महाराष्ट्राचा दुष्काळ संपवणार, नदीजोड प्रकल्पांची गडकरींची घोषणा

नितीन गडकरी

सामना ऑनलाईन । मुंबई

महाष्ट्रातील दुष्काळ संपवण्यासाठी ३ नदीजोड प्रकल्पांची घोषणा आज केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केली. नदी जोड प्रकल्पाचे काम तीन महिन्यांच्या आत सुरू होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

सध्या महाराष्ट्राची सिंचन क्षमता २२ टक्के इतकी असून ही क्षमता दीड वर्षात ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. महाराष्ट्रात २६ प्रकल्प रखडलेले आहेत, ते या दीड-दोन वर्षात पूर्ण झाल्यास दुष्काळ दूर होईल. त्यामुळेच प्रधानमंत्री सिंचन योजने अंतर्गत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. तसेच नदीजोड प्रकल्पासाठी १२-१३ सप्टेंबर रोजी गुजरात सरकारसोबत करार करण्यात येईल यामुळे तापीचे पाणी ही मिळेल. त्यामुळे उत्तर महाष्ट्रातील नाशिक-धुळे-जळगाव या पट्ट्यातील पाणी प्रश्न सुटेल. तसेच नगर-मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्य़ांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.