हलके  फुलके  गाभीर्य

2

>> क्षितिज झारापकर

‘‘व्हाय so गंभीर’’ अजून एक नवं कोरं नाटक. मराठी रंगभूमीवरील हे नवनवे प्रयोग तिच्या समृद्धतेत भरच घालत आहेत.

प्रहसनात्मक  नाटकं मराठी रंगभूमीवर बरीच येऊन गेली. अशा नाटकांमधे एक वेगळीच गंमत असते. वेगवेगळी पात्रे, काहीअंशी अर्कचित्रच उभी करुन प्रसंग रंगवता येतात. पात्रसंख्येची मर्यादा नसल्याने प्रसंगानुरूप नेमकी पात्रं उभी करून कमालीची रंजकता आणि सूचकता साधता येते. कथानकाचीही मर्यादा नसल्याने मग विषयाचं वैविध्यही येऊ शकतं. अशा नाटकांचा मुख्य फोकस प्रासंगिक विनोद आणि उपहास असतो. दूरचित्रवाहिनीवर या प्रकारचे असंख्य कार्यक्रम सादर होत असतात. पु. ल. देशपांडे यांनी ‘वाऱ्यावरची वरात’ या प्रयोगात तर पहिला आणि दुसरा अंक संपूर्णपणे स्वतंत्र धाटणीचा सादर केला. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीतून पाझरणाऱ्या साहित्यिक दर्जामुळे ‘वाऱ्यावरची वरात’ अजरामर कलाकृती झाली.

अथर्व थिएटर्स ही नाट्यसंस्था नेहमीच नवनवीन प्रयोग करते. संतोष काणेकर यांची ही संस्था जन्माला आली तीच हिटलरला कोकणात आणण्यापासून. ‘मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी’ हे अथर्वचं पहिलं नाटक. त्यानंतर सध्या गाजत असलेल्या संगीत ‘देवभाभळी’ नाटकातील मानसी जोशी यांचं पदार्पण घडवणारं संगीत ‘लग्नबंबाळ’. नजीकच्या काळात गाजलेलं ‘दोन स्पेशल’ हे नाटकदेखील अथर्वनेच मराठी रंगभूमीवर आणलं. सध्या अथर्वने आणखीन एक वेगळा प्रयत्न केलाय. ‘व्हाय सो गंभीर’ नावाचं नाटक त्यांनी यंदाच्या हंगामात आणलंय. ‘व्हाय सो गंभीर’ हा रिह्यू नाही. ते प्रहसनात्मक व्यंगनाट्यही नाही. ‘व्हाय सो गंभीर’ आहे एक सिटकॉम. सिच्युएशनल कॉमेडी. हा वाक्प्रचार सर्वसाधरणपणे टीव्हीच्या दुनियेत वापरला जातो. आजवर टीव्हीवाल्यांनी नटांपासून कथानकांपर्यंत बऱ्याच गोष्टी रंगभूमी कडून उसन्या घेतल्या. ‘व्हाय सो गंभीर’ने टीव्हीकडून सिटकॉम रंगमंचावर आणलाय. इथे एक कुटुंब आहे. आई, वडील, बहीण आणि नवीन लग्न झालेले नवरा बायको (मुलगा आणि सून). कुटुंब छान जगणारं. कौटुंबिक क्लेष, कलह नाहीत. या कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी म्हणजे हे नाटक आहे. ‘व्हाय सो गंभीर’ म्हणजे सांसारीक आणि प्रापंचिक प्रॉब्लेम्समुळे गंभीर न होता हसतहसत त्यांच्यावर तोडगा काढण्याची किमया. आता असा घाट असल्यावर नाटकात येणाऱ्या समस्या मात्र प्रेक्षकांच्या जवळच्या असायला हव्यात. समस्यांशी प्रेक्षकांचं आयडेंटीफिकेशन साधलं गेलं की मग ‘व्हाय सो गंभीर’सारखं नाटक सुपरहिट व्हायला वेळ लागत नाही. इथे तसं झालेलं दिसतं. नाटकाची घाटणी वेगळी आहे आणि त्यामुळे ‘व्हाय सो गंभीर’च्या संपूर्ण टीमसमोर एक वेगळीच जबाबदारी उभी आहे. त्यांना नाटक बिंबवायचं नाहीये. त्यांनी नाटकातली ही पाच पात्रं प्रेक्षकांवर बिंबवण्याची, त्यांच्यात रुजवण्याची नितांत गरज आहे. तसं शक्य झालं तर ‘व्हाय सो गंभीर’ हे मराठी नाटकांचं एक नवीन मॉडेल घडवू शकेल.

