म्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये

18

सामना ऑनलाईन । रांची

सध्याच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिपचे फॅड जरी असले तरी झारखंडमधील एका गावात अनेक जोडपी नाईलाजाने अशा नात्यामध्ये राहत आहेत. कारण त्यांच्याकडे लग्नाचा खर्च करायला व गावजेवणं घालायला पैसेच नाहीयेत. गुमला येथे हे गाव असून येथे अनेकजण 20 ते 30 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत आहेत.

वर्षानुवर्ष लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांची सामान्यांप्रमाणे लग्न करण्याची इच्छा आहे. यामुळे एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत नुकतेच येथील 132 जोडप्यांचे लग्न लावून दिले. तसेच यावेळी परंपरेनुसार गाव जेवणही घातले. यामुळे हे आदिवासी गावकरी भलतेच आनंदात आहेत.

झारखंडमधील ओरांव, मुंडा आणि हो नावाच्या आदिवासी जमातीमध्ये अशा प्रकारची जोडपी पाहायला मिळतात. कारण लग्नाचा खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. लग्न न करता एकत्र राहण्याच्या या पद्धतीला येथे धुकुआ असे म्हणतात. यात महिला लग्न न करता समाजाच्या परवानगीने पुरुषाबरोबर राहू शकते. तिला धुकनी म्हणजे लग्न न करता पुरुषाच्या घरात राहणारी बाई असे संबोधले जाते. विशेष म्हणजे लग्न न करता पुरुषाची पत्नी म्हणून वावरणाऱ्या या धुकनी म्हणजे बाईला पतीवर व मुलांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार नसतो. ती फक्त त्यांची सेवा करू शकते व प्रजनन करू शकते. तिला सामान्य किंवा लग्न करून आलेल्या महिलांबरोबर ऊठबस करण्यास मनाई असते.