‘रिलॅक्स’ होण्यासाठी बिअर प्यायला बसला आणि पोलिसांनी उचलला

सामना ऑनलाईन, मालवण

निपाणीत दरोडे टाकून फरार झालेल्या एका अट्टल दरोडेखोराला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. प्रफुल्ल नारायण माळवतकर (वय ३०, रा. बीड) असं या दरोडेखोराचं नाव आहे. फरार झाल्यानंतर टेन्शन दूर झाल्यानं ‘रिलॅक्स’ व्हायला प्रफुल्ल दारु प्यायला बसला होता. त्याचवेळीस पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना बघताच दरोडेखोराची सगळी नशा एका सेकंदात उतरली.

कर्नाटकातील निपाणी इथे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याने दरोडा घातला होता. यानंतर निपाणी पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो तिथून फरार झाला होता.  गुरुवारी दुपारी मालवण शहरातील एका बियर बारमध्ये एक संशयित व्यक्ती दारू पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक नागरगोजे व मंगेश माने या पोलुस पथकाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने निपाणी येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर निपाणी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली व गुन्ह्याची व संशयितांची खातरजमा मालवण पोलिसांनी केली. त्यानंतर संशयित प्रफुल्ल याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असून निपाणी पोलीस पथक मालवणला रवाना झाले आहे.