हाऊसफुल्ल : धप्पा, आनंदोत्सव

1

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे 

सिनेमा म्हणजे निखळ करमणूक हवी…. सिनेमातनं काहीतरी उत्तम सामाजिक संदेश देता आला पाहिजे…. सिनेमाचा आनंद अख्ख्या कुटुंबासोबत बसून लुटता आला पाहिजे… सिनेमा पाहताना कसं भान हरपलं पाहिजे… सिनेमा हलकाफुलका तर हवा, पण फुटकळ विनोद नकोत…. सिनेमा परत परत पाहिला तरी त्यातला आनंद टिकून राहता आला पाहिजे… आणि काय आणि काय…. मुळात एखादा उत्कृष्ट सिनेमा कशा पद्धतीने असायला हवा, त्याचे ठोकताळे कसे असायला हवेत याबद्दल प्रेक्षक म्हणून आपल्या असंख्य अपेक्षा असतात… तर यातल्या बहुतेक सगळ्या अपेक्षांना परिपूर्ण करणारा ‘धप्पा’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाबद्दल काय अन् किती बोलावं… थोडक्यात सांगायचं झालं तर सिनेमा पाहिल्यावर मिळणारा निखळ आनंद म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘धप्पा’ पाहावा. निरागस वयाच्या विविध छटा मनमुराद अनुभवण्यासाठी ‘धप्पा’ पाहावा आणि आपली संवेदनशीलता बळकट करण्यासाठी ‘धप्पा’ पाहावा…. एकूणच प्रत्येकाने हा सिनेमा पाहावाच पाहावा.

या सिनेमाची कथा एका गृहसंकुलात म्हणजेच सोसायटीमध्ये घडते. एकमेकांशी सुसंवाद असणारी, विविध वयोगटांची मुलं या सोसायटीमध्ये एका कुटुंबासारखी राहत असतात. दरवर्षी या सोसायटीच्या गणेशोत्सवात लहान मुलांचं नाटक बसवलं जातं आणि मस्त, मजेत हसत खेळत मुलं नाटक साकारतात, तर मोठेदेखील मुलांचं कौतुक करण्यात, त्यांना पाठिंबा देण्यात अगदी हिरीरीने पुढे असतात. तर 2016 सालच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. गेल्या वर्षी ‘संत ज्ञानेश्वर’ हा विषय घेऊन केलेलं नाटक गाजलेलं असतं. त्यामुळे यावर्षी वेगळा पर्यावरणाचा विषय घ्यावा असं ठरतं. सुरुवातीला हा विषय रुक्ष वाटला तरी नंतर त्यातली गंमत जशी उलगडायला लागते तशी मजा यायला लागते. प्रत्येक मूल आपल्या वाट्याला आलेलं कोणतंही काम अगदी मन लावून करायला लागतो. तयारी सुरू असते आणि अचानक कोणाच्या काही मनातही नसताना या लहान मुलांच्या नाटकामुळेच अशी एक गोष्ट घडते की, त्यामुळे सगळ्याच गोष्टींना अनपेक्षित वळण लागतं. या घटनेमुळे एकूणच आनंदात, सुरळीत सुरू असणार्‍या सगळ्या तयारीवर विरजण पडतं. आलेल्या आपत्तीपुढे  मोठी, विचारी माणसं हात टेकतात, पण मुलं मात्र परिस्थितीला नेटाने पुढं जायचं ठरवतात. एवढी हादरवणारी अशी कोणती घटना घडते आणि अचानक ती का घडते… ती घडण्यासाठी नेमकं कारण काय असतं… मग त्याला मुलं सामोरी जातात म्हणजे काय करतात आणि शेवटी या सगळ्या प्रश्नांची उकल कशी निघते… हे या चित्रपटात पहायला मिळेल.

अतिशय सुंदररीत्या लिहिली गेलेली कथा, नेमकेपणाने साधलेली पटकथा. दृष्यं इतकी सुंदररीत्या साकारली गेली आहेत की, ती पाहताना आपण त्यात कधी एकरूप होतो तेच कळत नाही. काही गोष्टी तर इतक्या अगदी सहजसाध्या पद्धतीने साकारल्या गेल्या आहेत की, त्या साधेपणानेच त्या जास्त प्रभावी ठरतात. संवाद तर उत्कृष्टच. दृष्य पाहताना किंवा संवाद पाहताना मनमुराद हसू येतं. घटना प्रासंगिकच आहेत. अगदी सहज घरगुती वाटावी अशी दृष्यं आणि त्यातून साकारला गेलेला जो आनंद आहे तो मात्र अवर्णनीय आहे.

