देखण्या दिखाव्याचं फक्त मृगजळ

4

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

अर्धा चमचा देवदास, एक वाटी हम दिल दे चुके सनम, दोन मूठ सावरिया, थोडा बाजीराव मस्तानी अशा सगळय़ा भरजरी सिनेमांमधलं भरजरीपण वेगळं काढून एकत्र वाटायचं. त्यावर विविध छान छान सुक्यामेव्यासारख्या भरपूर ग्लॅमरस कलाकारांचं मिश्रण घालायचं. त्यावर जमेल तितका चकचकीत वर्ख लावायचा… पण हे सगळं करताना काही पक्की रेसिपी आहे का किंवा जे काही शिजवतोय ते नीट शिजतंय का हे पाहायचंच नाही आणि मग त्या पदार्थाचं जे काही होईल नेमकं तेच ‘कलंक’ या सिनेमाचं झालंय.

तर असा हा ‘कलंक’ सिनेमा… सांगितल्याप्रमाणे त्यात प्रचंड ग्लॅमर आहे, चकचकी आहे, सौंदर्य आहे, श्रीमंती आहे, स्टारकास्ट आहे… एकूणच सगळंच अतिशय देखणं, नेत्रदीपक आहे. पण नाहीय तो फक्त गाभा. आणि तो नसल्यामुळेच हा अख्खा सिनेमा मचूळ झाला आहे. अगदी पहिल्या पाच मिनिटांतच हा सिनेमा नक्की कसा असेल याचा अंदाज येतो आणि पुढचे पावणे तीन तास आपल्या अंदाजाला तंतोतंत खरं ठरवतं तो प्रेक्षकाची सपेशल निराशाच करतो. या चित्रपटाची कथा फाळणीच्या काळातली आहे. त्या काळात घडलेली आणि काळाच्या पडद्याआड गेलेली एक प्रेमकथा या सिनेमाच्या निमित्ताने उलगडते. पण ती घडताना त्यात जी सहजता, सुंदरता अपेक्षित असते ती जराही गवसत नाही. एका धनाडय़ कुटुंबात रहात असलेले एक जमीनदार, त्यांचा वर्तमानपत्र चालवणारा मुलगा आणि सून. एक दिवस या सुनेला आपण असाध्य रोगाने मरणार असल्याचं कळतं आणि मग ती त्याचं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवते. ते दुसरं लग्न होतं. पण दुसरी बायको बंडखोर असते. ती नेमकं कसलं बंड करते, ते बंड करताना परिस्थितीत काय बदल होतो, नाती कशी आणि का बदलतात आणि नात्यांच्या मितीपलीकडे जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा कलंक कसा लागते वगैरे वगैरे सांगणारा (कदाचित सिनेमाकर्त्यांना वाटत असावं की प्रेक्षक अंतर्मुख होईल, पण प्रेक्षकाच्या मुखातून फक्त जांभया येतात…)

या सिनेमाची कथा एकसंघ नाही. म्हणजे फाळणीच्या आधी ज्या काही असंख्य गोष्टी घडल्या असतील त्यातली इतिहासात लोप पावलेली एक कथा दाखवायचा लेखक दिग्दर्शकाचा मनसुबा होता. (लगानची कथा कशी होती तसं काहीसं) पण दुर्दैवाने असं काही होत नाही. याचं कारण म्हणजे कथेवरची अत्यंत ढिली पकड. त्यावर बांधलेली विस्कळीत पटकथा. बोजड आणि सिनेमातल्या पेहरावाइतकेच अवजड संवाद आणि फसलेलं संकलन. या सिनेमात फ्लॅशबॅक आहे असं दिसतं. पण ते अचानक सुरू होतं ते इतकं गोंधळाचं आहे की सुरुवातीला ते काही कळतच नाही. बरं सोनाक्षी सिन्हा इतकी गंभीर आजारी असते, पण तिचं आजारपणही डिझायनरच वाटतं. त्यामुळे ती जाते तेव्हाही काही वाटतच नाही. एवढा मोठा राजवाडा, त्यात एवढय़ा धनाडय़, लोकप्रिय व्यक्ती रहातात, पण ती जेव्हा जाते तेव्हा अंतक्रियेला फक्त दोघेच. आलिया भटच्या कानावर गाणं पडणं, मग तिने त्या कोठीमध्ये जाणं, तिला अगदी सहज परवानगी मिळणं, तितकंच सहज प्रेमात पडणं, त्या वळू सोबतची वरुण धवनची फायटिंग, या सगळय़ा गोष्टी किती सहज होतात की त्यात काय होईल नेमकं ही उत्सुकता उरतच नाही. वळूसोबतची फायटिंग तर विनोदी आहे. एखादी फिक्स मॅच असावी तशी. तो वळू फायटिंग झाल्यावर शहाण्यासारखा परत आत जातो. कुरघोडी करणारा खाली पडला असता त्याच्यावर शिंग उगारत नाही. (तो पण दिग्दर्शकाचं निमूटपणे ऐकतो बहुदा.)

