पटकथेत फसलेला पण अभिनयात ‘सुपरकडक’ – पुष्पक विमान

>>रश्मी पाटकर, मुंबई

आजोबा आणि त्यांची नातवंडं यांचं नातं तसं जगावेगळंच. दुधावरच्या सायीसारखं. वंशाची सगळी स्निग्धता नातवंडांच्या रुपात आजी-आजोबा बघत असतात, तर आई-बाबांच्या गैरहजेरीत आपला जवळचा हक्काचा सवंगडी म्हणून नातवंडांना आजी-आजोबांची ओढ असते. एक वयाने तर दुसरा मनाने बालपण जगत असतो. म्हणूनच कदाचित त्यांच्यातला हा समान दुवा कितीही काळ लोटला तरीही कायम तसाच हळवा राहतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा चित्रपट म्हणजे पुष्पक विमान.

आपण सगळ्यांनीच पुष्पक विमानाची कथा ऐकली आहे. रावणाने सीताहरण ज्या विमानातून केलं आणि तुकोबारायांना सदेह वैकुंठगमन ज्याने घडवलं ते पुष्पक विमान. आपल्या कीर्तनातून याच पुष्पक विमानाबद्दल निरुपण करणाऱ्या जळगावातल्या विष्णुदास उर्फ तात्या वाणी यांची ही कथा आहे. पुराणातल्या पुष्पक विमानाचं तात्यांना भारी कौतुक आहे. गावातलं एक भन्नाट व्यक्तिमत्व असलेल्या तात्यांच्या मुलाचं आणि सुनेचं निधन झालंय. त्यांना विलास नावाचा एक नातूही आहे. आई-वडिलांना पारख्या झालेल्या विलासवर तात्या मायेची सावली धरतात. आपल्या परीने विलासची जपणूक करत तात्या त्याला लहानाचा मोठा करतात. विलास मोठा होऊन मुंबईला निघून जातो. लग्न करून स्वतःचा संसारही थाटतो. इथे गावी त्याची वाट बघणारे तात्या मात्र एकाकी आयुष्य जगत असतात.

एक दिवस तात्या आजारी असल्याचा निरोप विलासला मिळतो आणि तो धावत गावी परत येतो. तात्यांना एकटं जगताना पाहून जळगावापेक्षा मुंबईला चला, असा हट्टही तो धरतो. तात्यांना जळगाव सोडून कुठेही जायचं नसतं, पण शेवटी नातवाच्या हट्टापुढे मान तुकवून ते मुंबईला येतात. जळगावच्या मोकळ्याढाकळ्या राहणीमानाची सवय असलेल्या तात्यांना मुंबईत छोट्या घरात, गचाळ वस्तीत जुळवून घेणं जरा जडच जातं. त्यात खानदेशी वळणाच्या घरात आलेल्या कोकणातल्या सुनेशीही त्यांची गोड नोकझोक होते. मुंबईतल्या रोजच्या धावपळीला ते वैतागतात. एक दिवस परत गावी जायला निघतात. पण, काही कारणामुळे त्यांना गावी जाता येत नाही आणि त्या सगळ्या गोंधळात त्यांना मुंबईच्या विमानतळावरून उडणारं विमान दिसतं… आणि यानंतर सुरू होतो पुष्पक विमानाच्या दिशेने जाणारा प्रवास. तो कसा पूर्णत्वाला जातो ते मात्र चित्रपटातच पाहावं लागेल.

या चित्रपटाची मूळ कथा सुबोध भावे यांची आहे. मूळ कथानक उत्तम असलं तरी पटकथेत मात्र चित्रपट काहीसा फसल्यागत वाटतो. चित्रपटात अचानक सुरू होणारे आणि संपणारे प्रसंग प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं करतात. अनेक ठिकाणी उत्तम संवाद आणि पटकथा फुलवायला वाव असूनही प्रसंग कापल्यासारखे वाटल्याने रसभंग होतो. चित्रपटातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात असतील असं अजिबात वाटत नाही. संवादांची ‘जळगावी’ शैली मात्र ठसठशीत. सुपरकडक, गंदीपटाक, डंगऱ्या इत्यादी अहिराणी बोलीतले शब्द आल्याने सवांद गमतीशीर झाले आहेत. चित्रपटाचा बाज विनोदी ढंगातून भावनिकतेकडे प्रवास करतो. मात्र, पटकथा फसते आणि अनेक प्रसंग हवे तसे फुलवता न आल्याने चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरण्यास कमी पडतो. वैभव चिंचाळकर यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न म्हणून त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स द्यावे लागतात. काही ठिकाणी ते स्वतः चाचपडल्यासारखे वाटतात. मात्र, त्यांचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे.

या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे अभिनय आणि गाणी. मोहन जोशी हे अभिनेते म्हणून किती मोठे आहेत, हे नव्याने सांगणे न लगे. मायाळू, तुसडे, इरसाल, सुनेला सासुचा इंगा दाखवणारे पण मनाने हळवे असलेले ‘तात्या’ मोहन जोशी यांनी लीलया साकारले आहेत. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीने चित्रपटात जान आली आहे. सुबोध भावे यांनी साकारलेला विलासही तात्यांच्या भूमिकेला तोडीस तोड आहे. मात्र त्यांची भूमिका अजून खुलवता आली असती, असं राहून राहून वाटून जातं. तात्यांची कोकणी सून झालेल्या गौरी किरण यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. मध्यंतरापर्यंत त्यांना भूमिकेचा सूर सापडत नसल्यासारखं वाटतं. मात्र, मध्यंतरानंतर त्यांनी भूमिका चांगली रंगली आहे. राहुल देशपांडे यांनी साकारलेले तुकोबारायही ठाकठीक. इतर कलाकारांची कामही चोख आहेत.

चित्रपटातील गाणीही उत्तम आहेत. नरेंद्र भिडे यांच्या संगीताने पुष्पक विमानाला भक्तिरसात न्हाऊन टाकलं आहे. आनंद भाटे, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी या मान्यवरांचे स्वर्गीय स्वर प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. एकूणच पटकथेत फसलेला वाटला तरी पुष्पक विमानमधले आजोबा-नातवाच्या नात्याचे पैलू प्रेक्षकांच्या मनाला भावतात आणि आपल्या आजोबांसोबतच्या नात्याची हळुवार आठवणही करून देतात.