हाऊसफुल्ल:  नशीबवान; एका स्वप्नाची वास्तवातली गोष्ट

7

वैष्णवी कानविंदे-पिंगे

नशिबाचा  खेळ आहे सगळा… नशीब उघडलंय… नशीब माझं… नशीबच फुटकं त्याला कोण काय करणार… नशिबाने थट्टा मांडलीय…. अशी वाक्यं आपण रोजच्या आयुष्यात सर्रास टाकत असतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नशिबाला बोल लावतो किंवा नशिबाचे गोडवे गातो; पण याच नशिबाने अकल्पित असं वळण घेतलं तर… कधी घडण्याची शक्यताच नाही अशी एखादी गोष्ट घडली तर काय होईल त्या माणसाचं… नशिबाचं मिळालेलं दान तो कसं स्वीकारू शकेल…. याच काल्पनिक गोष्टीची वास्तवाशी सांगड घालून उभा केलेला सिनेमा म्हणजे नशीबवान.

ही गोष्ट एका अत्यंत गरीब अवस्थेत राहणार्‍या सफाई कामगाराची आहे. चारघरची धुणीभांडी  करणारी बायको. मुंबईच्या रस्त्यावर कचरा काढायचं काम करणारा तो कर्मचारी. वस्तीत पोरांना जमवून खेळणारी मुलं. हातातोंडाची जेमतेम होणारी मिळवण. अशातच एका अत्यंत घाणेरड्या गल्लीत कचरा काढताना त्या कर्मचार्‍याच्या झाडूचा दांडा एका भिंतीला लागतो आणि त्या भिंतीच्या आत दडलेला प्रचंड पैसा, प्रति अलिबाबाची गुहा त्याच्या नजरेस पडते. अचानक सापडलेलं हे घबाड पाहून तो काय करतो, नशिबाने पलटवलेली आयुष्याची बाजी तो कशी स्वीकारतो, तो पैसा असतो कोणाचा आणि त्याचं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहिला पाहिजे.

‘नशीबवान’ची गोष्ट चांगली आहे.  अचानक आयुष्यात अशक्य असं घबाड मिळाल्यावर काही क्षणांत बदलणारं आयुष्य कसं असू शकतं? साधारण प्रत्येक माणसाचं स्वप्न असावं असा हा विषय शिताफीने मांडलाय. त्याला चांगल्या पटकथेची आणि चपखल संवादांचीही साथ लाभलीय आणि बघणार्‍या प्रेक्षकाचेही डोळे दिपवणारा, काही क्षण असं आपल्यासोबत झालं तर आपण काय करू असा विचार करायचा मोह पाडणारा हा सिनेमा नक्कीच रोचक सुरुवात करतो. दिग्दर्शकाने या सिनेमाचा तोल सांभाळलायदेखील बर्‍यापैकी. वास्तवातल्या घटनांची जोड देत या सिनेमाला वळणही चांगलं दिलंय.

भाऊ कदमने सफाई कामगाराची भूमिका छान साकारली आहे. त्याला मिळालेली मिताली जगताप या अभिनेत्रीची साथदेखील अगदी सहज आहे, तर नेहा जोशीने सफाई कामगार महिलेचा बाज अगदी उत्तम सांभाळलाय. तिच्या डोळ्यांतली हतबलता, पैसे मिळताच येणारी चमक, तिचं ते दिसणं, वागणं सगळं उत्तम. सगळ्याच कलाकारांच्या व्यक्तिरेखा उत्तम उभ्या राहिल्या आहेत, पण अचानक पैसा आल्यावर जे हबकणं असतं ते मात्र थोडं वरवरचं वाटतं. म्हणजे उंची हॉटेलात गेल्यावर भाऊ कदम ज्या सहजतेने टीप देतो किंवा थिएटर मॉलमध्ये सहजतेने वावरतो ते पाहताना तो पहिल्यांदाच या गोष्टी अनुभवतोय हे जाणवत नाही. तसंच डान्स बार किंवा इतर कुठेही पहिल्यांदाच जात असतो, पण ते सगळं एखाद्या सराईतासारखं भासतं. इथे दिग्दर्शकाने जरा अधिक काम करायला हवं होतं. मध्यांतराच्या आधी सिनेमात स्वप्न उभं राहिल्यावर फार काही घडत नाही आणि मध्यांतरानंतर काही ठिकाणी तोचतोचपणा जाणवतो. त्यात चटपटीतपणा आणता आला असता तर सिनेमा अधिक खुलला असता.

सिनेमाची गाणी बरी आहेत. एकूणच सिनेमाचा विषय वेगळा आहे. सुख मिळवायच्या स्वप्नांच्या पलीकडे जाऊन जर सुखाच्या गडगंज राशी वाट्याला आल्या तर एखाद्याचं काय होऊ शकेल? मालमत्ता आली की, नीतिमत्ता डळमळीत होते असं म्हणतात. मग या सिनेमात नेमकं काय होतं? वाट्याला सुख आलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीतून हा सिनेमा उलगडतो. दोन घटका करमणुकीसाठी या सिनेमाकडे नक्कीच पर्याय म्हणून पाहायला हरकत नाही.  

दर्जा            : **1/2

चित्रपट         : नशीबवान

निर्माता       : अमित पाटील,  विनोद गायकवाड,  महेंद्र पाटील,  विधी कासलीवाल

दिग्दर्शक

पटकथा-संवाद : अमोल वसंत गोळे

कथा            :  उदय प्रकाश

संगीत          :  सोहम पाठक

कलाकार      : भालचंद्र कदम,  मिताली जगताप-वरडकर, नेहा जोशी