फसवणुकीच्या महाजालाची गोष्ट -‘टेक केअर गुड नाईट’


>>रश्मी पाटकर, मुंबई

सध्याच्या इंटरनेटच्या जगात ट्रोलिंग, ऑनलाईन फ्रॉड, स्कॅमिंग, ब्लॅकमेलिंग हे शब्द वारंवार कानावर पडतात. इंटरनेटमुळे मानवी जीवनात अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मग त्या सामाजिक असोत वा असामाजिक. त्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. अर्थात आता दररोज इंटरनेट जगातले इतके घोटाळे बाहेर पडताहेत, की इतर गोष्टींप्रमाणेच ते आता आपल्या जगण्याचा एक भाग झाला झाल्या आहेत. पण, फसवणूक ही आभासी जगातून होत असली, तरी तिचे पडसाद आभासी नसतात. ते अस्सलच असतात. त्यात मानवी भावना आणि संवेदना गुरफटलेल्या असतात. त्यामुळे आता इंटरनेट हा विषय असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार झाला आहे. आपण कितीही ठरवलं तरीही या महाजालापासून अलिप्त राहू शकत नाही. अशीच काहीशी कथा सांगतो टेक केअर गुड नाईट हा चित्रपट.

टेक केअर गुड नाईट या चित्रपटाचं नाव मुद्दाम इंग्रजीत ठेवण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या काळात हे शब्द परवलीचे शब्द झाले आहेत. पण अनोळखी माणसांकडून झालेली इंटरनेटवरची मैत्री कधीकधी प्रचंड धोकादायक ठरू शकते किंबहूना ठरते. हेच हा चित्रपट आपल्या कथेतून सांगतो. ही कथा आहे, एका जोडप्याची. अविनाश पाठक आणि आसावरी हे एक सुखवस्तू जोडपं. पण हे सुख काही त्यांच्या वाट्याला सहजासहजी आलेलं नाही. खूप कष्ट करून त्यांनी ते मिळवलेलं आहे. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून मोठ्या प्रयत्नाने यश मिळवू पाहणारा अविनाश आणि समुपदेशक असलेली त्याची पत्नी आसावरी यांचं अमेरिकेला शिकणारा मुलगा आणि कॉलेजवयीन मुलगी असं एक चौकोनी कुटुंब आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्यापासून सतत पळ काढणारा अविनाश एक दिवस स्वेच्छानिवृत्ती घेतो. निवृत्तीनंतर युरोपवारी करण्याचं स्वप्न तो सपत्नीक पूर्ण करतो. पण, फिरून आल्यानंतर जेव्हा तो हिंदुस्थानात पाऊल टाकतो, तेव्हा त्याच्या स्वागताला एक संकट उभं असतं. तो युरोपात असताना कुणीतरी त्याच्या निवृत्तीनंतर मिळालेले ५० लाख रुपये अकाउंटवरून काढलेले असतात. हे कळताच अविनाश हडबडतो. हे सगळं निस्तरत असताना अजून एक संकट त्याच्यासमोर उभं ठाकतं. त्याच्या तरुण मुलीचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होणार असतो. त्या व्हिडीओने त्यांचं जग उद्ध्वस्त होणार असतं. त्यामुळे हतबल झालेला अविनाश पोलिसांशी संपर्क साधतो आणि मग सुरू होतो गुन्हेगार शोधण्याचा प्रवास. तो प्रवास कसा होतो, ते चित्रपटात रंजक पद्धतीने मांडण्यात आलं आहे.

मुळात चित्रपटाचा विषय हा नवीन आहे. प्रत्यक्ष चोरी होणं, दरोडे यात चोराचा माग काढता येतो. पण, आभासी जगात चोरांचा माग काढणं तितकंच कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. आपण कितीही स्वतःची सोडवणूक केली तरीही अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात आणि दुर्लक्ष केलं तर त्याचा फटकाही आपल्याला पडू शकतो. लेखक गिरीश जोशी यांनीही या चित्रपटाच्या कथेतून हेच मांडायचा प्रयत्न केला आहे. कथा ही पडद्यावर घडत असली, तरी प्रेक्षक स्वतःला अविनाशशी जोडून घेऊ शकतो. त्यामुळे यात लेखक यशस्वी झाला आहे. दिग्दर्शनही जोशी यांचंच असल्याने त्यांनी कथा अतिशय सरळ साधेपणाने मांडली आहे. त्यामुळे डोक्याला चालना मिळाली तरी प्रेक्षक कुठेही गोंधळत नाही. त्यामुळे जोशी याबाबतीतही यशस्वी झाले आहेत.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सचिन खेडेकर यांनी हतबल झालेला बाप यापूर्वीही साकारला असल्याने याबाबतीत त्यांच्या भूमिकेत काहीही नावीन्य नाही. पण, अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकू शकणाऱ्या मुलीला सोडवण्यासाठी जिवाचं रान करणारा बाप मात्र खेडेकरांनी उत्तम साकारला आहे. त्या तुलनेने आसावरी झालेल्या इरावती हर्षे यांची भूमिका तोकडी पडते. या सगळ्यात कौतुक करावं लागेल, ते इन्स्पेक्टर पवार झालेले महेश मांजरेकर आणि या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत असणाऱ्या आदिनाथ कोठारे यांचं. महेश मांजरेकर यांनी साकारलेला पोलीस बघणंही तसं नवीन नाही. पण, सायबर गुन्हे शाखेमध्ये काम करणाऱ्या संवेदनशील, सहृदय आणि तितक्याच कर्तव्यदक्ष पोलिसाची भूमिका त्यांनी उत्तमरित्या वठवली आहे. आदिनाथ कोठारे यांनी प्रथमच खलनायक साकारला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा हा थंड डोक्याचा खलनायकही भाव खाऊन गेला आहे. केवळ गमतीपायी आणि स्वतःच्या ज्ञानाचा गैरवापर करू पाहणारा आजच्या पिढीचा बहकलेला तरुण कोठारे यांनी साकारलेल्या भूमिकेत पाहायला मिळतो. इतर भूमिकाही ठीकठाक.

चित्रपटात एकही गाणं नाही हे एक उत्तम आहे. त्यामुळे गाण्यामुळे होऊ शकणारा रसभंग टळला आहे. बाकी तांत्रिक बाजूही व्यवस्थित आहेत. फक्त कथेची मांडणी करताना पात्रांना होणाऱ्या त्रासातून या प्रश्नाची तीव्रता थोडी अधिक दाखवता आली असती, तर बरं झालं असतं असं वाटून जातं. तसंच, काही तांत्रिक बाबीही थोड्या अधिक खुलवून सांगता आल्या असत्या तरीही चाललं असतं. गिरीश जोशी यांनी या चित्रपटात एक महत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. ऑनलाईन फसवणूक ही खरंतर आता सर्रास घडणारी गोष्ट झाली आहे. पण, त्याबद्दल माहीत असूनही आपण फसवले गेलो आहोत, हे मान्य करायला सहसा कुणी पुढे येत नाही, या मानवी स्वभावाच्या पैलूवरही जोशी यांनी बोट ठेवलं आहे.

थोडक्यात, इंटरनेटच्या महाजालात वावरताना तुमचा पाय फसवणुकीच्या जाळ्यातही अडकू शकतो, तेव्हा सावध राहा, असा संदेश हा चित्रपट देतो. त्यामुळे वेगळ्या विषयाच्या हाताळणीसाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.

summary- review of take care good night