लष्करी शिस्तीचे ऐटबाज नाटक

5

>> क्षितिज झारापकर, [email protected]

‘हाऊ इज द जोश?’, ‘हाय सर!!!’ या आरोळय़ांनी सध्या गल्लीबोळं एका चित्रपटामुळे दुमदुमताहेत. नाटक, सिनेमा, टेलीव्हीजन ही समाजप्रबोधनाची माध्यमं आहेत हे यामुळे पुन्हा एकदा प्रमाणित झालं. त्यातही नाटक हे माध्यम जास्त पर्सनल आहे. कारण समोर हाडामासाची माणसं आपल्याला काही गोष्टी सांगत असतात. माणसांच्या कुवतीनुसार नाटकांचं सादरीकरण होत असल्याने अतिअक्राळविक्राळ चाळे न दाखवता म्हणणं मांडलं जातं आणि म्हणूनच त्याचा प्रभाव अधिक संभवतो. आमच्या या इंडस्ट्रीतल्या उमेदवारीच्या काळात नव्वदच्या दशकात राज्यनाटय़ स्पर्धेला हिंदुस्थानी लष्करावर एक नाटक सादर झालं होतं. ‘पोएटिक जस्टिस’. हे नाटक इतकं गाजलं की अगदी आतापर्यंत अनेक संस्थांनी त्याचे प्रयोग केले. मराठी रंगभूमीवर ‘कोडमंत्र’ हे नाटक व्यावसायिक नाटय़सृष्टीत सादर झालं. दिनू पेडणेकर हे नाटय़निर्माते त्यांच्या ‘कोडमंत्र’नंतर आता पुन्हा एक लष्करावर बेतलेलं ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटक घेऊन आले आहेत.

दिनू पेडणेकर या नाटय़कर्मीचा या व्यवसायातला चढता आलेख मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यांनी नाटय़निर्मितीचे सुरुवातीचे धडे आघाडीचे आणि धडाडीचे निर्माते मोहन वाघ यांच्या छत्रछायेत गिरवले आहेत. त्यामुळे नाटकांची निर्मिती कशी असावी याचं भारदस्त आणि रास्त प्रशिक्षण त्यांना लाभलेलं आहे. त्यांचं पहिलं नाटक प्रदीप दळवी लिखित ‘तेवीस जून’ला तब्बल नऊ सेट होते. ते नाटक सपशेल आपटलं. पण तरीही त्यांनी ‘कोडमंत्र’मध्ये देदीप्यमान निर्मितीमूल्य दिली होती. आता दिनू पेडणेकर यांनी देशाभिमान या संकल्पनेला धरून नाटकं आणण्याचा घाट घातला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर दोन आणि हिंदुस्थानी लष्करावर दोन अशी त्यांची ही चार नाटकं आहेत. त्यापैकी ताजं नाटक आहे ते ‘ऑपरेशन जटायू’.

‘ऑपरेशन जटायू’ हे एका कोर्टमार्शलचं नाटक आहे. लष्करातल्या एका अधिकाऱयावर त्याच्याच दोन सहकाऱयांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा जखमी झालेला आहे. प्रथेप्रमाणे लष्कराचाच एक वरिष्ठ अधिकारी आरोपीचं वकीलपत्र घेऊन या कोर्टमार्शलमध्ये त्याची बाजू मांडतो. हे कार्टमार्शल कसं पुढे सरकतं आणि सगळ्याचा निकाल कसा लागतो ही कथा म्हणजे ‘ऑपरेशन जटायू’. लिखाणात देशभक्तीचा ज्वर जसा ठासून भरलेला आहे, तसाच तत्त्वज्ञानांचा तर्कही उत्तम देण्यात आला आहे. घटना आधीच घडून गेलेली असल्याने येथे घटनाक्रम मर्यादित आहे, पण युक्तिवाद आणि परस्पर विधानांच्या आतषबाजीत त्याची उणीव भरून काढण्यात नितीन वाघ आणि दिगपाल लांजेकरांनी हुशारी दाखवली आहे. लेखक ‘ऑपरेशन जटायू’ला गरजेचा असणारा वेग संवादातून निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. पुन्हा हे नाटक लिहिताना दिगपाल आणि नितीन यांना केवळ पात्रच नव्हे तर त्या पात्राचा लष्करातला हुद्दा आणि ज्याला बोलतोय त्या पात्राचा हुद्दा याचं भान ठेवून संवादातली चटपटीतता आणणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन. दिग्दर्शनात सगळ्यांना लष्करी अनुशासन प्रदान करण्यातही दिगपाल लांजेकर यशस्वी झालेले आहेत. रंगमंचावर लष्कराची गर्दी आहे. ती गरजेचीही आहे. पण या गर्दीतील प्रत्येकजण अत्यंत डिसिप्लीन्ड वावरतो. त्यामुळे लष्कराची गरीमा टिकते आणि नाटकाचं गांभीर्य लक्षात येतं. बारीक हालचालींमधूनही दिग्दशकाने हे नमूद केलेलं आहे. ‘ऑपरेशन जटायू’ हे मिलिट्री प्रिसिजनचं नाटक होतं ते या गोष्टीमुळे. नाटकातला प्रत्येक कलाकार एका विलक्षण शिस्तीत आपलं काम करतो आणि त्यामुळे नाटक काटेकोरपणे सादर होतं.

