हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पंचांची तब्येत बिघडली

सामना प्रतिनिधी । नागपूर

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना नागपूरच्या व्हीसीए मैदानावर झाला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात तिसरे पंच म्हणून कामगिरी बजावणारे रिचर्ड इलिंगवर्थ यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सामना संपल्यानंतर सोमवारी त्यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळत आहे.

नागपूरमधील व्हीसीए मैदानावर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ यांनी तिसरे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर रात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. मात्र २ ऑक्टोबरला पहाटे तब्येत आणखी खालावल्याने त्यांना मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिचर्ड इलिंगवर्थ हे आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत. त्यांनी इंग्लंडकडून एकदिवसीय आणि कसोटी सामन्यामध्येही प्रतिनिधित्व केले आहे.