ऱसिकहो : स्त्री सामर्थ्यातील वैचारिकता दाखविणारे नाटक

7

>> क्षितिज झारापकर, [email protected]

‘ट्रान्स affair’ मराठी रंगभूमीच्या वैचारिक पार्श्वभूमीशी अत्यंत सुसंगत नाटक

महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच विचारवंतांचा प्रदेश आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद, उमेद आणि इच्छा आपल्याकडे खूप जाणवते. मग यातून आपलं कलाक्षेत्र फार लांब नाही यात काय नवल. नाटक हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे हे मराठी नाटय़कर्मींनी फार पूर्वीच जोखलं होतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी ब्रिटिशांच्या विरोधातलं त्यांचं लिखाण मराठी नाटकांमधून जनमानसात पसरवलं. किचकवधमधला किचक हा लॉर्ड कर्झन होता असं मानलं जातं. नंतरही सातत्याने सामाजिक उन्नतीसाठी मराठी नाटकांचा वापर केला गेला. अत्र्यांचं ‘तो मी नव्हेच’, अशोक समेळांचं ‘कुसुम मनोहर लेले’, अभिराम भडकमकरांचं ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, अजित दळवी यांचं ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ ही काही ठळक आणि गाजलेली उदाहरणं आहेत. मराठी प्रेक्षकही अशा नाटकांना उदंड प्रतिसाद देतात यातच मराठी समाजमनाचा आपल्याला अंदाज येतो. अभिजित झुंझारराव यांचं ‘माकड’, प्राजक्त देशमुखांचं ‘देवबाभळी’ ही हल्लीची उदाहरणं हे सिद्ध करतात.
यात आता एक नवीन नाटक आलेलं आहे ‘ट्रान्स affair’. मराठी रंगभूमीवर चांगल्या विषयांची वानवा आहे, चांगलं लिहिणारे लेखक नाहीत ही आवई उठवणाऱयांना शुभा गोडबोले लिखित ‘ट्रान्स affair’ हे एक समर्पक उत्तर आहे. एक विलक्षण वुमन एम्पॉवरमेन्ट आणि इक्वलिटीची सुरुवात इथे शिल्पा नवलकर आणि आता शुभा गोडबोले यांनी केलेली आहे. सेल्फी या नाटकाला शिल्पा नवलकर यांनी लेखिकाऐवजी लेखक हे संबोधन वापरलं. आता शुभा गोडबोले यांनीही ‘ट्रान्स affair’ला हे संबोधन वापरलंय. ‘ट्रान्स affair’ हे नाटक एक्स्ट्रा मॅरीटल अफेयरवर बेतलेलं आहे हे अगदी तिसऱया मिनिटाला आपल्याला कळतं. पण या अफेयरमध्ये एक जबरदस्त पेच आहे. तो पेच नाटकाचा सस्पेन्स आहे त्यामुळे त्यावर आपण बोलणारच नाही आहोत. पण मग शुभाने ‘ट्रान्स affair’ लिखाणातून खेळत ठेवण्याचं कार्य उत्तम साधलेलं आहे. लेखक म्हणून हे शुभाचं पहिलंच लिखाण असूनही नाटक कुठेही भरकटत नाही. अनावश्यक असं काहीच संपूर्ण नाटकात येत नाही. इतकं मुद्देसुद लिखाण हल्ली कमी पाहायला मिळतं. ‘ट्रान्स affair’आपल्याला नात्यांच्या गुंत्यात नेतं ते दोन बायकांच्या चर्चेतून. एक प्रेयसी आहे आणि एक बायको. या दोघींच्या चर्चेतून आपल्याला चवीपुरता प्रियकर-नवरा, जो एकच आहे तो दिसतो. लिखाणात क्राफ्टिंगही मस्त जमलंय.

