सुखद शीतल माधुर्य

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

‘बकेट लिस्ट’ म्हणजे मनातल्या सुप्त इच्छा. मला आयुष्यात काय काय करायचंय याची यादी. मग ती काहीही असू शकते. ती यादी आधीच लिहून काढून नंतर ती पूर्ण करायचा ध्यास धरणं आणि स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगणं यात काही गंमत असते…. तरुणाईच्या याच संकल्पनेभोवती फेर धरणारा ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि या निमित्ताने असंख्य मराठीजनांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असणारी इच्छा म्हणजेच माधुरी दीक्षितला कधीतरी मराठी सिनेमात काम करताना पाहाणं नक्कीच पूर्ण झालीय. त्यामुळे तार्किकता किंवा इतर कुठच्याही निकषांवर हा सिनेमा थोडा कमी जास्त असला तरीही अखंड सिनेमाभर माधुरी दीक्षितला पाहाणं ही मात्र नक्कीच सुखद गोष्ट आहे आणि त्यातच या बकेट लिस्टचा खरा आनंद आहे.

ही गोष्ट आहे एका मध्यमवयीन गृहिणीची. घरचं काम, घरातल्या लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळय़ांचं सगळं पाहाणं, चेहऱयावर कायम हास्य कायम ठेवून सगळय़ा गोष्टी पार पाडत राहणं वगैरे थोडक्यात गृहकृत्यदक्ष गृहिणीची कार्य ती अगदी मनापासनं पार पाडत असते. पण तिला हृदयविकार असतो आणि तिच्या नशिबाने तिला हृदय मिळतं. सगळेजण आनंदी होतात, पण आपल्याला कोणाचं हृदय मिळालंय ही उत्सुकता तिला शांत बसू देत नाही. जेव्हा आपल्याला जीवनदान देणारी ती मुलगी केवळ वीस वर्षांची होती आणि दुर्दैवी अपघातात तिचं आयुष्य संपलं म्हणून आपल्याला आयुष्यं मिळालं हे तिला कळतं तेव्हा ती खूपच अस्वस्थ होते आणि तिची अर्धवट राहिलेली बकेट लिस्ट पूर्ण करायचा ध्यास घेते. मग ती बकेट लिस्ट पूर्ण करू शकते का, काय असतं त्या बकेट लिस्टमध्ये. वीस वर्षांच्या मुलीची बकेट लिस्ट पूर्ण करताना दुप्पटीपेक्षा जास्त वयाच्या बाईला काय काय अडचणी येतात आणि त्यातनं ती कशी पार पडते. तिच्या या ध्यासाचा आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होतो. काय गंमती होतात आणि काय अडथळे येतात… वगैरे म्हणजेच ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा.

