हाऊसफुल्ल: ‘तुंबाड’ खिळवून ठेवणारा विलक्षण अनुभव

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखादी कलाकृती खिळवून ठेवते, त्याचवेळी विचार करायलादेखील भाग पाडते म्हणजे नेमकं काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर राही अनिल बर्वेचा ‘तुंबाड’ हा सिनेमा पाहायलाच हवा. लहान असताना वाचलेल्या आणि आपल्याला अतिशय भावलेल्या काल्पनिक दंतकथा, त्यातला राक्षस, राजकुमार, एकाकी वाडा, गुप्त खजिना या गोष्टी काळासोबत प्रौढ आणि प्रगल्भ झाल्या की, कशा सादर हेतील याचं खास उदाहरण म्हणजे हा सिनेमा. लहान असताना त्या गोष्टीत आपण जितके एकरूप झालो होतो तितकेच आजही या ‘तुंबाड’मुळे होते यात किंचितही शंका नाही.

ही कथा काल्पनिक आहे, पण कल्पना किती भरारी घेऊ शकते याचं उत्कृष्ट म्हणता येईल असं उदाहरण आहे. हा सिनेमा तीन टप्प्यांत, तीन पिढ्यांमध्ये पार पडतो. देव, दैत्य आणि मानवी मन, त्या मनाला चिकटलेल्या आशा, अपेक्षा, लोभ इत्यादी भावना आणि त्यातून जुळून आलेली गोळीबंद कथा आपल्याला प्रेक्षक म्हणून अक्षरशः चकीत करते. ही कथा आहे हस्तर नावाच्या एका दैत्याची. म्हणजे देवाच्या दोन मुलांपैकी एक हस्तर हा भयंकर त्रास देणारा आणि अजस्र भूक असणारा मुलगा होता. त्यामुळे सगळे त्याला लांब ठेवायचे. त्याचं कधीही मंदिर बांधण्यात आलं नाही. मात्र महाराष्ट्रातल्या तुंबाड गावात मात्र एका वाड्यात एका जमीनदाराने या हस्तरचं मंदिर बांधलं आणि तिथे हस्तर राहतो असा समज आहे. शिवाय तिथे सोन्याचा खजिना दडल्याचंही बोललं जातं, पण हस्तरच्या भयाने तिथे कोणीही जात नाही आणि मग काय होतं त्या खजिन्याचं, तो कोणाला मिळतो, त्या वाड्याचं गुपीत काय असतं आणि कसं शोधलं जातं याची कथा म्हणजे ‘तुंबाड’ हा सिनेमा.

आजवर आपण अनेक पौराणिक दंतकथा वाचल्या असतील. त्या दंतकथांप्रमाणेच हीदेखील एक दंतकथा आहे, पण ती दंतकथा मांडताना मानवी मनाचा खोलवर वेध घेतला गेलाय. लालसा माणसाला कुठे नेऊ शकते हे या सिनेमातून बिंबत जातं आणि आपली मती गुंग होत जाते. थरकाप उडवणारा, भान हरपून टाकणारा आणि त्याच वेळी मानवी मनाच्या संवेदनांची जाणीव देणारा हा सिनेमा म्हणजे उत्तम लिखाण, उत्तम, दिग्दर्शन, उत्तम अभिनय, उत्तम संगीत आणि उत्तम छायांकन या सगळ्यांचा जमून आलेला उत्तम मेळ आहे. भयपट म्हटल्यावर आधी आपल्या मनात एक चित्र निर्माण होतं. अक्राळविक्राळ चेहरे किंवा तशाच काही करामती, पण उत्तम भयपट तोच जो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकाचं मन काबीज करू शकतो, त्या मनावर आपली गच्च पकड ठेवू शकतो आणि हा सिनेमा त्यात कमालीचा यशस्वी ठरतो. किंबहुना पाश्चात्त्य बांधणीतले उत्तमोत्तम भयपट पाहिले असतील तर या ‘तुंबाड’ची तुलना थेट त्या सिनेमांशी करता येईल.

राही अनिल बर्वे दिग्दर्शक म्हणून जबरदस्त आहेत आणि त्यांनी या प्रकल्पातून आपल्या उत्कृष्ट कलानैपुण्यावर मोहर उमटवली आहे. अगदी पहिल्या दृश्यापासूनच हा सिनेमा पकड घेतो. दोन्ही काळ इतके चोख उभे राहिले आहेत की, त्यात काहीच कसर काढता येत नाही. या सिनेमाचं लिखाण ही आणखी एक उजवी बाजू. काल्पनिकता, मानवी मन आणि मनाचे व्यापार, काळ आणि काळात घडत जाणारे फरक, भय, करमणूक, संदेश या सगळ्यांचा बारकाईने विचार करून त्याची गोळीबंद कथा जन्माला आलीय आणि त्यावर साज चढलाय चोख पटकथेचा.

या सिनेमाच्या व्यक्तिरेखाही कसदार आहेत. विशेषकरून अभिनेता सोहम शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा तर मनातच ठसते. त्याशिवाय अनिता दाते, ज्योती मालशे, दोन बालकलाकार हेदेखील मनाची पकड घेतात. या सिनेमात या व्यक्तिरेखांइतकीच महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे वातावरणाची. पाऊस, काळोख, वाडा, झाड या गोष्टी इतक्या जिवंतपणे या सिनेमात वावरतात की, त्या तितक्याच खोलवर ठसतात आणि सिनेमा मनात झिरपवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हीएफएक्स प्रभाव तंत्र, पापणीही लवायला न लावणारं छायांकन आणि त्याला उठाव देणारी संगीताची जोड जबरदस्त काम करते.

एकूणच, ‘तुंबाड’ या सिनेमाची मर्यादा ही केवळ करमणूक करणारा चांगल्या प्रतीचा सिनेमा इतकीच नाही, हा सिनेमा त्यापलीकडेही प्रचंड आहे. किंबहुना, तो एक विलक्षण अनुभव आहे. तो पाहत असताना डोळे, कान आणि मन एकजीव होऊन जातं आणि आपण त्यातून बाहेर पडतो ते थेट सिनेमा संपल्यावरच.

दर्जा        :  ****

सिनेमा    :   तुंबाड

निर्माता    :  सोहम शाह, आनंद के. लाल, मुकेश शाह, अमिता शाह

दिग्दर्शक  :  राही अनिल बर्वे, आनंद गांधी

लेखक     :  मुकेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी

छायांकन  :  पकंज कुमार

संगीत      :  अजय-अतुल, जेस्पर

कलाकार  :   सोहम शाह, रंजिनी चक्रवर्ती, हरीश खन्ना, दीपक दामले, अनिता दाते, मोहम्मद समद, ज्योती मालशे

आपली प्रतिक्रिया द्या