तरुणाईचा प्रयोगशील हुंकार ‘कॅरेक्टर्स प्ले’


>> क्षितिज झारापकर
[email protected]

‘कॅरेक्टर्स प्ले’आजची तरुणाई जेव्हा रंगभूमीवर आपले विविध प्रयोग सादर करत असते तेव्हा मनोरंजन क्षेत्रातील रंगभूमीचे स्थान अधिकाधिक बळकट होत जाते.

गेल्या शतकाच्या सत्तर आणि ऐशीच्या दशकात मराठी नाटय़ चळवळ खूपच तब्येतीत चालू होती. पुढे नावारुपाला येणाऱया अनेक प्रतिभाशाली रंगकर्मींचा ऐन उमेदीचा काळ होता तो. महाविद्यालयीन एकांकीका आणि कला स्पर्धा खूपच महत्त्वाच्या होत्या. त्यांच्या त्यावेळेस राडे वगैरेही व्हायचे. शिक्षणाच्या निमित्ताने हे रंगकर्मी महाविद्यालयात सदोदित एकत्र असायचे. कलेची मनसोक्त उपासना करायचे. त्यातूनच सशक्त कलाविष्कार व्हायचे आणि मराठी नाटय़सृष्टी अधिकच समृद्ध होत गेली. पण कॉलेजात एकत्र असणारी ही कलासक्त मंडळी नंतर नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने विखुरली गेली.

कॉलेजातील नाटकाचा ग्रुप हा दर तीन-चार वर्षांनी नव्या चेहऱयांनी फुलून यायचा. पण जी नाती आणि अंडरस्टॅण्डिंग त्या ग्रुपमध्ये निर्माण व्हायचं ते खऱ्या जगात मिळणं कठीण होतं. त्यात आयुष्याच्या टप्प्यानुसार प्राथमिकता बदलल्याने ओळखीची माणसं बदललेली जाणवायची. याचं सुमारास मराठी माणसांचं मुख्य मुंबईतून उपनगरांमध्ये स्थित्यंतर घडू लागलं. यामुळे तर तरुण नाटय़कर्मींना जाणवणारा हा क्रिएटिव्ह व्हॉईड अधिकच तीव्र होत गेला. त्यातूनच काही मातब्बर नाटय़संस्था जन्माला आल्या. कॉलेजात एकत्र असणारे पण आता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे रंगकर्मी एकत्र येऊन या संस्था सुरू करू लागले. मराठी नाटय़सृष्टीला असलेली सकस कलाविष्कारांची भूक या संस्थांमधून भरून पावत होती. अशाच संस्थांमधे एक संस्था याच सुमारास पार्ल्यात सुरू झाली. ती संस्था म्हणजे ‘माध्यम’. माध्यम ही संस्था डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी सुरू केली. अनेकांचा त्यात मोलाचा सहभाग होता. पण हे सगळं इथे मांडण्याचं कारण म्हणजे ‘माध्यम’ने काही काळाच्या स्वल्पविरामानंतर आता पुन्हा उभारी घेण्याचं ठरवलं आहे आणि डॉ. अनिल बांदिवडेकरांचंच एक दोन अंकी नाटक ‘कॅरेक्टर प्ले’ त्यांनी सुरू केलेलं आहे.

डॉ. अनिल बांदिवडेकर हे मराठी रंगभूमीला, त्यातही प्रायोगिक रंगभूमीला ज्ञात असलेलं एक अत्यंत संवेदनशील लेखकाचं नाव. त्यांचं ‘कॅरेक्टर प्ले’ हे नाटकही तसंच आहे. माणसाच्या मनातल्या सगळ्या तर्क्य आणि अतर्क्य भावनांशी बांदिवडेकर खेळतात. तसे ते नेहमीच खेळत आलेले आहेत. ‘कै. पार्ले’, ‘बंद दरवाजे’ किंवा ‘माहीम की खाडी’ ही त्यांची आधीची नाटकं याला पुरावा आहेत. भावनांच्या या खेळाला नाटक हे एक माध्यम बनवून बांदिवडेकर प्रेक्षकांच्या पुढय़ात ठवतात. ‘कॅरेक्टर प्ले’ हे नाटक ही तीन पात्रांच्या मदतीने प्रेक्षकांना अनेक भावविष्कारांची सैर घडवतं. एका आडगावच्या कॅफेमध्ये एक तरुण जोडपं येतं. गावातल्या कचेरीत ते नोंदणीकृत लग्न करणार असतात. इथेच बांदिवडेकर आपल्या अपेक्षांना छेद देऊ लागतात. कारण जोडप्यातील स्त्राr ही मुलापेक्षा काकणभर का होईना वयाने मोठी आहे हे जाणवतं. लग्नाची नोंदणी करण्यासाठी लागणारा विटनेस त्यांचाच एक मित्र येऊ शकत नाही. मग त्या कॅफेत भेटणाऱया एका व्यक्तीला विटनेस बनण्याची विनवणी सुरू होते. आता ही तीन कॅरेक्टर्स आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या आणि एकमेकांबद्दलच्या भावना यांचा एक स्मार्ट खेळ म्हणजेच ‘कॅरेक्टर प्ले’ हे नाटक. तो कॅफेतला माणूस, वयाने दोघांपेक्षा जरा जास्तच मोठा असलेला, वेळ घालवण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रेयसींच्या आठवणी रंगवून सांगू लागतो. प्रत्येक आठवणीत तोदेखील बदललेला असतो हे ‘कॅरेक्टर्स प्ले’चं मर्म.

