वेडिंगचा शिनेमा: या शिनेमाला जायचं हं!

4

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

कचकचीत तापलेल्या वातावरणात जशी अवचित येणारी एखादी गार वार्‍याची झुळूक स्वर्गीय सुखाचा आनंद देते अगदी तसाच अनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’ नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाचा विषय अगदी साधासोपा, नेहमीच्या आयुष्यातला आहे. पण त्याच्या लिखाणाची, अर्थात पटकथेची मांडणी, हलक्या फुलक्या संवादांची अगदी नेमकी पाखरण, सहज अभिनय आणि या सगळ्यावर चढलेला सुरेल साज यामुळे हा लग्नाचा शिनेमा पहाताना खूप छान वाटतं.. अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या दृष्यापर्यंत ओठांवरचं हसू कायम राहातं आणि सिनेमा संपताना मनातच आयुष्य सुंदर आहे याची नकळतच अनुभूती येते.

वेडिंगचा शिनेमा हा सिनेमा आहे एका आकंठ प्रेमात बुडालेल्या जोडप्याचा. त्या दोघांचं एकमेकांवर असं पटकन पेम बसतं आणि आपापल्या घरी कळवून घरच्यांच्या संमतीने ते लग्न ठरवूनही टाकतात. यात इतर काहीही अडचण नसते. दोन्ही कुटुंब व्यवस्थित सधन असतात पण फक्त प्रश्न असतो तो एकमेकांच्या संस्कृतीचा. ती मुंबईला पॉश फ्लॅटमध्ये रहाणारी, डॉक्टर आई वडील. दोघेही बिझी, न्युक्लिअर कुटुंबपद्धती, एकमेकांना भेटायलाही वेळ घ्यावी लागते अशा परिस्थितीत ती लहानाची मोठी झाली. स्वत: मॉडर्न विचारांची आणि राहणीमानाची डॉक्टर मुलगी. तर तो अगदी विरुद्ध… तालेवार कुटुंब, घरात भरपूर माणसं, पाहुण्यांचा राबता, गावाकडचं रहाणीमान, त्यामुळे खेडवळ भाषा, इंग्रजी भाषेशी असलेलं वाकडं, टेंशन फ्री मस्त जगणं… अशा दोन अगदी भिन्न वातावरणात लहानाची मोठी झालेली दोन मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा या दोन कुटुंब पद्धती एकत्र येतात. लग्नाआधी या लग्नाच्या आठवणी जपणारं एक प्री वेडिंग शूट अर्थात लग्नाचा सिनेमा करायचा ठरतो. मग त्यातनं जी तारांबळ उडते, गमती जमती घडतात त्याचं सुंदर कोलाज म्हणजे वेडिंग शिनेमा हा सिनेमा.

या सिनेमात अभिनयाची बाजू तर खूपच दमदार आहे. दिग्दर्शिकेच्या भूमिकेत मुक्ता बर्वे एकदम खुलून दिसली आहे. बरं तिची वेगळा विचार करायची पद्धत आणि या सिनेमाच्या निमित्ताने वाट्याला येणार्‍या विविध माणसांना भेटताना तिच्यात होत जाणारा बदल हे सगळं तिच्या व्यक्तिरेखेतून अगदी सहज उभं राहिलं आहे. सुरुवातीला तिचे विचार, नंतर कालांतराने बदलत जाणारी मानसिकता, ज्या गोष्टीबद्दल ती ज्या चौकटीतून बघत असते त्या चौकटी बाहेर बघताना जाणवणार्‍या संवेदना या सगळ्या गोष्टी छोट्या प्रसंगातून खूप मस्त उभ्या राहिल्या आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार या दोघांची केमिस्ट्रीही मस्त. अगदी वेगळी व्यक्तिमत्व पण विरुद्ध स्वभावाची माणसं एकमेकांना आकर्षित कशी होतात तो सहजपणा या दोघांची जोडी पहाताना जाणवतो आणि मनोमन पटतोही. ऋचाने ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अगदी छान उभी केली आहे. निखळ हसणं, डोळ्यात लग्नाळू स्वप्नं, पेमाने लागलेलं वेड हे सगळं गमतीशीर वाटतं आणि बघायलाही धम्माल येते. शिवराज वायचळचा अभिनय तर अगदी सहज झालाय. त्याचा साधेपणा, गावाकडचा आब हे सगळं बघायला मस्त वाटतं. दोन कुटुंबांमधला फरक दाखताना एकीकडे सुनील बर्वे आणि आश्विनी काळसेकर तर दुसरीकडे शिवाजी साटम, अलका कुबल, संकर्षण कर्‍हाडे अशी फौज उभी राहिलीय…  शिवाय भाऊ कदम, प्रवीण तरडे, त्यागराज खाडीलकर यांच्या व्यक्तिरेखाही या सिनेमात रंग भरायला खूप मोलाच्या ठरतात. एकूणच यातली छोट्यातली छोटी व्यक्तिरेखाही खूप मस्त जमून आली आहे आणि सगळ्यांनी कामदेखील उत्तम केलंय.

