वेगळय़ा चवीचं सस्पेन्स कॉकटेल

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

खून आणि त्याभोवतीचं रहस्य, मग ते कसं सोडवलं जातं, गुंता नेमका काय असतो, खुनी कोण असता, खून का केले जातात… अशा गोष्टींचा आस्वाद घेणं एखाद्या नशिल्या पेयासारखं असतं. ती गोष्ट जशी रंगत जाते तशी धुंदी चढत जाते आणि आपण त्या नशेत समरस होऊ लागतो. जर ते पेयं सगळय़ा प्रमाणात उत्तम जमून आलं असेल तर ते संपल्यावर त्या नशेचा खरा आनंद मिळतो. ‘वोडका डायरीज’ हा सिनेमा या पेयासारखाच आहे. ‘वोडका डायरीज’ या नावाचं जे काही कॉकटेल तयार झालंय ते गुंतवून ठेवायला सक्षम असलं तरी त्यातल्या थ्रिलरच्या मात्रा जरा प्रमाणात वापरल्या असत्या तर ते आणखी रंगतदारही बनू शकलं असतं हेही तितकंच खरं.

ही गोष्ट आहे मनालीमधली. मनालीमधल्या ‘वोडका डायरीज’ नावाच्या एका हॉटेलात एका रात्रीत पाच खून होतात आणि या छोटय़ा शहरात या गोष्टीमुळे प्रचंड खळबळ माजते. ही मर्डर मिस्ट्री सोडवायचं काम के. के. मेनन अर्थात एसीपी अश्विन दीक्षितकडे येतं. ही केस सोडवताना तो त्यात गुंतत जातो आणि नेमक्या त्याचवेळी त्याची बायको मंदिरा बेदी गायब होते. या सगळय़ामुळे तो आणखीच अस्वस्थ होतो. दरम्यान, त्याची भेट एका रहस्यमय मुलीशी होते आणि मग सगळीकडनंच गुंता वाढत जातो. समोर असणारी मोठी गुंतागुंतीची केस, त्या केसचा दबाव, पत्नीचं गायब होणं आणि त्याचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व या सगळय़ा भुलभुलैयातनं सिनेमा एक वेगळाच आकार घेतो. हा आकार काय आहे, सिनेमात नेमकं काय घडतं, या घटनाक्रमांचा त्या एसीपीच्या व्यक्तिगत आयुष्याशी काय संबंध असतो वगैरे गोष्टी हा सिनेमा पाहताना आपल्याला गुंतवत जातात.

मर्डर मिस्ट्री यशस्वीरीत्या पडद्यावर साकारणं तसं कठीण असतं. त्यातले संशयित आधीच कळायला लागतात. मग ती कथा पाहून आपलं मन आधीच अंदाज बांधायला पुढे धावतं किंवा अति गुंतागुंतीमुळे त्यातली मजा निघून जाते. पण ‘वोडका डायरीज’ मात्र बऱ्यापैकी जमून आलाय. लेखन पातळीवर या सिनेमाने चांगली पकड राखली आहे. त्याला मिळालेली चटपटीत दिग्दर्शनाची, मुख्य कलाकाराच्या चोख अभिनयाची आणि अप्रतिम छायांकनाची साथ यामुळे हा सिनेमा बऱ्यापैकी धरून ठेवतो. अर्थात सिनेमा ज्या खुनांच्या केसमधनं उघडतो त्यांचं काय होतं याबाबत प्रेक्षक विचार करत असताना एका ठिकाणी ती फक्त के. के. मेननच्या आयुष्याची गोष्ट व्हायला लागते. त्यात रंगत जरी असली तरी कथेतल्या कथेमुळे प्रेक्षकाला थोडं विस्कळीत वाटू शकतं.

