संजू अगदी हुबेहूब


>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

एखादा उत्तम चरित्रपट बनवणं आणि त्या चरित्र नायकाच्या कहाणीने प्रेक्षकाने भारावून जाणं. कोणी कलाकाराने त्या चरित्र नायकाची भूमिका उत्तम साकारली म्हणून त्याचं कौतुक होणं या सगळय़ा तशा नेहमीच्या गोष्टी आहेत. जेव्हा चरित्रपट साकारला जातो तेव्हा त्यातल्या त्या चरित्र नायकाबद्दलच जास्त बोललं जातं आणि त्याची व्यक्तिरेखा साकारणारा तो कलाकार कितीही उत्तम असला तरी तो फक्त एक माध्यमच असतो… पण बहुतेक हा पायंडा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ या सिनेमातनं मोडला जाणार आहे. याचं कारण आहे रणबीर कपूरने साकारलेला हुबेहूब संजूबाबा.

संजू हा सिनेमा त्याच्या टेलरमधनं दिसला, नावातनं कळला तसा संजय दत्त या कलाकाराच्या आयुष्यावर आधारलेला आहे. संजय दत्तच्या आयुष्यात प्रत्येक रंगाची छटा आहे आणि त्याबद्दल इतकं वाचलं बोललं गेलंय की, संजय दत्त म्हटलं की त्याच्या नावासोबत अनेक गोष्टी आठवायला लागतात. त्याचे गाजलेले सिनेमे असो, त्याच्या आयुष्यातली प्रेम प्रकरणं असो, त्याच्या घरची प्रसिद्ध पार्श्वभूमी असो त्याच्यावर उमटलला गेलेला देशद्रोहाचा शिक्का असो, त्याचे वादग्रस्त वैवाहिक आयुष्यं असो वा ड्रग्जच्या आहारी गेलेले त्याचे आयुष्य… संजय दत्तच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्यासारखं प्रचंड आहे आणि सिनेमासारखं आयुष्य जगलेल्या या व्यक्तीच्या आयुष्यावरचा सिनेमा, तो देखील राजकुमार हिरानी-विधू विनोद चोप्रा या द्वयीचा म्हटल्यावर आणखीनच अपेक्षा उंचावतात. अर्थात, त्या सर्व अपेक्षांना हा सिनेमा खरा उतरतो. संजय दत्त एक व्यक्ती म्हणून जास्त स्पष्टपणे समोर येतो. पण या सगळय़ापेक्षाही लक्षात रहातो तो संजय दत्त साकारणारा रणबीर कपूर.

रणबीर कपूरच्या या सिनेमातल्या अदाकारीबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. त्याचा मेकअप, शरीरयष्टीवर घेतलेली मेहनत, यातनं उभं राहिलेलं संजय दत्तचं बाह्यरूप तर वादातीत आहेच. पण त्यापलीकडेही जाऊन रणबीरने त्यात जो संजूचा आत्मा भरलाय त्यामुळे त्या व्यक्तिरेखेत जी काही जान आलीय ती कमाल. म्हणजे अगदी पहिल्या दृष्यापासनं रणबीर संजू म्हणून समोर येतो तेव्हा तो संजय दत्तच वाटतो. बरं असं नाही की संजय दत्त कोणी जुना कलाकार, मागच्या काळातला कलाकार नाही. तो एक पिढी मागचा कलाकार होता आणि तितकाच आत्ताचा कलाकारदेखील आहे. तो सतत चर्चेतही असतो. त्याचं स्वतŠचं चाहतेमंडळ आजही आहे आणि हे इतकं कठीण असतानादेखील रणबीर कपूरने साकारलेला संजय दत्त बघताना कुठेच खरा संजय दत्त आठवत नाही. पहिल्या दृष्यानंतर हा तोच आहे याची आपल्या स्वतŠलाच इतकी खात्री पटते की पडद्यावर संजय दत्त स्वतŠच काम करतोय अशी आपण आपली मनोमन समजूत करून घेतो आणि सिनेमा पहातो. अभिनेता म्हणून रणबीर कपूरला खरंच पैकीच्या पैकी मार्क. संजय दत्तचं चालणं, बोलणं, त्याचे खांदे, कपडे घालायची पद्धत इतकंच नाही तर त्याच्या डोळ्यातली दुःखाची झालरदेखील त्याने तशीच्या तशी उभी केलीय. हा अभिनय मेकअपच्या खूप पलीकडचा आहे आणि तोच या सिनेमाचा खरा आत्मा आहे.

खरं म्हणजे संजय दत्तच्या आयुष्याचे असंख्य पैलू होते, आहेत. पण या सिनेमामध्ये त्याच्या आयुष्यातल्या मोजक्याच गोष्टींना स्पर्श केलाय. बाकीच्या सगळय़ा गोष्टी त्या ओघात थोडासा स्पर्श करून पुढे नेल्या आहेत. हे दिग्दर्शकाचं कसब म्हणायला हवं. अर्थात राजकुमार हिरानीचं दिग्दर्शन लोकप्रिय आहेच. सिनेमा हाताळणीची पद्धत, सिनेमाला देण्यात आलेली ट्रीटमेंट, स्टाईल या सगळय़ाबद्दल त्याची एक खास पद्धत आहे आणि ती या सिनेमातदेखील दिसते. म्हणजे दोन्ही मुन्नाभाई असो, 3 इडियट असो, पीके असो वा संजू प्रत्येक सिनेमाच्या हाताळणीत एक साधर्म्य दिसून येतं. त्यातल्या व्यक्तेरखा उभारणीतला चकचकीतपणा असो, एखाद्या भपकेबाज गाणं सदृष्य दृष्याची मांडणी. आता संजू हा सिनेमा जरी संजय दत्तच्या आयुष्यावरचा असला तरी त्याला राजकुमार हिरानी स्टाईल बॉलीवूड तडका मिळालेला आहेच आणि त्यामुळे संजूच्या आयुष्यात करडी छटा असूनदेखील हा सिनेमा आकर्षक वाटतो.