निपुण धर्माधिकारीची एक दिग्दर्शनीय पद्धत आहे. कुठेही खूप खळबळ, छेद देणार्‍या गोष्टी न मांडताही एखादा विचार प्रभावीपणे साधायची किमया तो अगदी लीलया पार पाडतो. सिनेमा इतका सहज साकारतो की, बघणार्‍याला तो आपल्या आजूबाजूला साकारला जातोय असंच वाटत राहतं आणि प्रेक्षक त्यात अगदी सहजच गुंतत जातो. या सगळ्यात आपण प्रेक्षक म्हणून नाही, तर त्या ठिकाणीच आहोत आणि या सगळ्या घटनाप्रवाहाचा, आनंदाचा आणि संकटाचा एक भाग आहोत ही भावना सिनेमा जसा रंगत जातो तशी अधिक प्रबळ होत जाते आणि मुळात या सिनेमात जो प्रश्न मांडलाय त्याच्याशी प्रेक्षकांनी इतकं एकरूप होणं हेच चांगल्या दिग्दर्शकाचं खरं यश आहे. सिनेमामध्ये कॅमेर्‍यातून इतरांना टिपणं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी अधोरेखित करणं ही दिग्दर्शनाची खासीयत नक्कीच छाप पाडते.

या सिनेमातल्या कलाकारांचा अभिनय तर अतिशय सुंदर. म्हणजे अगदी प्रत्येक छोट्यातल्या छेट्या कलाकारापासून ते मुख्य भूमिका साकारणार्‍या प्रत्येकापर्यंत. अगदी म्हातार्‍या आजीपासून ते तीनचार वर्षांच्या लहानग्यापर्यंत प्रत्येकाने उभी केलेली अभिव्यक्ती इतकी तरल आणि सहजसुंदर आहे की, त्यातला प्रत्येक जण आपल्याला आवडून जातो. मुख्य भूमिका साकारणार्‍यांपैकी एक वृषाली कुलकर्णी हिचे डोळेच सगळं काही बोलून जातात. बाकी गिरीश कुलकर्णी, सुनील बर्वे, इरावती हर्षे, उमेश जगताप, श्रीकांत यादव, ज्योती सुभाष हे कलाकार तर नाणावलेले आहेतच. या सिनेमातले बालकलाकार हे फक्त लहान आहेत म्हणून त्यांना बालकलाकार म्हणावं, पण प्रत्येकाने साकारलेला अभिनय, प्रत्येकाची समज, भूमिका आणि विषयाची जाणीव हे सगळंच इतकं दर्जेदार आहे की, त्याचा फक्त अनुभवच घ्यावा. सुह्रद शारंगपाणीची व्यक्तिरेखा साकारणारा आकाश कांबळे, सगळ्यांमध्ये थोडी मोठी ताई असणारी शारवी आणि चेतनची भूमिका साकारणारा बालकलाकार अक्षय यादव तर कमालच!

हा सिनेमा पहाताना आपल्याला कदाचित हवी असलेली, पण निसटत चाललेली अनेक मूल्यं सापडत जातात, संस्कार म्हणजे काय ते समजतं. संस्कार वेगळे करायची आवश्यकता नसते, ते आपल्या रोजच्या व्यवहारातून अगदी सहज होत जातात आणि अचानक जेव्हा एखादी परिस्थिती येते तेव्हा ते नेमके कसे घडलेयत याचं दृष्यरूप साकारतं. जेव्हा मोठी माणसं जातधर्म, रंगरूप याच जळमटांमध्ये अडकलेली असतात तेव्हा या लहान मुलांची निरागसता या गोष्टींना स्पर्शूदेखील देत नाही. म्हणूनच अपंगत्व असणारा दादा किंवा वॉचमनची गरीब मुलं हेदेखील तितकेच सहज इतर मुलांमध्ये समावले जातात आणि त्यांचं ते सामावलं जाणं पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्याला उगाच समाधान वाटत रहातं.

एकूणच ‘धप्पा’ हा सिनेमा खास आहे. तो मुलांच्या भावविश्वातून साकारला गेलेला, त्यांच्या अभिनयाने सजलेला असला तरी तो फक्त मुलांसाठीच नाही, किंबहुना प्रत्येक माणसाने हा सिनेमा पाहायलाच हवा. मुलांकडून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला शिकता येतं याचीच जाणीव हा सिनेमा देतो.  

दर्जा                  : ****

सिनेमा               : धप्पा

निर्माते               : सुमतीलाल शहा

सहनिर्माते           : गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी,

दिग्दर्शक            : निपुण धर्माधिकारी

लेखक               : गिरीश कुलकर्णी

छायांकन             : स्वप्नील सोनावणे

संगीत                : गंधार

कलाकार            : आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, शर्व वढवेकर, श्रीहरी अभ्यंकर, दीपाली बोरकर,

                         अभिजीत शिंदे, नील देशपांडे, वृषाली कुलकर्णी, इरावर्ती हर्षे, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी,

                         श्रीकांत यादव, उमेश जगताप, ज्योती सुभाष, चंद्रकांत काळे