नीती अनीतीमधल्या दोरीवरचा थरार

>> वैष्णवी कानविंदे

आपल्यामध्ये नीतिमत्ता नावाचा एक गुण दडलेला असतो. अर्थात, आपण त्याविषयी गप्पा मारणं वेगळं आणि प्रत्यक्ष वेळ आल्यावर तसं वागणं वेगळं. जेव्हा गळ सुप्त स्वप्नांच्या आमिषाचा मासा लावून समोर येतो तेव्हा कितीही नाही म्हटलं तरी आपण त्याकडे खेचले जातोच, पण मग आपण ज्याबद्दल इतकी वर्षे गप्पा मारतो ती नीतिमत्ता खरंच इतकी स्वस्त असते का? आमिषाचा मासा आपल्याला जवळ खेचतो खरा, पण आपल्यातला प्रत्येक जण त्या गळाला अडकतोच का? एकूणच समाजात वावरताना आपल्या प्रत्येकाच्या समोर कधी ना कधी अशा संधी येतातच की, तेव्हा आपण या बाजूला जावं की त्या बाजूला जावं या दोलायमान अवस्थेत अडकतो. एका ठिकाणी रस्ता अंधारातला असला तरीही सहजसोपा वाटत असतो. त्या रस्त्यावर हरवायची शक्यता जास्त असते, तर दुसरीकडे तो रस्ता कठीण, मेहनतीचा असतो, पण निश्चित मार्गावर नेणारा असतो. आता आपण कोणता रस्ता निवडायचा? अंधारात चाचपडायचं की मेहनत करून ठाम मार्ग दाखवणारा रस्ता अवलंबायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘डोंबिवली रिटर्न’ हा सिनेमादेखील याच संकल्पनेवर उभा राहिलाय. या सिनेमाच्या मागे एक ठाम कथानक नक्कीच आहे. डोंबिवली येथे राहणाऱया कुटुंबातला एक मध्यमवर्गीय कर्ता माणूस दररोज डोंबिवली ते सीएसटी असा प्रवास करून आपलं घर, संसार चालवत असतो. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात. छोटं, थोडक्यात सुख मानणारं कुटुंब आणि मर्यादित स्वप्न यामुळे आयुष्य तसं नियमित सुरू असतं. अशातच एक दिवस या व्यक्तीच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते. त्याला असं काहीतरी गवसतं की, त्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकणार असतं. किंबहुना, या घटनेमुळे त्याच्या मनात कधीच नसलेली स्वप्नं वर येऊ शकत असतात. मग अशा वेळी काय होतं? तो काय निर्णय घेतो? एखाद्या घटनेमुळे आयुष्य बदलतं म्हणजे नेमकं काय होतं? आणि त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात उलथापालथ करणारी ती घटना नेमकी काय असते? अशा प्रश्नांचा मागोवा घेत हा सिनेमा घडत जातो. आधी म्हटल्याप्रमाणे यात एक ठाम कथानक नक्कीच आहे. कदाचित अनेक माणसांच्या आयुष्याला जोडू शकेल असं हे वास्तववादी कथानक नक्कीच वाखाणायला हवं, पण दुर्दैवाने या कथेवर चढलेला पटकथेचा साज मात्र डळमळीत असल्यामुळे सिनेमा भिडत नाही.

अनेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमाचा प्रभाव आजही प्रेक्षकांच्या मनावर ताजा आहे. या सिनेमाने प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आतल्या आवाजाला व्यक्त केलं होतं. हा सिनेमा ज्या पद्धतीने मांडला होता, त्यामुळे थिएटरबाहेर पडताना प्रेक्षक भारावल्या अवस्थेतच बाहेर पडत होता. अर्थात, हा सिनेमा आणि तो सिनेमा यात संदीप कुलकर्णी आणि शीर्षकातलं ‘डोंबिवली’ हे नाव वगळता काहीही साधर्म्य नाही. दोघांचेही विषय, मांडणी आणि सगळय़ाच गोष्टी भिन्न आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाहायचा असेल तर मनात कुठेही त्या सिनेमाचा विचार आणू नये हे सगळय़ात महत्त्वाचं, पण असं जरी असलं तरी सामाजिक विषय मांडताना त्याला एक भक्कम बैठक आवश्यक असते आणि दुर्दैवाने ती या सिनेमाला नाही. सुरुवातीच्या दृष्यांमध्ये या कुटुंबाचा मध्यमवर्गीय स्वभाव दाखवताना उगाच ओढूनताणून दृष्यं घातली आहेत असं वाटतं. म्हणजे सिनेमाची तिकिटं काढताना पुढची ओळच काढायचं कारण स्वस्त आहे, पॉपकॉर्नचा कॉम्बो नको अशा गोष्टी घडतात, पण मध्यमवर्गीय माणसाचं वागणं जर असं नाटय़मय दाखवण्यापेक्षा ते साध्या दैनंदिनीतून दाखवलं असतं तर ते अधिक समर्पक झालं असतं. अशा दृष्यांमुळे सिनेमा उगाच खूप खेचला गेल्यासारखा वाटतो. संवाद तसे बरे आहेत, पण आणखी प्रभावी होऊ शकले असते.

अभिनय मात्र खूप छान झालाय. विशेषकरून संदीप कुलकर्णीने साकारलेली व्यक्तिरेखा अखंड सिनेमावर राज्य करते. त्याच्या वागणुकीतली सहजता, मध्यमवर्गीय आयुष्य जगतानाची मानसिकता आणि अचानक स्वप्नं मोठी झाल्यावरचं बिथरणं, त्यातच कधीतरी डोकावणारा नीतिमत्ता जपणारा जुना माणूस अशा सगळय़ा छटा त्याने मस्तच उभ्या केल्या आहेत. अभिनेत्री राजेश्वरी सचदेवचीदेखील चांगली साथ मिळाली आहे. ऋषीकेश जोशी, अमोल पराशर या अभिनेत्यांचीही चांगली साथ लाभली आहे, पण सिनेमात अचानक वेगवेगळी माणसं येतात आणि सिनेमा संदर्भ सोडून थोडा भरकटतोय की काय असं वाटायला लागतं. तरीही पहिल्या अर्ध्या भागात सिनेमा प्रेक्षकांवर पकड घ्यायला यशस्वी झालाय, पण मध्यांतरानंतर ही पकड निसरडी होते. मध्येच येणारा विचित्र हसणारा माणूस किंवा जेव्हा त्याच्या आयुष्यात वादळ येतं ती घटनाही खूप अवास्तववादी वाटते. फोटोग्राफर सोबत प्लॅनिंग करणं किंवा मिसेस दीक्षित अचानक समोर येणं हे सगळं सिनेमाच्या ओघात सहज येत नाही, तर इथे या गोष्टी घालायच्या असं म्हणत ओढूनताणून झालेला प्रवासच वाटतो. अशा सगळय़ा गोष्टींमुळे चांगल्या कथेला ठिगळ लावल्याचा आभास होतो. प्रत्येक गोष्ट खमंगरीत्या साकारायच्या मोहात कदाचित हा भरणा झाला असेल असं वाटतं. संगीत चांगलं आहे. या सिनेमात धक्कातंत्राचा वापरही चांगला केलाय. हा सिनेमा अधिक चांगला नक्कीच होऊ शकला असता. अर्थात, संदीप कुलकर्णीचे फॅन असाल तर त्याच्यासाठी डोंबिवलीची वारी परत एकदा करायला हरकत नाही.

दर्जा – अडीच स्टार
सिनेमा – डोंबिवली रिटर्न
निर्माता – संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी
दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद – महेंद्र तेरेदेसाई
संगीत – शैलेंद्र बर्वे
कलाकार – संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, ऋषीकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्रिका शिंदे, सिया पाटील