सिनेमाच्या कथेत असणारा साधेपणाच जास्त भावतो. म्हणजे कथेत खूप नाट्य किंवा वळणं टाळून अगदी ओघवता, साधा पण मोहक असा प्रवाह आहे. पटकथाही चटपटीत आणि खिळवून ठेवते. जरी सिनेमा हलकाफुलका असला तरीही काही हळवे क्षणही वाट्याला येतात आणि गंमत म्हणजे एका क्षणी आपण खळखळून हसत असतो त्याच वेळी त्या हळव्या क्षणी आपल्या डोळ्यांमधनं पाणीदेखील येतं. संवाद चटपटीत आहेत. उगाच अंगविक्षेप आणि हास्य आणण्याचा अतिरेक नाही. खरं म्हणजे अशा प्रकारे सातत्याने प्रेक्षकाला हसवणं कठीण असतं. पण या सिनेमातनं ते नक्कीच साधलं गेलंय. आणखी एक, या विनोदांमध्ये केवळ हसवण्याकरिता विनोद नाही तर नकळतच काही एक अर्थही उलगडतो आणि त्यातला विनोद जेव्हा आनंद देतो तेव्हा आशय मनामध्ये झिरपतो. या सिनेमाची अजून एक गंमत आहे. तरुणाईला तो सिनेमा पहाताना आपलासा वाटतो. आपल्या वयाचे संदर्भ, आपल्या अवती भोवतीच्या गोष्टी, नवी विचारसरणी त्यांना या सिनेमात गवसते. पण त्याचवेळी मोठय़ा वयाच्या माणसांनाही हा सिनेमा आपलासा वाटतो. त्यांच्या विचारसरणीचं प्रतिबिंबही तितकंच प्रखरपणे उभं राहिलं आहे. त्यामुळे दोन्ही पिढ्यांना सांधणारा एक दुवा हा सिनेमा निर्माण करतो.

सलील कुलकर्णीने केलेलं दिग्दर्शन त्याच्या आजवरच्या संगीताइतकंच सुंदर. अगदी तरल आणि मनावर पकड घेणारं. त्याच्या गाण्यांमध्ये जो एक ओघवता आणि मनावर पकड घेणारा भाव असतो तोच भाव त्याने या सिनेमामध्येही राखलाय. आणि त्या संगीताच्या चाहत्यांना नक्कीच हा सिनेमादेखील तितकाच आवडून जाईल यात शंका नाही. या सिनेमाची गाणी झक्कास… आणि संगीतकाराचाच सिनेमा असल्याने खास संगीत अपेक्षित होतंच आणि गावाचा, तरुणाईचा रंगीबेरंगी टवटवीदेखील कॅमेर्‍यातनं छान पकडली आहे.

शहरी माणसांमधला एकलकोंडेपणा, घड्याळ्याच्या काट्यावर अडकलेलं आयुष्य पहाताना आपल्या आजूबाजूला हे असंच आहे हे तीक्रतेने जाणवतं. कदाचित तो ताण, तो वेग आपल्या नकळतच आपल्याभोवतीही आहे याचीही जाणीव होते. त्याच वेळी गावाकडचा मोकळेपणा, दिलखुलास स्वभाव हे वातावरणातनं झिरपलेली निरागसता हे सगळं खूप देखणं वाटायला लागतं. सुरुवातीचा रक्तदानाचा प्रसंग, लग्नाचं होर्डिंग बनवणं, गावाकडच्या लोकांच्या ऑडिशन्स, मी पेमात पडलोय हे सांगायची धाकधूक आणि वडिलांना सांगतानाची गंमत असे अनेक छान प्रसंग यात सहजतेने गुंफले आहेत. एकूणच हा सगळा प्रपंच अथपासून इतिपर्यंत आनंदच देतो. एकूणच हा वेडिंगचा शिनेमा हा सोहळा प्रत्येकाने अनुभवावा आणि तप्त क्षणांमध्ये सुखवणारी हळुवार झुळूक नक्की अनुभवावी.  

दर्जा        : ***1/2

सिनेमा    : वेडिंगचा शिनेमा

निर्माता    : गेरुआ प्रॉडक्शन्स, पीईएसबी

दिग्दर्शक   : डॉ. सलील कुलकर्णी

कलाकार   : मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ,  ऋचा इनामदार, भाऊ कदम, प्रवीण तरडे,

                 शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, आश्विनी काळसेकर,

                 संकर्षण  कर्‍हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे.