सुख म्हणजे नक्की काय असतं…?

>> क्षितिज झारापकर

ढाई अक्षर प्रेम के… रंगभूमीवरील नवे कोरे… प्रसन्न नाटक… व.पु. काळेंनी सांगितलेली सुखाची संकल्पना आपल्यापर्यंत सहज पोहोचविते.

एक टोलेजंग नाटक जोरात सुरू असतं. प्रेक्षकांचा नाटकाला भरभक्कम पाठिंबा असतो. प्रयोग जोमाने सुरू असतात. प्रयोगाचा व्याप खूप मोठा असतो. त्यातच काही कारणास्तव अचानक ते नाटक बंद होतं. कलाकारांना हा खूप मोठा धक्का असतो. कारण अनेक महिन्यांची मेहनत आणि परिश्रम त्या नाटकात त्यांनी ओतलेले असतात. निर्मात्यांची एक वेगळीच कोंडी होते. त्यांचे सगळे आर्थिक आडाखे चुकलेले असतात. नाटक हे एक टीमवर्क असतं म्हणतात. मग अशावेळी अख्खी टीमच खचून जाऊ शकते. अशी उदाहरणं मराठी रंगभूमीच्या इतिहासात मुबलक प्रमाणात सापडतील. पण आज इथे एका अशा टीमबाबत बोलायचंय जी या घटनेने अजिबात खचून जात नाही. उलट निर्माते त्याच टीमला घेऊन एक नवीन नाटक उभं करू पाहतात. कलाकारही त्यांना साथ देतात आणि मग तयार होतं ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे एक खूपच मनस्वी धाटणीचं छान नाटक.

‘ढाई अक्षर प्रेम के’ हे वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या ‘तू भ्रमत आहेसी वाया’ या कादंबरीचं लेखक दिग्पाल लांजेकरांनी केलेलं नाटय़रूपांतर. मराठी रसिक आणि त्यातही मध्यमवर्गीय मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जे मोजके साहित्यिक आहेत त्यात व. पु. काळे हे एक अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या कथा अत्यंत मनोरंजक आहेत. व.पुं.च्या कादंबऱया जगण्याचा मंत्र सांगणाऱ्या अत्यंत फिलॉसॉफिकल धाटणीच्या आहेत. दिग्पाल लांजेकरांनी ‘तू भ्रमत आहेसी वाया’ ही कादंबरी निवडून मास्टरस्ट्रोक मारला आहे. व.पुं.ची ही कादंबरी इतक्या वर्षांनंतरही आजच्या समाजजीवनासाठी तितकीच रिलेव्हंट आहे. आयुष्याच्या रामरगाड्यात अडकलेल्या आणि जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला गुरफटून घेणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. स्वतःच्या इगोमधून त्याने सुख आणि समृध्दीच्या व्याख्या आखल्या आहेत. नाटकात घडणारे प्रसंग त्याच्या या व्याख्या किती फोल आणि चुकीच्या आहेत हे त्याला दाखवून देतात आणि वैश्विक सुख काय असतं याची प्रचीती त्याला देतात, असा साधरण ‘ढाई अक्षर प्रेम के’चा प्रवास आहे.

लांजेकरांनी नाटय़रूपांतर करताना व्यक्तिरेखा जपल्या आहेत. कादंबरीच्या माध्यमात कथेची फिलॉसॉफी केंद्रस्थानी असते आणि पात्र त्या फिलॉसॉफीप्रमाणे वागतात. नाटक या माध्यमात मात्र पात्रे केंद्रस्थानी असतात आणि त्यांच्या वागण्यातून फिलॉसॉफी मांडायची असते. हा दोन माध्यमांचा फरक दिग्पाल लांजेकरांनी ओळखून ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नेमकेपणाने बेतलंय. यातल्या पात्रांशी एक तर तुमचं पटतं किंवा अजिबातच पटत नाही. पण दोन्ही शक्यतांमध्ये आपण पात्रे जे सांगताहेत त्यात गुंतत जातो. दिग्पाल लांजेकर लेखक म्हणून इथे जिंकले आहेत. दिग्दर्शक म्हणून लांजेकरांनी नाटक खूप लयबध्द बसवलेलं आहे. ‘ढाई अक्षर प्रेम के’ला एक सुखावणारी फ्लुईडिटी आहे. नाटकासाठी बेतलेल्या नेपथ्यात खूप उघडपणा आहे. सर्वसाधारण ऑफिस दाखवताना कुठेही कोणतीही जागा बंदिस्त किंवा एक्सक्लुझिव होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. एकंदरीत ‘ढाई अक्षर प्रेम के’बाबत लेखक-दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांनी उत्तम कामगिरी बजावलेली आहे.