एखादी खास व्यक्ती किंवा सेलिब्रेटी येणार म्हटल्यावर जसं सगळं चकाचक केलं जातं तसंच माधुरी दीक्षितच्या मराठी पदार्पणाचा हा सिनेमाही अगदी चकाचक देखणा आहे. त्याचं छायांकन, त्यातलं कला दिग्दर्शन, स्वप्नवत घरं, त्यातली माणसं, त्या माणसांचं वागणं, पिकनिकची किंवा इतर कुठचीही आवश्यक ती लोकेशन्स, कपेडपट इत्यादी इत्यादी… सगळंच कसं चकचकीत, आखीव रेखीव आहे. या सगळय़ात कुठेही उन्नीस बीसही नाही. विशेष म्हणजे जवळ जवळ प्रत्येक फ्रेममध्ये माधुरी दिसते आणि त्यामुळे नकळतच ती आधीच सुंदर केलेल्या फ्रेमचं देखणेपण आणखीनच वाढतं. यात माधुरीची प्रमुख भूमिका वगळता तिची मुलं, नवरा, सासू, सासरे, आई, वडील, सईचे आई, वडील भाऊ, मित्र, मैत्रिणी सगळय़ांना कमी जास्त कामं आहेत आणि ती सगळय़ांनी मस्त निभावलीयत. सुमित राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, मिलिंद फाटक, सुमेध मुडगळकर, कृतिका देव, रेशम टिपणीस इत्यादी तगडय़ा स्टार्संनी सिनेमाला नक्कीच वजन आलंय आणि माधुरी दीक्षित तर पडद्यावर बहर आणते. भले तिचे संवाद किंचित वेगळे वाटत असले तरीही… (कदाचित तिला इतकं मराठी बोलताना पाहून वेगळं वाटत असेल.) एकूणच हा सिनेमा आखीव राखीव चौकटीतला असल्यामुळे त्याला देखणेपण तर आलंय तसंच मर्यादाही आल्या आहेत. खरं म्हणजे माधुरीची ही भूमिका आणि श्रीदेवीने ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये साकारलेली भूमिका या दोन्हीत बरंच साधर्म्य आहे. छोटय़ाशा विषयाला खुलवणं फुलवणं आणि कलाकाराला त्याच्या क्षमतेनुसार ती व्यक्तिरेखा साकारायला मोकळेपणा देणं हे जितकं ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये सहज दिसलं तितकं या ‘बकेट लिस्ट’मध्ये दिसत नाही. असो, माधुरी दीक्षित प्रचंड क्षमतेची अभिनेत्री असल्याने हा विचार डोक्यात येतो इतकंच. पण त्यामुळे अर्थात सिनेमा खटकत अजिबात नाही. उलट माधुरी दीक्षितचं बाईक शिकणं आणि बाईकच्या स्पर्धेत भाग घेणं किंवा पबमधला गोंधळासारखे अनेक प्रसंग पहाताना नक्कीच खदखदून हसायला येतं. साधा वेष असो वा खास पोषाख पण प्रत्येक लूकमध्ये इतकं सुंदर दिसणं आणि त्या लूकसोबत तिच्या खास ठेवणीतल्या हास्याची जोड पहाताना सिनेमाभर छान वाटत राहतं. शेवटाकडे तिचं ते खास नृत्यं म्हणजे तर दुधात साखरच. या सिनेमाची गाणी इतकी लक्षात राहण्याजोगी नाहीत. काही प्रसंगदेखील अगदीच बालीश आहेत.

सिनेमाच्या सुरुवातीला माधुरीचं हृदयाचं ऑपरेशन होणार असतं आणि ती डॉक्टरला नवऱ्याला घरगुती सूचना द्यायला सांगते. प्रसंगाचा गंभीरपणा आणि त्यातलं हे पहिलंच दृश्यं पहाता उगाच विनोदीपणा घडवून आणल्यासारखा वाटतो. रणबीर कपूरचं भेटणं हेदेखील तितकंसं प्रभावीपणे दिसत नाही, पण ठीक आहे. या सगळय़ा गोष्टी नक्कीच माफ करता येतात. बाकी दिग्दर्शन, लिखाण या गोष्टी तशा बऱया जमल्या आहेत. कुटुंबाने एकत्र बसून पहाता येईल आणि माधुरीला मराठी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पूर्ण करणारा हा ‘बकेट लिस्ट’ नक्कीच करमणूक करायला यशस्वी होतो.

सिनेमा -बकेट लिस्ट
दर्जा – तीन स्टार
निर्माता – जमाश बापूना, अमिनत पंकज पारिख, अरुण रंगचारी, विवेक रंगचारी, आरती सुभेदार, अशोक सुभेदार
दिग्दर्शक/ कथा – तेजस प्रभा विजय देओस्कर
पटकथा – तेजस प्रभा विजय देओस्कर, देवश्री शिवडेकर
छायांकन – अर्जुन सोरटे
संगीत – रोहन रोहन
कलाकार – माधुरी दीक्षित-नेने, सुमित राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, मिलिंद फाटक, सुमेध मुडगळकर, कृतिका देव, रेशम टिपणीस.