हलका फुलका तरीही महत्त्वाचा

सिनेमा’पॅड’

आपल्या समाजात मासिक पाळी हा विषय वर्ज्य, असंस्कृत, जहाल, वाईट… इत्यादी मानला जातो. याबद्दल बोललं तरीही पाप लागू शकतं, पण महिन्याचे पाच दिवस पर्याय नसल्याने त्या स्त्रीने चुपचाप सगळय़ा गोष्टी करायच्या. शहरांमध्ये रहाणाऱयांमध्येही ही गोष्ट पाळली जाते तर खेडेगावातली काय कथा! पाळीतल्या रक्तस्रावासाठी वापरण्यात येणारा घाणेरडा कपडा, लाजेपायी बाळगण्यात येणारी अस्वच्छता या सगळय़ा गोष्टी शास्त्राच्या नावाखाली तशाच जपल्या जातात. प्रत्येक महिन्यात अस्वच्छता आणि त्यामुळे शिवाशिव टाळण्यासाठी स्त्रीला बाहेर बसवलं जातं.

त्यामुळे त्या स्त्रीची पाळी आलीय हे जगाला कळतं आणि दुसऱया बाजूला जिथे स्वच्छता, किंवा रोगराईचा प्रदुर्भाव या गोष्टींबाबत मात्र बोलणंदेखील लाजिरवाणं वाटतं. अतिशय महत्त्वाच्या अशा या शारीरिक बाबीबद्दल अत्यंत विसंगत वागणूक आपल्या देशातल्या बहुतांश भागात राबवली जाते आणि आश्चर्य म्हणजे ती राबवणाऱयाला आणि सहन करणारीलाही त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण याच गोष्टीची जाणीव आपल्याच घरात अरुणाचमल मुरूगंथम या माणसाला झाली. अस्वच्छ कपडय़ामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची आवश्यकता आहे हे त्याला पटलं. पण त्या पॅडच्या अवाजवी किमतीमुळे असंख्य घरांमध्ये दर महिन्याला प्रत्येक स्त्रीच्यामागे एवढे पैसे खर्च करायला कोणीही तयार होणार नाही याचीही जाणीव झाली. मग त्यांनी स्वत:च सॅनिटरी नॅपकीन बनवायचं ठरवलं… आणि या माणसाच्या प्रयत्नांमुळे फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असणारी सॅनिटरी नॅपकीनची स्वच्छता खेडय़ापाडय़ातल्या प्रत्येक स्त्रीला शक्य झाली. केवळ दोन रुपयांमध्ये उत्तम प्रतीचा सॅनिटरी पॅड मिळाल्याने आरोग्याला हातभार लागला. सॅनिटरी पॅड बनवणारा हा माणूस म्हणजेच पॅडमॅन आणि त्याचीच ही गोष्ट. दैनंदिन अत्यावश्यक गोष्टीची कधी कल्पनाही येणार नाही अशा गोष्टीसाठी या माणसाने लढा दिला आणि तो जिंकला. त्यामुळे त्याचं कथानक रसभरीत आहेच पण सिनेमा म्हणून ते ज्या पद्धतीने मांडलंय त्यात ते आणखीनच चुरचुरीत झालंय. या सिनेमातनं एक प्रभावी संदेश तर मिळतोच. पण सिनेमा म्हणून अडीच तासांची करमणूकही पुरेपूर वसूल होते.

अक्षय कुमार हा सध्याचा सगळय़ात लाडका आणि सिनेमांना सगळय़ात जास्त गर्दी खेचणारा कलाकार आहे हे निर्विवाद. सध्याच्या समस्त अभिनेत्यांमध्ये सर्वात जास्त गर्दी खेचणारा अभिनेता म्हणून त्याची वर्णी सर्वप्रथम लागते आणि त्याच्या सिनेमांमुळे पदरी निराशा पडत नाही हेही तितकंच खरं. ‘पॅडमॅन’ या सिनेमातनं त्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय. त्याने स्वत:साठी आखून घेतलेल्या सिनेमा पॅटर्नमधलाच पॅडमॅन हा देखील आणखी एक सिनेमा आहे. त्यात देशासाठी किंवा समाजासाठीचं कर्तव्य, त्याला सत्यकथेची पार्श्वभूमी आणि त्या गोष्टीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे अक्षय कुमार. पण हा पॅटर्न प्रेक्षकांना आवडतोच आणि अक्षय कुमारने त्याच्या सिनेमांसाठी निवडलेल्या कथांमधलं वैविध्यं पहाता करमणूकही पुरेपूर होते. ‘पॅडमॅन’ हा सिनेमा अक्षय कुमारला आणखी एक पाऊल पुढे घेऊन गेलाय असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही.

यात नेहमीचा फॉर्म्युला आणि नावीन्य असणारी खरी गोष्ट तर आहेच. पण त्या यशात अधिक झालाय तो लेखक-दिग्दर्शक आर. बाल्की असल्यामुळे. बाल्कीच्या सिनेमांची हाताळणी, त्यातला अलगदपणा आणि त्याच अलगदपणे भक्कम संदेश या सिनेमातनं पुरेपूर उतरलाय. हा सिनेमा सुरू होतो आणि जास्त वळणं न घेता थेटच प्रश्नाला हात घालतो. सिनेमा सुरू झाल्यावर सुरुवातीलाच वाटतं की झालं प्रश्न सुटला. पण नंतर हळूहळू एकेक अडचण समोर येऊ लागते. मानसिकता बदलण्यापासनं, ते अचूक साधन बनवण्यापर्यंत, आर्थिक स्तरावर काम करण्यापासनं ते त्या साधनाची उपयुक्तता ताडून पहाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अडचणींचा डोंगर उभा असतो. मग हा डोंगर पार कसा होतो हे म्हणजे हा सिनेमा आहे.