‘ढाई अक्षर प्रेम के’ या नाटकाच्या नेपथ्याचा विशेष उल्लेख करायला हवा. संदेश बेंद्रे हे नेपथ्यकार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सामोरे येताहेत. या नाटकात त्यांनी वेगवेगळी स्थळं कल्पकतेने उभी केलेली आहेत. ऑफिस तर आहेच, पण मंडलिकांचं घर, चौपाटी, ओंकारनाथांचं बदललेलं घर हे सगळं खूप स्वाभाविक वाटतं. यात त्यांच्या चांगल्या नेपथ्याची ओळख पटते. त्यांच्याबरोबरच प्रकाशयोजनाकार राहुल जोगळेकर यांचंही कौतुक करायला हवं. उत्तम नेपथ्य आणि दिग्दर्शनाला तितक्याच उत्तम प्रकाशयोजनेची गरज असते. ‘ढाई अक्षर प्रेम के’मध्ये हे काम जोगळेकरांनी छान केलेलं आहे. पूर्णिमा ओक या मराठी कलाजगतात भानू अथय्याइतक्या प्रवीण वेशभूषाकार होत आहेत. ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकातल्या प्रत्येक पात्राची वेशभूषा ही नुसतीच नयनमनोहर नाही, तर ती नाटकासाठी अत्यंत पूरक आणि पोषक अशीच आहे.

एक आघडीची रंगकर्मी निमार्ती असण्याचे काही आंतरीक फायदे असतात. मुक्ता बर्वे ही ‘ढाई अक्षर प्रेम के’ची एक निर्माती आहे. स्वतः नाटय़क्षेत्राशी जवळून निगडित असल्याने तिने नाटकाच्या निर्मितीमूल्यांमध्ये अजिबात हात राखून काम केलेलं नाही. ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे तिच्या या आधीच्या सगळ्या नाटकांप्रमाणेच मोठं नाटक आहे. सुजाता मराठे या ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या दुसऱया निर्मात्या आहेत. दोघींचंही ‘ढाई अक्षर प्रेम के’ या एका उत्तम नाटकाच्या निर्मितीसाठी अभिनंदन करायला हवं.

शेवटी नाटक हे कलाकारांवर अवलंबून असतं. ‘ढाई अक्षर प्रेम के’मधले सगळे कलाकार हे गुणी रंगकर्मी आहेत. ओंकारनाथ झालेला अजय पूरकर हा एक उत्तम नट आहे हे त्याने या आधीच सिद्ध केलेलं आहे. इथेही अजय सुरुवातीपासूनच नाटकाची सूत्रं ताब्यात घेतो. ओंकारनाथची संपूर्णपणे अरसिक मानसिकता अजय ठाशीवपणे आपल्या पुढय़ात मांडतो. नंतर येणारी ओंकारनाथाची उत्कटता आणि दुविधाही अजयने मस्त दशर्वली आहे. सचिन देशपांडेने वाकनीस अत्यंत बॅलेन्स्ड केलेला आहे. अतुल महाजन यांचा मंडलिक पोक्त आणि साजेसा व्यापक झालाय. अश्विनी कुलकर्णी हिने विनिताचा हिशोबीपणा सुंदर समोर आणलाय. तेजस कुलकर्णी, नितीश घारे आणि सुगम माजवकर या सर्वांनी आपापली पात्रे छान केली आहेत. ‘ढाई अक्षर प्रेम के’चा अँकर पॉइंट म्हणतात ते पात्र सायरा. किरण खोजे हिने सायरा मूर्तिमंत साकारली आहे. नाटकाचा विचार, कथेची फिलॉसॉफी आणि नाटकातलं नाटय़ हे सगळं किरण खोजे सायराच्या भूमिकेतून समर्थपणे सादर करते.

‘ढाई अक्षर प्रेम के’ ही एकंदरीत एक मस्त जमलेली भट्टी आहे.

दर्जा             :   तीन स्टार
नाटक           :   ढाई अक्षर प्रेम के
निर्मिती          :   अंबिका + रसिका निर्मित साई साक्षी प्रकाशित
निर्माती          :   मुक्ता बर्वे
लेखक           :   व. पु. काळेंच्या कादंबरीवर आधारित
वेशभूषाकार     :   पूर्णिमा ओक
नाट्यरूपांतर    :   दिग्पाल लांजेकर
दिग्दर्शक        :   दिग्पाल लांजेकर
कलाकार        :   किरण खोजे, अश्विनी कुलकर्णी, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, सचिन देशपांडे, अजय पुरकर