गुदगुल्या करणारा सस्पेन्सपट- ‘मस्का’

156

>>रश्मी पाटकर, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत मोजकेच सस्पेन्सपट येऊन गेले आहेत. त्यातही गंभीर, बुद्धीला चालना देणाऱ्या आणि खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. पण, एखादा थरार गुदगुल्या करून एखाद्याच्या गळी उतरवता येऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित मस्का हा चित्रपट.

‘मस्का- खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ ही कॅचलाईन असलेला चित्रपट सुरू होतो तो यादव या माणसाच्या दुःखापासून. १८ वर्षांचा मनोरुग्ण असलेला चिकू नवाचा मुलगा आणि वयाने बरीच तरुण असलेली माया नावाची बायको असलेला यादव परिस्थितीने पिचलेला असतो. त्याच्या परिस्थितीची दया येऊन अनेक धनवान त्याला पैसे देऊ करतात.. आणि इथेच चित्रपटाचा पहिला धक्का बसतो. यादव, चिकू आणि माया हे त्रिकूट अस्सल ठग असतात. लोकांना परिस्थितीची मस्का लावून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि मग पोबारा करायचा, हा या त्रिकुटाचा नेहमीचा उद्योग. अशाच ‘पोकेमॉन’च्या शोधात त्यांच्या गळाला हर्ष नावाचा सोन्याचा मासा लागतो. ते तिघे त्यालाही गटवायचा प्रयत्न करतात. पण, एका क्षणाला हर्षला या तिघांच्याही प्लॅनचा पत्ता लागतो. मग सुरू होतो बुद्धिबळाचा एक नवीन डाव. यावेळी या डावात हर्षला परितोष नावाच्या तरुणाची साथ मिळते. उत्तरोत्तर रंगत जाणारा हा डाव नेमका कुठे पूर्ण होतो आणि या चित्रपटातला नेमका मस्काबाज कोण हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

चित्रपटाची कथा ही प्रथमतः कोणत्याही सस्पेन्स चित्रपटासारखीच आहे. पण, या कथेला दिलेला विनोदाचा तडका मात्र पोट दुखेपर्यंत हसवतो. गंभीर कथेत जागोजागी विनोद आणि परिस्थितीजन्य गमतीची पेरणी केल्यामुळे हा सस्पेन्स डोक्यासोबत गालांनाही चालना देतो. यात चित्रपटातल्या कलाकारांचा मोठा वाटा आहे. यादव झालेल्या शशांक शेंडे यांना आपण नेहमीच गंभीर भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण, ग्रे शेडच्या यादव या भूमिकेत त्यांनी कमाल केली आहे. विशेषतः विनोदी प्रसंगांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेक्षकांना हसायला भाग पाडतात. प्रार्थना बेहरे हिने नखरेल, तरबेज आणि एक नंबरची बदमाश माया साकारली आहे. इतर चित्रपटात केवळ गुडीगुडी नटीच्या तुलनेत प्रार्थना इथे मात्र चांगलीच भाव खाऊन जाते. अनिकेत विश्वासराव याने साकारलेला हर्षही तोडीस तोड. सुरुवातीचं प्रेमात वाहून जाणं आणि नंतर बदलत गेलेला, फसवणुकीनंतर शह-काटशह देऊ पाहणारा हर्ष त्याने ताकदीने साकारला आहे. विशेष कौतुक करायला हवं ते चिकू झालेल्या प्रणव रावराणे आणि परितोष झालेल्या चिन्मय मांडलेकर या दोघांचं. प्रणव आणि चिन्मय यांचं टायमिंग आणि गंभीर प्रसंगांमध्येही पकडलेलं विनोदी बेअरिंग लाजवाब आहे. अनिकेत आणि चिन्मय या दोघांचा बारमधला प्रसंग तर हसवून पुरेवाट करतो. त्यासाठी कलाकारांचं विशेष अभिनंदन.

दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रियदर्शन जाधव यांनी चौकार हाणला आहे. एखादी कडू गोळी मधात घोळवून द्यावी तसा सस्पेन्स विनोदात घोळवून त्यांनी मस्काच्या रुपात सादर केला आहे. अनिकेत, प्रार्थना, चिन्मय, प्रणव आणि शशांक अशा वेगवेगळ्या पठडीतल्या कलाकारांकडून एकत्र काम करवून घेणं यातच प्रियदर्शन यांचं वेगळेपण दिसून येतं. बाकी तांत्रिक बाबीही ठीकठाक. फक्त काही ठिकाणी प्रसंग कापल्यासारखे वाटतात. त्यामुळे लगेच संगती लागत नाही. संगीताची बाजूही उत्तम आहे आणि त्यात बया या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. एकूण काय, तर हा मस्का बिनधास्त लावून घ्या. तो तुमची फसवणूक नाही, तर हसवणूक करेल.

आपली प्रतिक्रिया द्या