अशा नाटकांना दिग्दर्शन खूप महत्त्वाचं असतं. राजन ताम्हाणेंसारखे मंझे हुए दिग्दर्शक ‘ट्रान्स affair’ला लाभले आहेत. कमी पात्रांची सकस आणि इन्टरेस्टिंग नाटकं सादर करण्यात त्यांची पी.एच.डी. आहे. इथेही ते कमालीच्या सहजतेने तीन पात्रांचं हे नाटक परिणामकारक पद्धतीने उभं करतात. कमी पात्रं असली की रंगमंचावर पात्रांच्या हालचालींच्या लॉजिकची खूप गोची होऊ शकते. हे लक्षात घेऊन ताम्हाणेंनी ‘ट्रान्स affair’चं ब्लॉकिंग केल्याचं जाणवतं. कुठच्याही प्रसंगात कोणतंही पात्र उगीचंच हालत नाही. यामुळे नाटकाची फ्लुईडीटी उत्तम जमते. विषेश म्हणजे ‘ट्रान्स affair’मध्ये बऱयाचदा फ्लॅश बॅकचं सिनेमॅटिक तंत्र वापरलं गेलंय.

‘ट्रान्स affair’मध्ये कास्टिंगचा एक मजेदार मेळ साधला गेलाय. यात प्रतिमा कुलकर्णी या विख्यात दिग्दर्शिका अभिनेत्री म्हणून दिसतात हे खूप अप्रुपाचं आहे. आजवर प्रतिमाताईंना नट-नटय़ांना मार्गदर्शन करताना अनेकदा पाहिलं आहे. सर्वच माध्यमांमध्ये त्यांचा संचार आहे. आता एकदम विरुद्ध रूपात त्या इथे कशा सामोऱया येतात हे अप्रुप होतं. ‘ट्रान्स affair’मध्ये प्रतिमाताईंनी बायकोची भूमिका अत्यंत खरी साकारली आहे. नाटकातलं पात्र कितीही अनाटकीय करण्याचा प्रयत्न केला तरी ते नाटक असतं म्हणून तरी त्यात थोडा नाटकीपण येतोच. पण इथे प्रतिमाताईंनी कमालीचा खरेपणा पेश केलाय. ज्या घटनेत हे नाटक घडतं त्यातला बायकोचा अवघडलेपणाही नाटकी न करता त्यांनी खऱया पद्धतीने सादर केलाय. नाटकातला पेच उघडल्यावर बायकोचा सामंजसपणा इतरांच्या अवघडलेल्या स्थितीपेक्षा वेगळा केलाय हे त्यांचं कसब म्हणावं लागेल. प्रियकर-नवरा म्हणून दीपक करंजीकर रुबादार आहे. मुळात खऱया आयुष्यातल्या अगणित प्रेस कॉन्फरन्सेस आणि कॉर्पोरेट इश्यूज हाताळण्याच्या त्यांच्या अगाध एक्सपिरियन्सचा त्यांना इथे प्रचंड फायदा झालेला आहे. करंजीकर हे एक संपन्न नट आहेतच, पण इथे त्यांना त्यांच्याच पठडीचं पात्र मिळालेलं आहे. शुभा गोडबोले स्वतः प्रेयसीची भूमिका करतात. शुभाने याआधीही काही व्यावसायिक नाटकांतून काम केलेलं आहे. सध्या ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकातही त्या काम करतात. ‘ट्रान्स affair’मध्ये शुभा चोख काम करतात. त्यांनीच नाटक लिहिलेलं असल्याने त्यांचं पात्र त्यांना आतून बाहेरून माहीत आहे हे दिसतं. ‘ट्रान्स affair’ हे प्रायोगिक धाटणीचं नाटक आहे. पण या नाटकाचं नेपथ्य काही व्यावसायिक नाटकांना लाजवेल असं आहे. संदेश बेंद्रे यांनी पंचतारांकीत हॉटेलचा दिमाखदार सेट उभा केलाय. ज्यात इतर वेगवेगळी स्थळं दाखवायला खूप जागा आहेत.

चांगलं नाटक हे चांगलं असतं. ते प्रायोगिक वा व्यावसायिक नसतं. तद्वत ‘ट्रान्स affair’ हे एक चांगलं नाटक आहे. विषय कमालीचा आजचा आहे आणि नाटकातला पेच भन्नाट आहे. संपूर्ण टीमचं अभिनंदन.

नाटक – ट्रान्स affair
निर्मिती- दृष्टांत, त्रिकुट
लेखक – शुभा गोडबोले
नेपथ्य – संदेश बेन्द्रे
संगीत – आशुतोष वाघमारे, प्रीतिश खंडागळे
प्रकाश, दिग्दर्शन – राजन ताम्हाणे
कलाकार – दीपक करंजीकर, शुभा गोडबोले, प्रतिमा कुलकर्णी
दर्जा – अडीच स्टार