सामाजिक समस्येवरील लघुकथा

>> वैष्णवी कानविंदे

आपल्या देशात अनेक ठिकाणी शौचालयं नसल्याने माणसांना उघडय़ावर शौचास बसावं लागतं. ही समस्या इतकी मोठी आणि गंभीर आहे, पण आपल्यासारख्या अनेक सुखवस्तू लोकांना मात्र अशा कुठेही शौचास बसलेल्यांकडे बघून नाक मुरडण्याव्यतिरिक्ति त्या समस्येची खोली समजत नाही. पण यामागे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, सामाजिक आरोग्य आणि सार्वजनिक दर्जा असे अनेक मोठे प्रश्न आ वासून उभे राहिलेले असतात. गावाकुसाकडे तर ही समस्या आहेच. मध्यंतरी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ मधून हा प्रश्न समोर आला होता आणि आता तोच प्रश्न पुन्हा एकदा आणि मुंबईसारख्या शहरातली समस्या घेऊन राकेश ओमप्रकाश मेहरा समोर आले आहेत. ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ या सिनेमातून त्यांनी अत्यंत रंजकपणे ही समस्या मांडायचा प्रयत्न केला आहे.

मुंबई घाटकोपर येथील झोपडपट्टीत राहणाऱया एका आई लेकाची गोष्ट. आई दिवसभर काम करून पैसे कमवते आणि तिला मस्तीखोर मुलगा वस्तीत आहे त्यात मस्त जगत असतो. या वस्तीची एक सगळय़ात मोठी समस्या असते. ती म्हणजे या वस्तीत शौचालय नसतं. त्यामुळे इथल्या सगळय़ांना रेल्वेच्या रुळांवर शौचास जावं लागतं. बायकांसाठी तर ही समस्या अधिकच मोठी कारण सूर्य उगवायच्या आत त्यांना शौचकार्य उरकून घ्यावं लागतं. दररोज कोणी बघत नाहीय या धास्तीत राहावं लागतं. आणि अशातच या आईसोबत एक घटना घडते आणि मग तिचा लहानगा मुलगा ठरवतो की आपल्या आईसाठी शौचालय बनवायचं. मग सुरू होतो शौचालय बनवायचा प्रवास.

या सिनेमाच्या शीर्षकात जरी प्राईम मिनिस्टिर असलं तरीही या सिनेमाचा राजकीय संबंध फारसा नाही. किंबहुना या सिनेमातनं समाजातल्या एका मोठय़ा विषमतेचा, मोठय़ा वर्गाचा आरसा दाखवायचा प्रयत्न केला गेला आहे. वस्तीतलं जिणं, तिथे तावून सुलाखून लवकर समज येणं या सगळय़ा गोष्टी दिग्दर्शकाने अतिशय चांगल्या चित्रित केल्या आहेत. आई आणि मुलाचं परस्परांवरचं प्रेम आणि त्यातनं गुंफलेला सामाजिक जाणिवेचा धागा देखील छान जुळून आलाय. हा सिनेमा आकाराने तसा लहान आहे ही चांगली गोष्ट. पण मुळात तो लहान असला तरीही त्याचा जीव देखील अगदीच सुक्ष्म आहे आणि लिखाणातून तो हवा तसा उमटला नाहीय. म्हणजे याच्या कथेमागे एक चांगला उद्देsssssssश जरूर आहे. पण पूर्ण वेळ सिनेमा घडवताना त्याला मर्यादा पडल्या आहेत. मग तो सिनेमा करायचा म्हणून त्यात रंजक दृश्य हवीत आणि ती घडवण्यासाठी हा सिनेमा उगाचच पसरत जातो.

अभिनयाच्या पातळीवर मात्र या सिनेमाला सगळय़ात जास्त गुण मिळतात. अंजली पाटील या अभिनेत्रीचं सहज काम आणि तिच्या मुलाचं काम करणारा ओम कनोजिया हा अभिनेता तर कमाल आहे. त्याने ज्या सहजतेने ही भूमिका पेलली आहे त्याची दाद द्यावी तितकी कमीच. रसिका आगाशे या अभिनेत्रीनेही छान काम केलंय. एकूणच सर्व कलाकारांनी आपली कामं चोख केली आहेत.

दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी सामाजिक विषयाला करमणुकीच्या माध्यमातून गांभिर्याचं टोक द्यायचा प्रयत्न केलाय खरा. हा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. पण कथेचा जीव हा सिनेमा इतका मोठा नसल्याने आणि लिखाण तितकं दमदार न झाल्याने तो थोडा भरकटला गेलाय. संगीतही म्हणावं तितकं सिनेमाला उठाव देत नाही. ते केवळ जागा भरण्याचंच काम करतंय की काय असं वाटत रहातं आणि कंटाळा येतो.

एकूणच मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर दमदार अभिनयासाठी जरुर बघावा. यात निरागसता आणि सामाजिक जाणीव याचा मिलाफ सुखावू शकेल. पण अख्खा सिनेमा मात्र खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला नाही असंच म्हणावं लागेल.

दर्जा – अडीच स्टार
सिनेमा – मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर
निर्माता – राकेश ओमप्रकाश मेहरा, पी. एस. भारती, नवमीत सिंग, राजीव टंडन, अरपीत व्यास
दिग्दर्शक – राकेश ओमप्रकाश मेहरा
लेखक – मनोज मैत्रा, राकेश ओमप्रकाश मेहरा, हुसेन दलाल
छायांकन – पावेल डायलस
संगीत – शंकर एहसान लॉय
कलाकार – अंजली पाटील, ओम कनोजिया, अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, रसिका आगाशे.