‘नानू की जानू’- भुताटकीचा ‘हास्यास्पद’ गोंधळ

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

काही गोष्टी अशा का असतात आणि कशाला असतात याचं उत्तर नसतं. त्या तशाच असतात आणि त्या तशा असल्यामुळे आहेत तशा सहन कराव्या लागतात…. असो! हे लिखाण जेवढं असंबद्ध, काही अंशी कंटाळवाणं आणि उगाचच आहे तितकाच किंबहुना त्याहून कितीतरी पट अधिक असंबद्ध, कंटाळवाणा आणि उगाचच केला गेलेला सिनेमा नानू की जानू नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाला ना काही बूड आहे, ना घट्ट भिंती आहेत ना धरून ठेवायची क्षमता आहे. विनोदी धाटणीचे पण विनोदी नसलेले असे सिनेमे केवळ निख्खळ करमणुकीसाठी आसुसलेल्या मनाला फक्त त्रासच देतात हे नानू की जानू बघताना प्रकर्षाने जाणवतं.

तर, याची कथा थोडक्यात अशी… एक नानू असतो. तो अगदी वाईट माणूस असतो. लोकांच्या घरी घुसायचं आणि त्यांची घर बळकवायची हे त्याचं काम. त्यासाठी तो कुठच्याही थराला जाऊ शकतो. कुव्यवहार हा त्याचा व्यवसायच असतो. पण तरीही तो चांगला माणूसही असतो. (कारण तो हीरो आहे म्हणून) लोकांना मदत बिदत करत असतो. तर अशा नानूच्या समोर एका मुलीचा अपघात होतो आणि नंतर तिचा मृत्यूही होतो. आणि इथून ही खरी भुताळी कथा सुरू होते. त्या मुलीचं भूत होतं आणि ते या नानूच्या मानगुटीवर बसतं. विनोदी सिनेमा असल्याने इथनं विनोदाची पेरणी झाली आहे खरी… पण त्या मुलीच्या मृत्यूनंतर त्या मृत्यूचा बदलाही समोर यायला लागतो आणि बघता बघता विनोदी सिनेमाचं मर्डर मिस्ट्रीमध्ये रूपांतर होतं.. आणि मग काय होतं… असो. ते काय होतं ते पडद्यावर पहाता येईल. (म्हणजे अगदीच हौस असेल तरच) पण एकूणच कथा म्हणून, पटकथा म्हणून, संवाद म्हणून किंवा दिग्दर्शन म्हणून ही नानू की जानूची भट्टी जमून आलेलीच नाहीय. दिल्ली स्टाईल संवाद जरावेळ बरे वाटतात. पण ते देखील ओढून ताणून बसवल्यासारखे पदोपदी जाणवतात. पटकथा लिहीताना असंबद्ध गोष्टींचा एवढा भरणा आहे की सिनेमा पाहताना ओठांवर हास्य येण्याऐवजी कपाळावर आठय़ा उमटतात आणि कधी एकदा हा गोंधळ संपतोय असं सातत्याने वाटत राहातं. घराच्या चिमणीत राहाणारं भूत, तिच्या वडिलांचं वागणं इत्यादी गोष्टी जरा विचित्रच वाटतात.

या सिनेमात अनेक ठिकाणी प्रासंगिक विनोद शक्य होते. म्हणजे या घटनांमध्ये गांभीर्य असलं तरीही त्यातला विनोदी बाज शोधता आला असता पण गंभीर दृष्यांना अत्यंत गंभीरपणेच मांडलंय आणि या प्रामाणिकपणावर हसायचं की रडायचं या गोंधळात बिचाऱया पेक्षकाला अडकवलंय. अभय देओल, पत्रलेखासारख्या चांगल्या चांगल्या अभिनेत्यांना या सिनेमापायी फुकट घालवलंय हेच खरं. यात काही मोजकी दृष्यं विनोदी आहेत. पण त्या फुटकळ म्हणाव्या अशा दृष्यांसाठी अख्खा सिनेमा का पहावा हा प्रश्न उतरतोच. ना या सिनेमाचा संगीताचा बाज लक्षात रहाण्याजोगा आहे ना अजून काही…. अर्थात शेवटाकडे जरा टाईमपास होतो. पण तोपर्यंत या शेवटाकडे येण्याइतकं मानसिक धैर्य प्रेक्षकाकडे उरलेलंच नसतं.

यातला थोडा बहुत वगळला तर बाकीचा विनोद विनोदी नसून हास्यास्पद आहे. यात अनेक बाबींची विनाकारण भेसळ आहे. कधी तत्त्वज्ञान, कधी चमत्कार, कधी प्रेम तर कधी सूड… मुळात दिशा पकडली नाही की गोल गोल फिरत रहावं लागतं आणि कुठेच पोचता येत नाही अगदी तशीच अवस्था या जानूची झालीय. हा भूतपट असला आणि त्यात थोडं बहुत गांभीर्य राखायचं असलं तर निदान थोडं घाबरवलं पाहिजे होतं. विनोदी असल्याने निदान हास्याच्या लकेरी उमटायला हव्या होत्या. सूडपट असल्याने काही अंशी तरी प्रेक्षक उत्सुकता ताणली गेली हवी होती… पण यातलं काहीही घडत नाही आणि हा सिनेमा सपेशल निराशा करतो.

मुळात अशा पद्धतीचे सिनेमे बनवता येतात आणि ते चांगले बनवता येतात. गरज असते ती दिग्दर्शक लेखकाला आपल्याला नेमकं काय दाखवायचंय हे पक्कं ठाऊक असण्याची. नुसतंच काही तरी खुमखुमीत वाटतंय, बनवूया म्हणजे प्रेक्षक पण खूश होईल असं म्हणत पाटय़ा टाकल्या की त्याची अवस्था या सिनेमा सारखी होते… एकूणच हा सिनेमा पहाणं म्हणजे उगाच स्वतःला शिणवण्यासारखं आहे.