नाव हीरो आणि वाट्याला येतो झीरो

>>वैष्णवी कानविंदे – पिंगे

सिनेमात एकदम स्टार असणारे टॉपचे कलाकार असतील, प्रेमकथा असेल, विनोद असतील, गाणी असतील, फॅण्टॅसी असेल, डोळे दिपवणारं व्हीएफएक्स असेल, पण तरीही सिनेमा पहाताना जांभयावर जांभया यायला लागल्या. भल्यामोठ्या पडद्याकडे पहाण्यापेक्षा आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे जास्त वेळ घालवायला लागलो. मध्ये मध्ये घड्याळ पहायला लागलो की समजावं या सिनेमाची किंमत शून्य अर्थात झीरो आहे आणि इथेच बहुदा शाहरुखचा सिनेमा इण्डस्ट्रीतला तगडा अनुभव कामी आला असावा आणि जाणतेपणानेच त्याने आपल्या सिनेमाचं नाव आधीच ‘झीरो’ असं ठेवलं असावं.

तर या सिनेमाची कथा. म्हणजे काय होतं की, खरं म्हणजे या सिनेमाला कथाच नाही. कथेच्या नावाने जे काही आहे ते इतकं विशविशीत, असंबंद्ध आणि गोंधळ घालणारं आहे की त्यामुळेच सुरुवातीपासून समोर काय वाढलं जाणार आहे याची बोचरी जाणीव व्हायला लागते. शाहरुख खान एक अडतीस वर्षांचा बुटका, वय वाढलेला आणि उंचीमुळे लग्न न होऊ शकलेला मुलगा (?) असतो. विवाह संस्थेत नाव नोंदवल्यावर अपंग, व्हिलचेअर असणाऱ्या अनुष्का शर्माशी त्याची ओळख होते. ती अपंग असली तरी जगप्रसिद्ध अंतराळ वैज्ञानिक असते. मग ते भेटतात. दोघांमधले शारीरिक दोष वगळता ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडतात, कसे पडतात आणि का पडतात हे प्रेक्षकाला कळतही नाही. मग त्यांचं लग्न कसं ठरतं वगैरे या गोष्टीही पडद्यावर अशाच घडत राहतात.

दिग्दर्शकाच्या भिंगेतून बहुतेक जे ठरवलं जातं तसं घडतं, पण कुठच्याही गोष्टीला ना कुठचा संदर्भ ना कुठचा तर्क. मग अचानक त्या छोट्या शाहरुखला त्याची दिलाची धडकन असणारी हिरॉईन बबिता भेटते. मग तिच्यासाठी तो सगळं सोडतो. मग परत त्याला आपली हुशार प्रेयसी आठवते. मग तो परत येतो. मग तिला मिळवायला मेरठपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून अमेरिकेपर्यंत व अमेरिकेपासून थेट अंतराळापर्यंतचा प्रवास वगेरे वगैरे. मुळात स्टार असणारी माणसं इतकी असंबंद्ध कथेवर अभिनय करू तरी कसे शकतात हा प्रश्नच आहे मोठा. याची पटकथादेखील अशीच. त्याला ना कुठचा आगा ना पिछा. फक्त प्रत्येक फ्रेममध्ये शाहरुख दिसतोय याची काळजी घेतली गेलीय. संवाद विनोदी करायचे प्रयत्न केले आहेत, पण त्या विनोदांवर जराही हसू येत नाही.

अनुष्काने काम बरं केलंय. कतरिना तिच्या नटीपणाच्या भूमिकेला शोभून दिसलीय. शाहरुख खान त्याच्या नेहमीच्या हीरो स्टाईलमध्येच वावरतो त्यामुळे शाहरुख सिनेमाभर दिसत राहतो. बाकीचे कलाकारही तोंडलावणी करतात. गाणी ठीक आहेत. (सॉलिड नाहीत). व्हीएफएक्स वर होऊ द्या खर्च, पण एवढं सगळं असूनही हा सिनेमा पहिल्या दृश्यापासूनच भयंकर कंटाळवाणाच ठरतो. या सिनेमाच्या एका दृश्यात सलमान खान आहे. सलमान आणि शाहरुख एकत्र नाचले आहेत. दुसऱ्या एका प्रसंगात चक्क करिष्मा कपूर, आलिया भट्ट, काजोल, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, श्रीदेवी, राणी मुखर्जी अशा सगळ्या चमचत्या तारका भरल्या आहेत. पडद्यावर हे असे क्षण खरंच रंगतदार वाटतात. एवढ्या सगळ्या जणींना पडद्यावर एकत्र पहाणं पर्वणी ठरते. हे शाहरुखच्याच सिनेमात होऊ शकतं आणि कंटाळाही त्याच्याच सिनेमात येऊ शकतो हे प्रेक्षकांना कळून चुकलंय.

मुळात या सिनेमाला लॉजिकच नाही. प्रसंग एकातून दुसरे का घडतात. एखाद्या प्रसंगाला विनोदी का म्हणावं. नृत्य स्पर्धेत शाहरुखच जिंकतो. जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि त्याचं प्रेम, पैसे उडवणं. मित्राचं सर्चलाईट घेऊन फिरणं अशा अनेक गोष्टी कळतच नाहीत. कथेची वाटच निसरडी असल्याने दिग्दर्शनाची गाडी घसरली आहे हे दिसतं त्यामुळे ती गाडी भलेही चकचकीत असली तरी त्याचा चकचकीतपणा जाणवतच नाही.

हा सिनेमा पहाताना खरं म्हणजे वाईट वाटतं. बड्या कलाकारांकडून पेक्षकांनी चांगल्या कलाकृतीची अपेक्षा ठेवावी तर हे असे सिनेमे वाट्याला येतात आणि आजवर एकदाच नाही तर अनेकदा हेच हाती आल्याने निस्सिम चाहत्याला फक्त हळहळण्याव्यतिरिक्त काहीच हाती उरत नाही. आपला हीरो झीरो असल्याची जाणीव चाहत्यांच्या मनात जन्म घेते यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही!

 •  दर्जा : 1 स्टार
 •  सिनेमा : झीरो
 •  निर्माता : गौरी खान
 •  दिग्दर्शक : आनंद के लाल
 •  लेखक : हिमांशु शर्मा
 •  छायांकन : मनू आनंद
 •  संगीत : अजय-अतुल
 •  कलाकार : शाहरुख खान, कतरिना कैफ,
  अनुष्का शर्मा, अभय देओल,
  तिगमांशु धुलिया, आर. माधवन, शिबा चढ्ढा