यात रणबीर कपूरचं कडक काम हा वेगळा मुद्दा…. पण यातली प्रत्येक व्यक्तिरेखा विशेष आहे आणि ती उत्तमरीत्या उभारली गेली आहे, तितकीच उत्तमरीत्या साकारली गेली आहे. त्यामुळे भक्कम गोष्टीला तितकीच भक्कम बांधणीदेखील लाभली आहे. परेश रावलने साकारलेली सुनील दत्तची भूमिका खरंच खूप छान. संजय दत्त इतकाच सुनील दत्तही एक व्यक्ती म्हणून या सिनेमातनं उलगडतो. त्याला छोटय़ा भूमिकेत का होईल पण तितकीच कणखर साथ लाभलीय मनीषा कोईरालाने साकारलेल्या नर्गिस दत्तच्या अदाकारीची. नर्गिसच्या चेहऱयावरच्या सौंदर्याच्या खुणा, तिची लकब पहाता आजवर पोस्टरमध्ये पाहिलेली नर्गिस डोळय़ांसमोर उभी रहाते. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख करायचा तर तो विकी कौशल या गुणी अभिनेत्याचा. संजय दत्तला जीवाला जीव देणारा जो मित्र लाभला आणि ज्याच्यामुळे तो आज स्वत:च्या पायावर उभा राहू शकला त्याची व्यक्तिरेखा. (अर्थात त्याविषयी सर्वांनाच माहिती असण्याची शक्यता नाही आणि हा नवा पैलू या सिनेमातनं पुढे येतो.) विकी कौशलने ही भूमिका प्रचंड ताकदीने साकारली आहे. त्याची गुजराती भाषेतली बोली, संजय दत्तपेक्षा अगदी वेगळं व्यक्तिमत्त्व, निरागस स्वभाव हे सगळं अगदी झक्कास उभं राहिलंय. या सिनेमात संजय दत्त इतका हीरो म्हणून विकी कौशलही तिततकाच भावून जातो. बाकी सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा या छोटय़ा भूमिकेतल्या अभिनेत्रीही दिमाखदार छाप सोडतात. जिम सरभ, बोमन इराणी हेदेखील छान.

सिनेमातली गाणी रंगीबेरंगी आणि छान आहेत. अर्थात विधू विनोद चोप्राच्या इतर सिनेमांइतकी ठसणारी नाहीत, पण कंटाळवाणी देखील नाहीत. या गाण्यांना त्याच्या चित्रीकरणासोबत पहाणं जास्त करमणुकीचं आहे. सिनेमा पहिल्या अर्ध्या भागात तर खूपच भाव खावून जातो. दुसऱया भागात जास्त लांबीमुळे आणि प्रसंगातला वेग थोडा मंदावल्यामुळे सिनेमा थोडा हळू होतो. अर्थात दिग्दर्शकाने बऱयाच गोष्टींना कात्री लावली आहे आणि जे दाखवलं तेवढं दाखवणं अपेक्षित होतंच.

पण सिनेमा बघून झाल्यावर मात्र सुपरहिट सिनेमा पाहिल्यानंतर जे भारावलेपण येतं तसं काहीसं होतं. रॉकी सिनेमाचं शूटिंग, मुंबई बॉम्ब ब्लास्ट किंवा तत्सम खऱया घटना उभ्या करताना थोडय़ा भव्यदिव्य कल्पनातीत गोष्टीदेखील उभारून दिग्दर्शकाने सिनेमा आणि डॉक्युमेंट्रीतला समतोल साधला आहे. तर दुसरीकडे दोन काळ दाखवतानाही टिपलेले बारकावे आणि काळानुरूप घडत गेलेले बदल अप्रतिम.
आपल्याला संजय दत्तबद्दल बरंच काही माहीत आहे, पण तसं असूनही हा सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही. उलट काही माहितीतल्या गोष्टी त्यातल्या बारकाव्यानिशी पडद्यावर पहाताना जास्त भारावून जायला होता. एकूणच संजू त्याच्या खऱया आयुष्याइतकाच त्याच्यावरच्या सिनेमातनं पण प्रभाव पाडायला यशस्वी झालाय. संजय दत्तसाठी आणि त्याहूनही जास्त रणबीर कपूरने साकारलेल्या संजूसाठी हा सिनेमा आवर्जून पहायलाच हवा.

दर्जा – तीन स्टार
सिनेमा – संजू
निर्माता – विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी
दिग्दर्शक – राजकुमार हिरानी
लेखक – राजकुमार हिरानी, अभिजात जोशी
छायांकन – रवी वामन
संगीत – ए. आर. रेहमान, रोहन-रोहन, विक्रम माँत्रोज
कलाकार – रणबीर कपूर, परेश रावल, मनीषा कोईराला, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, जिम सरभ, बोमन इराणी