Movie Review : निखळ कौटुंबिक मनोरंजन- वेडिंगचा शिनेमा

4

>> रश्मी पाटकर

लगीनसराई म्हटलं की मनात जितका आनंद दाटून येतो तितकेच नाना तऱ्हेचे प्रश्नही येतात. लग्न ठरल्यापासून ते संसार सुरू होईपर्यंत हे प्रश्न काही पिच्छा सोडत नाहीत. पण तरीही आपण सगळेच या सोहळ्याला जमेल तसं जमेल तितकं अनुभवायचा प्रयत्न करत असतो. यात नवरा-नवरी तर असतातच पण, त्यांच्या साहाय्यासाठी नेमलेली भाडोत्री मंडळीही असतात. तीही लग्न नावाच्या सोहळ्याची साक्षीदार होतात. त्यातल्या गमतीजमती, रुसवेफुगवे अनुभवतात. अशाच एका लग्नाची गोष्ट सांगतो डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट.

चित्रपटाची कथा त्याच्या नावातच आहे. मुंबईतल्या प्रधान नावाच्या डॉक्टर दांपत्याची एकुलती एक मुलगी परी मेडिकल इंटर्न म्हणून सासवडला जाते आणि तिथे मोबाईल शॉपच्या मालकाच्या म्हणजे प्रकाश शहाणेच्या प्रेमात पडते. अवघ्या दोन अडीच महिन्यात त्यांचं लग्न ठरतं आणि मग हल्लीच्या लग्नातल्या ट्रेंडप्रमाणे लग्नाच्या व्हिडीओसारखा प्री-वेडिंग व्हिडीओ तयार करण्याचा घाट घातला जातो. हे काम अंगावर येतं ते उर्वी नावाच्या एका तरुण फिल्ममेकरच्या अंगावर. हटके विषय घेऊन एखादा चांगला चित्रपट बनवण्याच्या तयारीत असलेल्या उर्वीला अचानक हे काम मनाविरुद्ध स्वीकारावं लागतं. सुरुवातीला आढेवेढे घेत, काहीशी कंटाळत ती या कामाला तयार होते. पण जसजसं लग्न जवळ येऊ लागतं आणि तिच्या प्री-वेडिंगचं चित्रीकरण होऊ लागतं, तसतसं मनाने कोरड्या असलेल्या उर्वीला नात्यांचे पदर उलगडायला लागतात. त्यांच्यातली गंमत दिसायला लागते. नेहमीच्या पठडीतलं, टीपिकल अशी नावं ठेवल्या गेलेल्या अनेक गोष्टी आणि त्यामागचे अर्थ तिला उलगडायला लागतात. मग हे लग्न होतं की नाही. या प्रीवेडिंगचं नेमकं काय होतं? परी आणि प्रकाशच्या गोष्टीतून उर्वीच्या आयुष्यात नेमका काय बदल होतो, ते मात्र चित्रपटात पाहावं लागेल.

खरंतर या चित्रपटाची संहिता वेगळी असली तरी मूळ कथेत तसं फारसं नाविन्य नाही. आपण अशा प्रकारच्या गोग्गोड पठडीतल्या अनेक कथा आधीच पडद्यावर पाहिल्या आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांनी या चित्रपटाला शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा ट्विस्ट दिला आहे. एक शहरी मुलगी गावाकडच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करायला तयार होते, हे आजच्या घडीची काहीशी अशक्यप्राय वाटणारी घटना या चित्रपटात घडते आणि मग त्यात लग्नातल्या गडबडीप्रमाणे असंख्य नातेवाईक, दोन्हीकडची कुटुंब यांचा समावेश व्हायला लागतो. दोन्हीकडची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांच्या आवडीनिवडी, भाषा, सामाजिक परिस्थिती यातल्या फरकामुळे अनेक गमतीजमती या कथेत घडतात. कथा कुठेही संथ होऊ नये यासाठी चुरचुरीत संवादांची फोडणी घालण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षक गुंतून जातो. मध्यतंरापर्यंत सगळं गुडीगुडी चाललेल्या कथानकात मध्यंतरानंतर थोडा तणाव दाखवण्यात आला आहे. पण तोही चवीपुरताच आहे. त्यामुळे पडद्यावर दिसणारी कथा कितीही अविश्वसनीय वाटली तरी हवीहवीशी वाटायला लागते.

पाहा वेडिंगचा शिनेमाचा ट्रेलर-

या चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांचं रेखांकन अतिशय चांगलं आहे. अपवाद फक्त मुक्ताचा. मुक्ता बर्वे ही किती जबरदस्त अभिनेत्री आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण या चित्रपटात तिच्या या अभिनय गुणांचा वापर म्हणावा तसा करण्यात आलेला नाही. पण याचं मूळ व्यक्तिरेखेच्या बांधणीत आहे.

अभिनयाबाबत सांगायचं झालं तर मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका आठल्ये, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, भाऊ कदम, संकर्षण कऱ्हाडे, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ या सगळ्यांनी आपापली कामं चोख केली आहेत. फक्त काही ठिकाणी कलाकारांचा अभिनय खोटा वाटून जातो. पण, विशेष कौतुक केलं पाहिजे ते नायकाचा मित्र झालेल्या प्रवीण तरडे आणि भाऊ झालेल्या संकर्षण कऱ्हाडे याचं. त्यांच्या वाटच्या भूमिका तुलनेने छोट्या वाटल्या तरी त्यात ते दोघेही भाव खाऊन गेले आहेत. चित्रपटात गाणी असली तरीही ती प्रसंगानुरुप आहेत. त्यामुळे चित्रपटानंतर ती लक्षात राहत नाहीत. संवादांच्या बाबतीत म्हणाल तर या चित्रपटातले संवाद धमाल आणतात. लग्नातल्या लहानसहान गोष्टी, ग्रामीण बाजात हेरलेल्या लग्नातल्या छोट्या छोट्या अडचणी यात वापरण्यात आलेले संवाद प्रेक्षकाला मनमुराद हसवतात. बाकी तांत्रिक बाबीही ठीकठाक. डॉ. सलील कुलकर्णी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नाला त्यांना पुरेपूर गुण द्यावेच लागतील. कारण, इतक्या सगळ्या मंडळींचा गोतावळा सांभाळताना दिग्दर्शकाचा स्वतःचा गोंधळ उडू शकतो. पण असं काहीही होऊ न देता त्यांनी कथेची मोट व्यवस्थित बांधली आहे. त्यामुळे याची मांडणी सैल पडत नाही.

थोडक्यात, रंजक मांडणीचा एक कौटुंबिक चित्रपट पाहायचा असेल तर वेडिंगचा शिनेमा नक्की पाहावा. यात कुठेही मारधाड नाही, सस्पेन्स, कारस्थानं नाहीत. सगळं गोड गोड आहे. अविश्वसनीय वाटलं तरीही अनेकांना गुंतवून ठेवेल अशी कथा आणि रंजक मांडणी यांमुळे हा चित्रपट सर्वार्थाने सहकुटुंब पाहावा असा आहे.