सामाजिक विसंगतीवर प्रकाशझोत

>> देवानंद भुवड

रमेश नारायण वेदक यांची एकाच वेळी प्रकाशित झालेली ‘दोष माझ्यातच असावा’ आणि ‘अंतरीचे तरंग’ ही दोन पुस्तके. ‘अंतरीचे तरंग’ हा वैविध्यपूर्ण ललित लेखसंग्रह आहे. यात साधारणतः एकेचाळीस लेखांचा समावेश केलेला आहे. आपल्याकडून होणारी आरोग्याची हेळसांड, घटस्फोटासारख्या जटिल समस्येवरील तडजोड आणि सामंजस्य, ज्येष्ठांचे सहजीवन, दत्तक मुलांची मानसिकता, पारंपरिक व्यवसाय हे कलेचेच प्रकार असण्यावर केलेले भाष्य, नेतृत्वातील कौशल्य, एड्समुक्त समाज ही काळाची गरज असण्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती, मंदिरे आणि धार्मिक स्थळांचा होणारा दुरुपयोग, अनाथांचे जीवन, शिक्षणासंबंधीचे आपणास भेडसावणारे प्रश्न आणि त्यावरील तोडगे, स्वदेशी चळवळीची गरज, क्रेडिट कार्डाची उपयुक्तता, आपले स्वास्थ टिकवण्यासाठीचे उपाय अशा आपणास भेडसावणाऱया दैनंदिन समस्यांचे निराकरण या ललित लेखसंग्रहातून वेदक यांनी प्रांजळपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या पुस्तकातून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, कला-क्रीडा, शैक्षणिक अशा वेगवेगळय़ा विषयांवर लेखकाने प्रकाशझोत टाकल्याचे स्पष्टपणे जाणवते. एखादी समस्या उद्भवते तद्वतच त्यावर काही ना काही उपाय असतोच. तो आपल्या परीने शोधून, त्यावर विचारमंथन करून लेखकाने प्रत्येक लेखातून भाष्य केल्याचे जाणवते. एकंदरीत यातील लेख हे वाचनीय आहेतच. वाचकांची नस पकडण्याची भाषाशैली लेखकाला गवसल्याचे प्रत्यंतर पुस्तक वाचताना येते.

‘दोष माझ्यातच असावा’ हा रमेश वेदक यांचा कथासंग्रह. ‘शहाणे करून सोडावे अवघे जन’ ही उक्ती सार्थ करणाऱया दहा निवडक कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीची कथा ही मागासवर्गीयांना मिळणाऱया सर्व सवलतींचा लाभ घेत असताना आपली जात लपविणाऱया एका कथानायकावर बेतलेली आहे. या कथेतून मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखवण्यातील लेखकाचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ‘रुक्मिणी-दुष्काळाचा बळी’ या कथेतून सध्या शेतकऱयांच्या होणाऱया आत्महत्या वाचकांच्या डोळय़ांसमोर उभ्या राहतात. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाचा प्रश्न सुटत नसून तो कसा अधिक जटील होतो, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या स्त्र्ायांना कशा प्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागते याचे चिंतन या कथेत आढळते.

‘कावळीचं घरटं’ ही कथा पशु-पक्ष्यांनाही माणसाप्रमाणे भावभावना असतात हे सूचित करते. ‘दोष माझ्यातच असावा’ या शीर्षक कथेतून एका निरपराध स्त्रीच्या भावी जीवनाची परवड टळावी म्हणून तिच्या पतीने उचललेले धाडसी पाऊल समाजाच्या डोळय़ांत अंजन घालणारे आहे. एकंदरीत यातील सर्वच कथा साध्या-सोप्या, सहज आकलन होणाऱया अशा छाटणीच्या आहेत. ही दोन्ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरण्याजोगी आहेत. ही पुस्तके डिंपल पब्लिकेशन या नावाजलेल्या प्रकाशन संस्थेची असून दोन्हींची मुखपृष्ठs प्रसाद रमेश वेदक यांनी उत्तमरीत्या रेखाटलेली आहेत.

अंतरीचे तरंग ( ललित लेखसंग्रह)
लेखक – रमेश नारायण वेदक
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ – 130, मूल्य – 130 रु.

दोष माझ्यातच असावा (कथासंग्रह)
लेखक – रमेश नारायण वेदक
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ – 70, मूल्य – 100 रु.