अशा काटेकोर नाटकात अनुशासनप्रिय कलाकार हवेत. ‘ऑपरेशन जटायू’मध्ये श्रीकांत प्रभाकर हल्ल्यात जखमी कॅप्टन वाघ आणि त्यांचे वकील मेजर भारद्वाज, संकेत ओक हे दोघे परिपक्व अभिनेते आहेत. दोघांनी लष्करी ताठरता ठेवून भूमिकेला एक ह्युमन एलिमेन्ट प्रदान केलेला आहे. लक्ष्मीकांत संझगिरी याने आरोपी, त्याची घालमेल, आपली निर्दोषतेची तळमळ परिणामकारक दाखवली आहे. राजू बावडेकर लष्करी डॉक्टर शोभतात आणि एरव्ही रुक्ष होऊ शकेल अशा विषयाला विरंगुळा देतात. अमित जांभेकर, संजय महाडिक, सुधीर श्रीधर, किरण शेवाळे, शुभम बेलसरे आणि जयदीप ठाकरे या सर्व कलाकारांनी ‘ऑपरेशन जटायू’ची जबाबदारी आपल्या खाद्यांवर समर्थपणे पेलली आहे. दोन कलाकार या नाटकात उठून दिसतात. ते दोघेही उत्तम नट आहेत. येथे मात्र त्यांना लेखकाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. सुनील जाधव यांचा ब्रिगेडियर अभय सिंग आणि आरोपीचा वकील मेजर क्रांती सुर्वे झालेले अजय पूरकर. सुनीलची भूमिका छोटी असली तरी लिखाणात महत्त्वपूर्ण आहे. अजय पूरकर यांनी भूमिका चक्क खेळवली आहे.

संपूर्ण नाटक लष्करी न्यायालयात घडतं. संदेश बेंद्रे यांनी इतकं डिटेल्ड न्यायालय उभारलंय की ते खरं वाटावं. हे करताना बेंद्रे यांनी नाटकातल्या मोजक्या इतर स्थळांनाही व्यवस्थित जागा दिली आहे हे विशेष. देवदत्त मनीषा बाजी यांनी स्फूरणदेय संगीत देऊन ‘ऑपरेशन जटायू’ची परिणामकारता वाढवली आहे. निर्माते दिनेश पेडणेकर आणि सुजाता मराठे यांचं कौतुक करायलाच हवं. ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटक खर्चिक आहे. कलाकार आणि कर्मचारी हा गोतावळा मोठा आहे. त्यात पोषाख सगळे लष्करी आहेत, जे मराठीतल्या भानू अथय्या मानल्या जाणाऱया पूर्णिमा ओक यांनी खूपच ऑथेन्टिक केले आहेत. या सगळ्यामुळे अनामिका अंबिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘ऑपरेशन जटायू’ हे एक उत्तम नाटक आहे.

नाटक – ऑपरेशन जटायू
निर्मिती – अनामिका, अंबिका, साईसाक्षी
निर्माते- दिनू पेडणेकर, सुजाता मराठे
लेखक- दिग्पाल लांजेकर, नितीन वाघ
वेशभूषा – पूर्णिमा ओक
दिग्दर्शन- सुनील जाधव, श्रीकांत प्रभाकर, राजू बावडेकर, अजय पूरकर