राजू वेंगुर्लेकर दिग्दर्शित आणि विविधा इव्हेन्टस् निर्मित ‘कॅरेक्टर्स प्ले’ या नाटकाने यंदाची हौशी राज्य नाटय़स्पर्धा गाजवली आहे. मुळात बांदिवडेकरांच्या सृजनशील लिखाणाला राजू वेंगुर्लेकरांनी खूप रंजक पद्धतीने सादर केलाय. नाटक प्रायोगिक घाटणीचं आहे. आशय व्यावसायिक नाटय़ प्रयोगासारखा सोयिस्कर नाही. तरीही राजू वेंगुर्लेकरांनी ‘कॅरेक्टर्स प्ले’ हे नाटक एन्टरटेनिंग पद्धतीने मांडलंय. त्यांना त्यांच्या कलाकारांनी सार्थ साथ दिली आहे. नाटकातला वैभव आपल्याला आजच्या तरुण पिढीची बेफिकिरी खूप प्रभावीपणे दाखवतो. मटेरियलिस्टीक गोष्टींना भर देताना स्वतःच्या आणि आजूबाजूच्या इतर व्यक्तींच्या भावभावनांना कसं गृहीत धरलं जातं हे प्रकर्षाने जाणवतं. त्याची पेयसी आपल्याला आजची स्त्री आपल्याला नेमकं काय हवंय याबाबत सतत संभ्रमात कशी असते ते दिसतं. त्या कॅफेचा केअरटेकर म्हणून असणारी व्यक्ती ही या दोघांपेक्षा प्रगल्भ अणि म्हणूनच जास्त पोक्त विचार करणारी. तीनही कलाकारांनी आपापली पात्रे चोख वठवून नाटकाच्या माध्यमातून ती उत्तमपणे पोहोचवली.

‘कॅरेक्टर्स प्ले’ या नाटकाला आवश्यक ते कॅफेचं नेपथ्य विविधा इव्हेन्टस् आणि ‘माध्यम’ने व्यवस्थित उभं केलं. प्रकाश योजनाही उत्तम झालेली होती. नाटक पाहताना एक परिपूर्ण अनुभव मिळायला हवा तसा अनुभव ही ऍमॅच्युअर रंगकर्मी मंडळी देण्यात यशस्वी झाली. काही तासांचं कथानक असलेलं हे एक वेगळं नाटक आहे. साधारणतः आपण नाटकात अनेक घटना अपेक्षित करत असतो. ‘कॅरेक्टर्स प्ले’मध्ये घडणारी घटना म्हणजे एका कॅफेत तीन पात्र भेटणं. नंतर दोन अंक जे घडतं तो भावनांचा खेळ. कलाकारांना असं नाटक पेलणं खूप कठीण असतं. हे साध्य केल्याबद्दल ‘कॅरेक्टर्स प्ले’च्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक.

तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि गेली पंधराएक वर्षे स्थगित असलेल्या ‘माध्यम’ या संस्थेला पुन्हा सुरुवात ‘कॅरेक्टर्स प्ले’ या नाटकाने झालेली आहे. आता ही प्रायोगिक नाटय़संस्था पुन्हा जोमाने कार्यरत होतेय. ‘माध्यमरंग’ हा एक नवीन उपक्रम सुरू होतोय. त्यांच्या या वाटचालीला शुभेच्छा आणि ‘कॅरेक्टर्स प्ले’सारखे सकस आणि रंजक कलाविष्कार त्यांच्या मध्यमातून मराठी रंगभूमीला सतत मिळत राहोत ही प्रार्थना.

दर्जा :    अडीच स्टार

नाटक :  कॅरेक्टर प्ले

निर्मिती : विविधा इव्हेन्ट्स

लेखक : डॉ. अनिल बांदिवडेकर

दिग्दर्शक : राजू वेंगुर्लेकर