‘व्हाय सो गंभीर’चे दोन अंक हे या कुटुंबात घडणाऱ्या दोन घटना आहेत. गिरीष दातार यांनी उत्तम लिखाण करून नाटक रंजक आणि पकड घेणारं केलंय. नाटकाची भाषा आणि पोत खूपच छान जमलाय. गिरीष दातार आणि अमोल भोर या दोघांनी ‘व्हाय सो गंभीर’चं दिग्दर्शन केलंय. इथे त्यांनी दोन पिढय़ांतील वेगळेपणा कलाकारांच्या देहबोलीतून नेमका दाखवलाय. लेखनातून आणि दिग्दर्शनातून नाटकातली पात्रं प्रेक्षकांपर्यंत ठसठशीतपणे पोहोचतात. ती त्यांच्यात रुजणं ही जबाबदारी मग कलाकारांची आहे. इथे ‘व्हाय सो गंभीर’ पैकीच्या पैकी मार्क मिळवतं. या नाटकातले सगळे कलाकार तगडे आहेत. सौरभ झालेला आरोह वेलणकर इथे ‘रेगे’ पुसून सौरभ गंभीर लीलया उभा करतो. एक मध्यमवर्गीय हुशार, पण समजूतदारपणे बुजरा तरुण आरोहने खूप गंभीरपणे साकारला आहे. पल्लवी पाटील हिने मानसी मनस्वीपणे वठवली आहे. आजच्या तरुण मुलींचा कमालीचा आत्मविश्वास पल्लवीने ठायीठायी दाखवलाय. हल्लीच्या पिढीचा ताठ बाणा ठेवून तिने मानसीची भावुकता, प्रेमळपणा चोख सांभाळलाय. अन्विता फलटणकरची प्रज्ञा अत्यंत लोभसवाणी बहीण आहे. प्रज्ञाची आपल्या भावाशी आणि खास करून वहिनीशी असलेली भन्नाट केमिस्ट्री अन्विताने अगदी सहजगत्या दाखवली आहे. समंजस मध्यमवर्गीय आई म्हणून शुभा प्रशांत केवळ शोभत नाही, तर सर्वसाधारण मराठी घरातला ‘व्हॉईस ऑफ सॅनिटी’ म्हणून प्रभावीपणे समोर येते. प्रदीप जोशींचे बाबा इरसाल आणि प्रेमळ याचा सुवर्णमध्य मस्त साधतात. प्रदीप जोशी काही ठिकाणी वसंत सोमण यांची आठवण घडवून जातात. आशिष दातीरने केलेला निरज हा मित्र व्यवस्थित परिणाम साधतो आणि त्याची बायको प्राची करताना रसिका वाखारकर योग्य तो खमकेपणा आणून परिणाम साधते.

मराठी रंगभूमीवर आता नवनवीन प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि तसे ते होतही आहेत. ‘व्हाय सो गंभीर’ हे नाटक या प्रयत्नांमध्ये एक स्तुत्य पाऊल आहे. हा प्रयत्न करताना ‘व्हाय सो गंभीर’ शंभर टक्के मनोरंजन करतं हे विशेष आहे. शैला काणेकर प्रस्तुत अथर्व थिएटर्स निर्मित ‘व्हाय सो गंभीर’ प्रेक्षकांनी स्वीकारलं आणि त्यातली पात्रं त्यांनी आपलीशी केली तर सिनेमाक्षेत्रात जसं सध्या फ्रँचाईजचे पेव फुटलेय किंवा टीव्हीवर दैनंदिन मालिकांचं जे गणित आहे ते मराठी नाटकाला प्राप्त होऊ शकेल.

 • नाटक  : व्हाय so गंभीर
 • निर्मिती : अथर्व थिएटर्स
 • सादरकर्त्या : शैला काणेकर
 • निर्माते : संतोष काणेकर
 • लेखक : गिरीश दातार
 • नेपथ्य : अजय पुजारे
 • प्रकाश योजना : रवींद्र करमरकर
 • वेशभूषा : अपर्णा गुराम, प्रियंका गावकर
 • रंगभूषा : संतोष पेडणेकर
 • सूत्रधार : दिगंबर प्रभू
 • दिग्दर्शक : अमोल भोर, गिरीश दातार
 • कलाकार : पल्लवी पाटील, अन्विता फलटणकर, अपूर्वा कुलकर्णी, रसिका वाखारकर, प्रदीप जोशी, आशिष दातीर, आरोह वेलणकर.
 • दर्जा  : ***