या सिनेमाची सुरुवात मात्र खणखणीत झालीय. टॉप अँगलने घेतलेल्या शॉटमध्ये के. के. मेनन धावताना दिसतो आणि त्यातनंच दृष्यं उघडतं. या दृष्याचा वेग, त्यात टिपलेले बारकावे यामुळे पहिल्याच दृष्यात आपण श्वास रोखून धरतो आणि तिथेच सिनेमाची पहिली किक बसते. दिग्दर्शन आणि छायांकन यांचा उत्तम मेळ कसा असावा हे या पहिल्या दृष्यातनं जाणवून जातं. या सिनेमात अशी अनेक दृष्यं आहेत. जी देखणी आहेत, खिळवून ठेवतात आणि श्वासदेखील रोखायला लावतात. सस्पेन्सभोवती फिरत असताना हा सिनेमा मनालीच्या देखणेपणाचं ही विहंगम चित्रण करतो. मनालीचं सौंदर्य हे या सिनेमाच्या नशेसोबत दिलेल्या चकण्यासारखं चटकदार झालंय. अभिनय ही या सिनेमाची आणखी एक पक्की बाजू. के. के. मेनन या कलाकाराच्या गुणवत्तेविषयी ठाऊक आहेच, पण इतर कलाकारांनीही चांगली कामं केली आहेत. शरीब हश्मी हा त्याचा सहकारी. त्याच्या कामाचा विशेष उल्लेख करायलाच हवा. त्याशिवाय रायमा सेन जितकी सुंदर दिसते तितकीच सहजसुंदर वावरते. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक गूढता आहे आणि त्या गूढतेचा योग्य वापर दिग्दर्शकाने तिची व्यक्तिरेखा साकारण्यात केला आहे. मंदिरा बेदीला तितकासा वाव मिळाला नाही आणि काही ठिकाणी तिचा वावर थोडा अतिशयोक्तीकडे झुकतो, पण या सगळय़ा पटावर तो चालून जातो. अर्थात सिनेमा सुरू झाल्यापासनं ते संपेपर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये के. के. मेनन असल्याने निर्विवाद दिग्दर्शकाला फक्त त्याच्या आणि त्याच्याभोवतीच सिनेमा फिरवायचाय आणि बाकी सगळं तोंडलावणीचं आहे हे न सांगताच कळून जातं. कदाचित इतरांच्या भूमिकांना थोडा वाव मिळाला असता तर सिनेमाला कदाचित आणखी वेगळा रंग चढू शकला असता.

दिग्दर्शक नवोदित आहे. त्याने याआधी जाहिरातींचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळेच असेल कदाचित, दृष्यांमधला चुरचुरीतपणा कसा पकडावा हे त्याला नेमकं समजलंय आणि त्यामुळे या सिनेमात कुठेही कंटाळा येत नाही. एकूणच ‘वोडका डायरीज’ हा उत्तम आणि मैलाचा दगड ठरावा इतक्या दर्जाचा थ्रिलर सिनेमा नसला तरी त्याच्यात वेगळेपणा नक्की आहे. या वाटेला गेलेल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवून नशेची चुणूक नक्की अनुभवता येऊ शकेल. शीर्षकापासून ते विषयापर्यंत आणि मांडणीपासून ते कलाकारांपर्यंत एक वेगळा सिनेमा म्हणून ‘वोडका डायरीज’ची चव चाखायला काहीच हरकत नाही.

दर्जा : ३ स्टार
चित्रपट : वोडका डायरीज
निर्माता : विशाल करकेरा, विशाल राज, कुशल श्रीवास्तव, अतुल पुपनेजा, विवेक सुधींद्र कुलश्रेष्ठ
दिग्दर्शक : कुशल श्रीवास्तव
लेखक : वैभव बाजपेयी
छायांकन : मनीषचंद्र भट्ट
संगीत : संदेश शांडिल्य, हॅरी आनंद, परवेझ
कलाकार : के. के. मेनन, रायमा सेन, मंदिरा बेदी, शरीब हश्मी