ऑलिम्पिकच्या तयारीसाठी रिद्धी-सिद्धीची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने हिंदुस्थानातील प्रतिभावान जिम्नॅस्टिकपटूंना हेरून त्यांना उच्च प्रशिक्षणासाठी 21 जानेवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान पटियाला (पंजाब) येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी 17 वर्षांखालील व 14 वर्षांखालील सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टसची निवड करून त्यांना उच्च प्रशिक्षित केले जाणार आहे. यात संभाजीनगरच्या रिद्धी-सिद्धी या जुळ्या भगिनींची निवड करण्यात आली आहे.

2018-19 च्या आगरताळा येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतून रिद्धी-सिद्धी हत्तेकर यांची पदक विजेती कामगिरी लक्षात घेऊन सिद्धीने गतवर्षी ज्युनिअर एशियन चॅम्पिनशिपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर रिद्धी हत्तेकरने गतवर्षी व यंदा राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीत सातत्य राखत पदके प्राप्त केली असल्यामुळे या दोघींचाही विचार ऑलिम्पिक पूर्वतयारीसाठी करण्यात आला. या सराव शिबिरात 17 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या रिद्धी-सिद्धी हत्तेकरसह 6 मुली व 2 मुलांची निवड करण्यात आली आहे. तर 14 वर्षांखालील गटात 4 मुली व 3 मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक म्हणून महेंद्र बाभूळकर यांची निवड करण्यात आली आहे.

रिद्धी-सिद्धी हत्तेकर यांनी जिम्नॅस्टिकचे प्राथमिक धडे तनुजा गाढवे यांच्या हाताखाली गिरवले आहेत. सध्या रिद्धी-सिद्धी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या संभाजीनगर येथील पश्चिम विभागीय केंद्रात सराव करीत आहेत. रिद्धी व सिद्धी हत्तेकर या दोघी जुळ्या भगिनी शारदा मंदिर कन्या प्रशालेत 9 वीच्या वर्गात शिकतात. त्यांच्या या यशाबद्दल साईच्या संचालिका सुश्मिता ज्योत्सी, उपसंचालक विरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, पिंकी देव, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, महाराष्ट्र अ‍ॅम्युचर जिम्नॅस्टिकचे सचिव मकरंद जोशी, अध्यक्ष संजय शेटे, औरंगाबाद जिम्नॅस्टिक संघटनेचे अ‍ॅड. संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, आदित्य जोशी, रणजित पवार, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे क्रीडाशिक्षिका हेमलता जगताप यांनी रिद्ध-सिद्धी हत्तेकर यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.