या सिनेमाचं यश हे दिग्दर्शकाने टिपलेल्या बारकाव्यांमध्ये, अभिनयामध्ये, त्याच्या पटकथेमध्ये आणि पटकथेवर चढलेल्या संवादी साजामुळे जास्त चमकलंय हे नक्की. समोर गंभीर घटना सुरू असताना त्यावरचा हलका फुलका अंदाज आणि त्याच अंदाजातला सहज संवाद अख्ख्या सिनेमाभर आपल्या चेहऱयावर हास्य राबवतो. अक्षय कुमार हा या सिनेमाचा सुपरहीरो असल्याने त्याने तर खणखणीत व्यक्तिरेखा साकारली आहेच, पण राधिका आपटेंनी साकारलेली गावात रहाणारी अनपढ, साधी प्रेमळ बायको, नवऱयाचं ऐकणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, पण समाजाच्या रुढी आणि परंपरा स्वत:च्या आयुष्यापेक्षा, संसारापेक्षाही जास्त जपणारी. तिच्याकडे संवाद मोजकेच आहेत. पण डोळय़ातनं आणि हावभावातनं सहज सुंदर अभिनय म्हणजे काय हे तिच्याकडे पाहून लगेच पटतं. तिच्या व्यक्तिरेखेत किंचितही बेगडीपणा नाही. पहिल्या भागात पूर्णपणे राधिकाचं अधिराज्य आहे. तर दुसऱया भागात उशिरा सोनम कपूरची एन्ट्री होते आणि नंतरच्या भागात पूर्णपणे तिची छाप पडते. अर्थात अभिनयाच्या पातळीवर राधिका आपटेशी तिची तुलना होऊच शकत नाही. पण तिचा वावर मात्र कमालीचा अल्हाददायक आहे. म्हणजे संपूर्ण रांगडय़ा पटावर तिचा सुसंस्कृत वावर रंगत आणतो. बाकी ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले इत्यादी कलाकार छोटय़ा भूमिकेत असले तरी ठळकपणे लक्षात रहातात ते त्यांच्या सहजतेमुळे. या सिनेमाचं संगीतही छान आहे. या पटाला साजेसं आणि मनात ठसणारं. साधारण पंधरा वर्षांपूर्वीचा काळ तेव्हाचे बारकावे दिग्दर्शकाने नेटकेपणाने उभे केले आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणचं चित्रणही तिथल्या वैशिष्टय़ांनुसार नेमकेपणाने सादर झालंय. आणि हो, बाल्कींच्या समस्त सिनेमांच्या नियमानुसार काही क्षणांसाठी अमिताभ बच्चनच पडद्यावर येणं खूपच सुखावून जातं.

सिनेमा उत्तम चरित्रपट आहेच पण तितकाच रंजकही आहे यात वादच नाही. मध्यांतरानंतर जशी पॅडमॅनची घरातनं सुरू झालेली मिशन भरारी घेते तसा सिनेमाचा कक्षही रुंदावतो. पण चरित्रपट असल्याने त्यातली अटळ भाषणबाजी मात्र या सिनेमाला टाळता आली नाहीय. जरी ती महत्त्वाची असली तरीही कुठेतरी संकलनाची कात्री आवश्यक होती. मुळात न्यूयॉर्कमधलं दृष्य विहंगम असलं तरी शेवटाकडे ते फारच खेचलंय. ते थोडं आटोक्यात आणता आलं असतं. तसंच या कथानकाला खुलवायला प्रेमाचा त्रिकोण दाखवायची अजिबातच गरज नव्हती. त्या त्रिकोणाशिवायच सिनेमामध्ये खूप जास्त काही होतं. दोन हिरॉईन आणि एक हिरो असला की त्रिकोण तयार झालाच पाहिजे या बॉलीवूड दिग्दर्शकांच्या ठाम विश्वासाला निदान बल्कींनी तरी अपवाद ठरायला हवं होतं. असो.

पण अशा काही गोष्टी नजरेआड केल्या तर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. आपल्या देशाच्या आरोग्यासाठी झटणाऱया या सुपरमॅनची खरीखुरी गोष्ट जाणून घेण्यासाठी, अक्षय कुमारचा आणखीन एक सुपरहिट सिनेमा अनुभवण्यासाठी आणि एकूणच करमणुकीसाठी पॅडमॅन पुरेपूर वसूल आहे.

दर्जा : साडे तीन
चित्रपट : पॅडमॅन
निर्माता : ट्विंकल खन्ना, एसपीई फिल्मस् इंडिया, क्रीअर्ज एन्टरटेन्मेन्ट, केप ऑफ गुड फिल्मस, होप प्रॉडक्शन
लेखक, दिग्दर्शक : आर. बल्की
संगीत : अमित त्रिवेदी
संकलन : चंदन अरोरा
छायांकन : पी. सी. श्रीराम
कलाकार :अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर, ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले, सुधीर पांडे.