीच्या अक्षरांना वापरलेला फॉन्ट असो…. हे सगळंच्या सगळं आपल्याला आपल्या लाडक्या भाईंच्या जगात आनंदयात्रेला घेऊन जातं, आपण या सिनेमाच्या सूरामध्ये तल्लीन होतो आणि तिथेच सिनेमा संपतो. जेव्हा भानावर येतो तेव्हा हे अपुरं आहे, अजून पाहायला मिळावं असं मनापासून वाटायला लागतं आणि तेव्हाच हा पूर्णविराम नाही, अर्धविराम आहे, या सिनेमाचा उत्तरार्ध अजून बाकी आहे ही भावना सुखावून जाते.

  •  दर्जा   : ****
  • सिनेमा : भाई : व्यक्ती की वल्ली
  • निर्माता/ दिग्दर्शक : महेश मांजरेकर
  • पटकथा : गणेश मतकरी
  • संवाद : रत्नाकर मतकरी
  • संगीत   : अजित परब
  • कलाकार : सागर देशमुख, विजय केंक्रे, संकेत कुलकर्णी, इरावती हर्षे-मायदेव, सतीश आळेकर, आश्विनी गिरी, सचिन खेडेकर