माधुरी दीक्षित देवदासमध्ये प्रचंड मोठा घागरा घालून गिरक्या घेताना जितकी आकर्षक दिसली होती त्याच्या तुलनेत या सिनेमात अगदीच फिकी वाटते. तिच्या वाटय़ाला अगदीच क्षुल्लक काम आलंय. तिच्या पुढे संजय दत्त तर नगण्यच. फक्त खांद्यावरची शाल ठीक करत वावरण्यापुरताच तो सिनेमात दिसतो. सोनाक्षी सिन्हा ही अशीच पानातल्या कोशिंबिरीसारखी. वरुण धवन हीरो आहे. त्याला मोठं काम आहे, पण त्याचा प्रभाव नेहमीसारखा पडत नाही. त्याच्या व्यक्तेरेखेतून शाहरुख खान डोकावत राहतो. नाही म्हणायला आदित्य रॉय कपूर छोटय़ा भूमिकेत असला तरीही आवडून जातो आणि आलिया भट तिच्या दिसण्यापासनं, कपडय़ांपर्यंत आणि अभिनयापासनं ते अदाकारीपर्यंत सगळीकडे खुलून दिसते. किंबहुना या सिनेमात खरोखरच पाहण्यासारखं काही असेल तर ती आलिया भट आहे.

बाकी सिनेमाला अर्थच नाही. अचानक घाटावर वरुण धवन आणि आदित्य कपूर भेटतात काय. नाचतात काय. दंगल चालू असताना बग्गी घेऊन मध्येच काय येतात. ट्रेन सुटताना संपूर्ण सीनच्या वेगाने ट्रेनचा वेग कसा मंदावतो. वळूची मारामारी… आलिया नेमकी पेमात कशी पडते, तिचंच लग्न का लावलं जातं, कोठीवर जाताना बोटीतून का जावं लागतं, मग हवं तेव्हा समोर रस्ता कसा उगवतो…. अशा अनेक सीन्सची या सिनेमात जंत्री आहे आणि ती आकलनापलीकडे आहे. आलिया पहिल्यांदा पेसमध्ये जाते तो एक प्रसंग नर्म विनोदी छान झालाय. पण केवळ तो एकच प्रसंग बाकी सिनेमा असंबंधच आहे. अशा गोष्टींचा फार विचार केला तर आपल्या तिकिटाचे पैसे फुकट गेल्याची खंत उगाच मनाला लागत राहते. म्हणून या बाबी दृष्टीआड करणंच भलाईचं.

गाणी आणि नृत्य… खूप ठिकाणी अनावश्यक आहेत. ती इतक्या प्रमाणात नसती तरीही काही बिघडलं नसतं. पण असल्याने ती सहन करावी लागतात. संवादांमध्ये एकमेकांना सतत उपदेश तेही प्रचंड आलंकारिक भाषेत असल्याने तेदेखील असह्य व्हायला लागतं. बरं हा सिनेमा सुरस चमत्कारिक कथा आहे असं सांगितलं असतं तर किमान तो त्या दृष्टीने पाहता आला असता. पण या सिनेमाला इतिहासाचा संबंध असल्याने तीदेखील शक्यता नाहीशी होते.

या सिनेमात एक संवाद आहे. तुम्हारे गाने मिठास है लेकीन नमक कम है. या सिनेमाच्या बाबतीत काहीसं असंच म्हणावंसं वाटतं. इस सिनेमा मे शायनिंग बहोत है, लेकिन नमक है ही नही…

 दर्जा – दीड स्टार
 सिनेमा – कलंक
 निर्माता- करण जोहर, साजिद नादियाडवाला, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता
 दिग्दर्शक/ पटकथा- अभिषेक वर्मन
 संवाद – हुसैन दलाल
 संगीत – प्रीतम
 छायांकन – बिनोद प्रधान
 कलाकार – वरुण धवन, आलिया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, हितेन तेजवानी, अंचित कौर.