ज्ञानाचा अश्व

1795

संजीवनी धुरी-जाधव

पंढरपुराच्या वेशीवर वारकरी पोहोचलेत… अभंग–कीर्तनाच्या भक्तीरसात नहात… शितोळे सरकारांच्या अश्वांचे रिंगण पाहून त्यांच्या डोळय़ांचे पारणे फिटले आहे… काय आहे ही रिंगणाच्या अश्वांची परंपरा…

 ज्ञानेश्वर माऊलींना ‘ज्ञानीयांचा राजा’ अशी पदवी दिली गेलीय, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना राजाश्रय देण्याचं कार्य शितोळे सरकार १८३२ पासून करत असल्याची आळंदी संस्थानात नोंद आहे. गुरू हैबतबाबा यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी कारीसाठी पंढरपूरकडे नेण्याची परंपरा सुरू केली. तीच परंपरा पुढे शितोळे सरकारकडे आली. तेव्हापासून अखंडपणे राजाश्रय देण्याची ही परंपरा सुरु आहे.

महादजीराजे शितोळे सरकार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, माऊलींच्या प्रती राजाश्रय देण्याचं आमचं कार्य तिथून सुरू झालं. माऊलींचा विसावा हा शितोळे सरकारच्या तंबूमध्येच होतो आणि सकाळचा मानाचा नैवेद्यही त्यांचाच असतो. त्यांच्याबरोबर वारीदरम्यान वारकऱयांमध्ये भांडण-तंटा झाला किंवा काही अडचण आल्यास शितोळे सरकारला सांगितली जाते, पण विषय तितका गंभीर असेल तरच…शितोळे सरकारच्या ध्वजाखालीच जरीपटका येथील तंबूकडे त्याचा अंतिम निर्णय घेतला जातो. हा सगळा राजाश्रय दिल्यामुळे वाखरी ते पंढरपूर माऊलींच्या पादुका हातामध्ये घेऊन चालायचा मान हा शितोळे सरकारचाच असतो. गेली पन्नास वर्षे माझे वडील गळ्यात लाल कापड घेऊन माऊलींच्या पादुका हातांमध्ये घेऊन पायी चालतात. त्या इसभावी पंढरपूर वेशीबाहेर जिथे शेवटची आरती होते तिथे दिल्या जातात आणि त्या पल्ल्यापासून ते पंढरपूर माऊली पादुका मंदिर तिथपर्यंत आणून ठेवण्याचे कार्य आम्ही पायी करत असल्याची माहिती महादजीराजे शितोळे सरकार यांनी दिली.

रिंगण परंपरा

पालखी सोहळ्याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण परंपरा. वारी आनंदमय करण्यासाठी त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे रिंगण. निष्ठावंत वारकरी वारा, ऊन, पाऊस अशी कसलीही तमा न बाळगता आपला खडतर प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेला असतो. तिथे पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी जात असतो. हा पल्ला अंकलीपासून पुणे सवा तीनशे किलोमीटरचे अंतर आहे. त्यात आमचे घोडे, आमचा लवाजमा हे सगळं घेऊन जातो. त्यासाठी अकरा दिवसांचा पल्ला असतो.

अश्वाची वैशिष्टय़े

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी कारीच्या पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्व पाठकले जातात. एक जरीपटक्याचा अश्व आणि दुसरा माऊलींचा अश्व असतो. माऊलींचा अश्वावर कोणी स्वार नसतो. त्यावर स्वतः माऊलींची गादी, अधिष्ठान असते. त्यामुळे त्यावर कोणी स्वार नसतं. शितोळे सरकारचे घोडे जेव्हा अंकलीतून प्रस्थान करतात तेव्हापासून पुण्यापर्यंत ते चालत असतात. हा अश्व अंकलीकरून आळंदीत येताना  पहिला टप्पा म्हैसाळ असतो.त्यानंतर म्हैसाळच्या आजूबाजूच्या गावातील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतो कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करकी श्री पंढरीच्या किठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रद्धा असते.  पाचशे ते सवा पाचशे किलोमीटर अंतर हे अश्व पायी पार पाडतात. येताना मात्र या अश्वांना टेम्पोतून आणले जाते.

वेगळेपणाची जाणीव

असं बोललं जातं की, जनावरांनाही सहावं इंद्रिय असतं, असं म्हणतात. त्यांच्या भाषेत ते एकमेकांशी संवाद साधतात. त्यांचे निरीक्षण केले तर याचा अंदाज येतो. अश्व जरी माऊलींचे असले तरी ते अश्व आहेत. त्यांच्यामध्ये त्यावेळी वेगळेच तेज येते. यामुळेच   त्यांना आपण काहीतरी विशेष कार्य करत असल्याची जाणीव होते. रिंगणात धावण्यासाठी या अश्वांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना फक्त माऊलींच्या पादुकांवरचा बुक्का लाकून सोडले की माऊलींचा अश्व रिंगण पूर्ण करतो. रिंगणामध्ये आपण जे बघतो ते सगळं दैवीच म्हणावं लागेल.

वारकऱयांनो, समजून घ्या

हिराचे जाण्यामागचे नेमके कारण समजले नाही. हिरा हा अश्व माऊलींचा असल्याने त्याच्याशी वारकऱयांच्या भावना जोडलेल्या होत्या. गेली आठ वर्षे हिरा वारी करतोय. प्रत्येक वारकऱयाला वाटते हिराला धान्य खाऊ घालून आपण माऊलींची सेवा करतोय. तुमचे धान्य अश्वासोबत असलेल्या सेवकाकडे द्या, ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना खाद्य देतील. त्याने तुमच्या भावनाही दुखावल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

‘हिरा’ची जागा ‘राजा’ने घेतली

माऊली जसे घेते तसे देते. याचा प्रत्यय म्हणजे राजा. हिरा वारीदरम्यान गेला. आळंदीचे प्रस्थान झाल्यानंतर हिरा पुण्यामध्ये आला. पुण्यात त्याने एक पूर्ण रात्र काढली आणि सकाळी तो गेला. त्यानंतर दोन दिवस पालखी पुण्यातच होती. आम्हाला दुसऱया अश्वाची सोय करण्यासाठी एक दिवस मिळाला, हिरा वारीदरम्यान गेल्याने वारकऱयांच्या भावना जास्त उफाळून आल्या. हिरा गेल्याचे कळले तसे अनेकांनी त्यांच्याकडे अश्व असल्याचे सांगितले. त्यातलाच एक राजा. ज्या दिवशी सकाळी सात वाजता हिरा गेला आणि त्याच संध्याकाळी राजा आला. राजाने वारकऱयांची मने जिंकली.

 

आपली प्रतिक्रिया द्या